सोमवार, २७ एप्रिल, २०२०

किनारा

हा एकटा किनारा लाटा भिडून गेल्या
नसता मनात काही भेटी घडून गेल्या

थांबून परतलो मी झाला उशीर होता...
का प्रेम-मीलनाच्या घटिका बुडून गेल्या?

कुजबूज पाखरांची मी ऐकली पहाटे
(ठेवून याद मागे चिमण्या उडून गेल्या)

केला हिशेब जेव्हा माझ्याच जीवनाचा
शून्याशिवाय साऱ्या संख्या दडून गेल्या

धरल्या मनात होत्या गोष्टी गृहीत खोट्या
एका क्षणात सगळ्या बघ उलगडून गेल्या!

केली कुणी मनाई खेळास चिमुकल्यांच्या
बागेतल्या कळ्याही आता झडून गेल्या...

मी शब्द पेरले अन् उमलून सूर आले
फुलता अखेर गाणे टाळ्या पडून गेल्या!

- कुमार जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा