Saturday, 27 November 2010

भाष्य


प्रेम आता मी स्वतः वर करत नाही
श्वास घेतो, हे खरे; पण जगत नाही...
भ्रमर इतके भोवती फिरती तरीही
फूल त्याच्या पाकळ्यांना मिटत नाही
प्रेम जुळल्यावर कशाला बोलशी हे -
'प्रेम आपोआप काही जुळत नाही!'
अंतरे ही वेगळी केव्हाच झाली
पण जुनी ती शपथ काही सुटत नाही
मार्ग माझा कोणता हे जाणतो मी
जात आहे जग कुठे मी बघत नाही
हसत हसवत जगत असतो रोज मी पण-
जीवनावर भाष्य करणे जमत नाही

Sunday, 19 September 2010

अस्तित्व

फक्त आता एवढे करायचे...
मी तुला अन् तू मला जपायचे...

का उद्याची काळजी करायची?
(काय होते आज ते बघायचे)

रात्र सरली - जाणले कधीच मी!
मात्र आहे तांबडे फुटायचे

व्हायच्या भेटी जशा पुन्हा पुन्हा
चेहरे अन् मुखवटे दिसायचे!

माणसे ना फिरकली इथे तरी
रोज पक्ष्यांचे थवे जमायचे

शोध का घेऊ तुझा अजून मी?
का तुझे अस्तित्व पत्करायचे?

- कुमार जावडेकर

Sunday, 1 August 2010

नायक

'... कुमार फक्त गायक नव्हता, तो नायक होता'. पं. भीमसेन जोशींनी कुमार गंधर्वांचं एका वाक्यात केलेलं हे वर्णन! (संदर्भ - 'कुमार' - वसंत पोतदार. )

दुसऱ्या एका समर्थ नायकाबद्दल लिहिताना हे सहज आठवलं...

किशोर कुमार हा गायक म्हणून आपल्याला नेहमीच प्रिय असतो, संगीतकार म्हणूनही तो आपल्याला आवडलेला असतो आणि नट म्हणून आठवला की काही हास्याच्या लहरी मनाला स्पर्शून, सुखावून जातात...

त्याचे चित्रपट किंवा गाणी बघताना एक वेगळेपण लक्षात यायला लागलं. एक नट म्हणून त्याची गाणी किती विविध संगीत दिग्दर्शकांकडून ध्वनिमुद्रित झाली आहेत! त्या प्रत्येक संगीतकाराला त्यानं नट आणि गायक या दोन्ही भूमिकांमधून किती न्याय दिला आहे!

आठवता आठवता एक यादीच तयार झाली.

१. झुमरू - स्वतः किशोर कुमार (झुमरू) - त्याची आनंदी, दु:खी, द्वंद्वगीतं, शांत, रागदारीवर आधारित अशी अनेक असली तरी या गाण्याची मजा औरच आहे. तो स्वतः शिकला नव्हता, पण 'कोई हमदम ना रहा' यावरची मूळ झिंझोटीतली चीज ऐकून त्याच्या व्यासंगाची खात्री पटते. 'भोला भोला मन' हे द्वंद्वगीत आणि 'ठंडी हवा' हे शांत सुंदर गीत... वा! (मला 'गे गे गे गेली जरा टिंबक्टू' पण आवडतं.) 'दूर गगन की छांव में' मधलं 'आ चल के तुझे' हे तर अजूनच वेगळं.

२. नखरेवाली - शंकर-जयकिशन (न्यू दिल्ली)

रंगोलीतल्या 'छोटीसी ये दुनिया' चा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. शैलेंद्रचं अजून एक सुंदर गीत! या दोन्ही गाण्यांतून शंकर-जयकिशनच्या शैलीचाही उत्तम परिचय होतो.

३. ऐ हसीनो - मदन मोहन (चाचा जिंदाबाद)

या गाण्यातलं पहिल्या कडव्याच्या आधीचं 'यॉडलिंग' सर्वांत अवघड आहे असं मला वाटतं. - किशोरकुमारचं मी आयुष्यात ऐकलेलं हे पहिलंच गाणं. त्याची ओळख पटवायला खूपच योग्य आहे असं वाटतं. (लहानपणापासून लाखेच्या रेकॉर्डवर ऐकतोय...)

४. मुन्ना बडा प्यारा - सलील चौधरी (मुसाफ़िर). 'हाफ टिकट' मधलं 'झूम झूम कव्वा' हेही असंच एक सुंदर गाणं.

५. ये राते ये मौसम - रवी (दिल्ली का ठग). 'कॅट माने बिल्ली' हेही अप्रतिमच.

६. हवाओं पे लिख दो - हेमंत कुमार (दो दुनी चार)

७. पाच रुपैया बारा आना - एस. डी. बर्मन (चलती का नाम गाडी). या चित्रपटातलं कुठलं गीत निवडावं असा प्रश्न पडला, कारण सगळीच गाणी सुंदर आहेत. शेवटी अवघड यॉडलिंग हा निकष वापरला.

८. एक चतुर नार - आर. डी. बर्मन (पडोसन). या चित्रपटातलं कुठलं गीत निवडावं असा प्रश्न पडला नाही. कारण सगळीच गाणी सुंदर आहेत, पण हे केवळ अप्रतिम!

९. मेरे महबूब - लक्ष्मीकांत प्यारेलाल (मि. एक्स इन बॉम्बे*)

*तेव्हा मुंबई झालं नव्हतं.

खरं तर हा चित्रपट बघून माझ्या मनात हा लेख लिहिण्याचा विचार आला. 'प्यार किये जा'चं संगीतही एल. पी. चंच!

१०. इना मिना डिका - सी. रामचंद्र (आशा)

११. गंगा की लहरे - चित्रगुप्त (गंगा की लहरे). चित्रगुप्त किती गोड संगीत द्यायचा याचं हे उत्कृष्ट उदाहरण.

१२. ये चार दिन बहार के - सज्जाद (रुखसाना). हे गाणं मला माहिती नव्हतं; अगदी अनपेक्षितरित्या मिळालं आणि दोघांबद्दलचा आदर अजून वाढला!

१३. मेरी नींदों में तुम - ओ. पी. नय्यर (नया अंदाज). ओ. पी. नय्यर, शमशाद बेगम आणि किशोर कुमार - वा! इतका सुंदर मेळ क्वचितच जमून येतो.

१४. प्यार का जहां हो - एन. दत्ता (जालसाज). हे सिलोनवर 'पुराने फिल्मों के गीत' मध्ये ऐकलंय. काय गोड गाणं आहे...

१५. गुणी जनो भक्त जनो - कल्याणजी आनंदजी (आंसू और मुस्कान) हे गाणंही मला माहिती नव्हतं.पण कल्याणजी आनंदजी या यादीत नसणं हेही अशक्यच होतं.
या यादीतले दोन-तीन मराठी संगीतकार बघून बरं वाटलं. त्यांची ही गाणीही अजून जना-मनात आहेतच.

ही गाणी शोधता शोधता एक खजिनाच विकिपिडियावर सापडला. यात पन्नालाल घोषांपासून उषा खन्नापर्यंत नावं सापडली! अर्थात यातल्या प्रत्येक संगीतकारानं किशोरकुमारकडून गाऊन घेतलंय की नाही हे कळलं नाही. अनिल बिस्वास यांनी 'फरेब' मध्ये एक गाणं केलं आहे असं दिसतंय, पण ते गाणं सापडलं नाही. या दुव्याचा सज्जाद आणि कल्याणजी-आनंदजींची गाणी आणि इतर उल्लेख केलेल्या संगीतकारांची इतर अनेक गाणी (किशोर कुमार या नायकासाठी केलेली) कळायला खूपच उपयोग झाला. 'गंगा की लहरे' हे चित्रगुप्तचं आहे आणि प्यार का जहां एन. दत्तांचं हेही यामुळेच कळलं.

हे दुवे शोधताना हेही आढळून आलं की किशोर कुमारची जयंती ४ ऑगस्टला आहे. एकदा मनात आलं, हा लेख प्रकाशित करण्यासाठी तोपर्यंत थांबावं का; पण.. लगेच असंही वाटलं की किशोर कुमारची आठवण ही काही त्याच्या जयंती/मयंतीपुरती मर्यादित नाहीये...

- कुमार जावडेकर

Thursday, 15 July 2010

माणसे

मुशायरा - (कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा)

Sunday, 16 May 2010

कदाचित

सरेल एवढा प्रहर कदाचित
तुला पडेलही विसर कदाचित

पुन्हा कधीतरी समीप येता
तुझी वळेलही नजर कदाचित

समोरुनी तुझ्या निघून गेलो...
(तुला नसेल ही खबर कदाचित!)

करेल शांत या मनास आता
तुझ्या कुपीतले जहर कदाचित

अजून मी बजावतो मनाला-
नसेल उंच ते शिखर कदाचित....

बुजेल एक एवढी जखम अन
बनेल पूर्ववत शहर कदाचित

Monday, 19 April 2010

'अन् गजल जुळे'...संक्षिप्त प्रस्तावना

'...पांडित्याची पगडी डोक्यावर मिरवणार्‍यांना कविता कळते असे समजण्याचे कारण नाही...कविता अंत:करणाला उमजते. असे अंतःकरण तुम्हांला आहे ही भाग्याची गोष्ट आहे...' हे मंगेश पाडगाबकरांचे आशीर्वाद लाभलेल्या या जुळ्या बंधूंचा हा पहिलाच गझल-संग्रह! या गझल-संग्रहाची प्रस्तावना लिहिली आहे पं. यशवंत देव यांनी 'काबिल-ए-गौर' असं शीर्षक असलेली ही प्रस्तावना संक्षिप्त स्वरूपात -

'अन् गजल जुळे' हा जावडेकर बंधूंचा पहिला गजलसंग्रह वाचकांच्या हाती पडतो आहे. मीही त्याचा आस्वाद घेतला आहे. देखण्या काव्य-कुसुमांचा हा एक खूबसूरत नजराणाच आहे असे मला वाटते. कुमार जावडेकर आणि डॉ. आश्विन जावडेकर हे दोघे बंधू कलासक्तच खरे! आप-आपल्या नित्याच्या व्यवसायांमुळे जरी त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळत गेले तरी कविता-छंदांच्या नाक्यावर त्यांची मौजूदगी नित्याचीच! कविता, गजल, संगीत इ. विषयांची आवड दोघांनीही जोपासून आपल्या आयुष्याला एक नाजुक ललितरंगही दिला आहे.
वृत्तबद्ध कविता किंवा छंदबद्ध कविता मला स्वतःला अधिक भावते कारण तिच्यातल्या शब्दावतरणाला एक मालाबद्ध बंदिश सहजच बहाल झालेली असते; जी पुढे जाऊन संगीतातल्या एखाद्या तालावर इशारा करू पाहते. खर्‍या प्रतिभावंताला मालाबद्ध शब्दयोजना ओढूनताणून प्रयत्नपूर्वक करावी लागत नाही. तो त्याच्या लेखणीचा उत्स्फूर्त असा एक शब्दाविष्कारच असतो. असा आविष्कार आपण या संग्रहात पाहू शकतो, याबाबतीत या शायरद्वयांनी एक फारच नेटके काम केले आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यांचा कोणताही शेर बांधेसूदपणाच्या बाबतीत ढिसाळ नाही; शिवाय, त्यांच्या प्रत्येक शेरामधून अनेकविध विषय आणि अनुभव चांगल्या प्रकारे अभिव्यक्त झालेले आपल्याला दिसतात. तरीपण संगीताकडे त्यांचा ओढा असल्यामुळेच की काय त्यांच्या रचनांमधून बर्‍याच ठिकाणी संगीत-क्षेत्रातले संदर्भ आपल्याला आढळतात. उदाहरणार्थः-

"मी शब्द पेरले अन् उमलून सूर आले
फुलता अखेर गाणे टाळ्या पडून गेल्या" (पृष्ठ क्र. १०, कुमार)


किंवा

"जीवनाचा नूर आहे वेगळा
ताल, लय अन् सूर आहे वेगळा" (पृष्ठ क्र. १, कुमार)

"मांडतो शब्दांत मी दु:खे जगाची"
भोवती माझ्या सुरांचे वलय आहे" (पृष्ठ क्र. १२, कुमार)

"गातील पक्षी इथली कहाणी
तू थांब येथे स्फुरतील गाणी" (पृष्ठ क्र. ९, कुमार)

इ. अनेक शेर वाचकांना अधून-मधून भेटतात, एखाद्या मैफिलीचा माहोलच आपल्यासमोर उभा करतात आणि असे शेर वाचताना वाचकही मनातल्या मनात 'बहोत बढिया' अशी दाद देत राहतात!

"जीवन जगणे गंमत आहे
मैफलीतली रंगत आहे" (पृष्ठ क्र. ३४, अजब)

असे लिहिणारे डॉ. 'अजब' जावडेकर असेही म्हणतात...

"जीवना तुझा 'अजब' पसारा
मीच स्वतःला शोधत आहे"(पृष्ठ क्र. ३४, अजब)

त्यांची "रोज साठवत बसतो पैसा" (पृष्ठ क्र. ५७) या शीर्षकाची नजमही वास्तवाशी मेळ खाणारी आहे. या दोन्ही शायरांची शेर लिहिण्याची पद्धत मात्र एकच वाटते. म्हणजे असं की दोघांनाही कमीत कमी शब्दांची ओळ आणि तशा दोन ओळी लिहिणे अधिक भावते; ज्याला प्रचारात 'छोटी बहर' अशी संज्ञा आहे. पाहा ना...

"वेगळे झालो तरी
राहतो एका घरी" (पृष्ठ क्र. ३८, अजब)

किंवा

"जे हवे ते माग आता
आणि चालू लाग आता" (पृष्ठ क्र. ५२, अजब)

किती सहज स्फुरलेले हे शेर आहेत! आणि शब्द किती मोजके!

"वेळ चुकली मैफलीची
काय गाऊ राग आता?" (पृष्ठ क्र. ५२, अजब)

इथे पुन्हा समयोचित रागच सादर करावा ही सांगीतिक प्रणाली विशेषत्वाने उद्धृत झाली आहे.
"तुझ्याकडे पाहूनच पटले
सौंदर्याचा भ्रम चंद्राचा!" (पृष्ठ क्र. ५४, अजब)

प्रत्येकाला प्रियेचा मुखचंद्रच अधिक सुंदर वाटत असतो. ही आंधळ्या प्रेमाची भावोक्ती इथे जेरबंद किंवा शेरबंद झाली आहे! जावडेकर बंधूंनी मराठी शायरीच्या प्रांतात टाकलेले हे पाऊल चांगलेच दमदार वाटते. केवळ 'शब्दांची नीटस जुळणी' असा सरधोपट शेरा मी या शायरीला कधीच देणार नाही. बघा ना - आणखी काही शेर-


"दोघे मिठीत घेऊ हलकेच या सुरांना
घेतो कुशीत अपुल्या लाटा जसा किनारा"

- हा शेर - किंवा

"प्रत्येक जीवनाचा आहे मजा निराळा
भिजला कधीच नाही तो सूर्यही बिचारा" (पृष्ठ क्र. १९, कुमार)

किंवा

"तुझ्या फुलांचा इथे कसा हा गंध दाटतो
येउन इतका दूर कसा मज इथे दाटतो"

आयुष्याची माती केली - लोक म्हणाले
शांतपणे मी पुन्हा नव्याने कविता रचतो" (पृष्ठ क्र. ४४, अजब)

- असे शेर!

म्हणून मला शेवटी म्हणावेसे वाटते की जावडेकर बंधू दोघांच्याही

"लेखी - केवळ भाषा नसते
ते हृदयाचे स्पंदन असते!"

असो, तुमची शायरी उत्तरोत्तर अधिकाधिक समृद्ध होत जावो ही माझी शुभेच्छा मी या ठिकाणी नमूद करतो.

बस, आप लिखते रहिये, हम पढते जायेंगे!

- पं. यशवंत देव