Monday 27 April 2020

माणसे

येत होती, जात होती माणसे
गीत अपुले गात होती माणसे!

साथ होती माणसांच्या माणसे
माणसांचे हात होती माणसे...

आज झाली जीवनाची सोबती
काल जी अज्ञात होती माणसे

माणसांचे पीक येथे काढती
येथुनी निर्यात होती माणसे!

हसत त्यांनी सहज अश्रू लपवले...
केवढी निष्णात होती माणसे!

भासली होती विजेचा लोळ ती -
पेटलेली सात होती माणसे!

का घरे मी दुश्मनांची जाळली?
त्या घरांच्या आत होती माणसे....

- कुमार जावडेकर

No comments:

Post a Comment