पु. ल. आणि अपुलं! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पु. ल. आणि अपुलं! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २१ जून, २०२६

बटाट्याची चाळ आणि झुरळ-जीवन

बटाट्याच्या चाळीत झुरळं नेहमीचीच. माणसं, झुरळं आणि बटाटे हे तीन जीव बघितले तर खोलीगणिक झुरळं सर्वाधिक, मग बटाटे आणि शेवटी माणसं अशी उतरती भाजणी होईल. अगदी तान्ह्या बाळानं तोंड वर करून आईकडे किंवा मान फिरवून बाबाकडे बघण्याआधी जिथे नजर जाईल तिथे हा सहा पायांचा प्राणी पाहिलेला असतो. त्यामुळे इथल्या कित्येक लहान मुलांच्या तोंडी पहिला शब्द 'आई', 'बाबा', 'बटाटा' असा न येता 'झुलल' असा येतो. (काही मुलांच्या मुखी पहिला घास म्हणूनही 'झुलल' गेलेलं आहे.) इतकं कशाला, म्हाळसाकांत पोंबुर्पेकरानं एकदा "मन झुललं झुललं" अशी कविता केली असता एच. मंगेशरावांनी तिला बालगीताची चाल लावली होती! अर्थात पोंबुर्पेकर वाचला - बिचाऱ्याच्या तिरळेपणामुळे तो झुरळाकडेच बघतोय असा (त्याच्या 'तिच्या'सकट) सर्वांचा समज झाल्यामुळे.

चाळीत झुरळं, बटाटे आणि माणसं यांत खोलीचं भाडं कुणी भरायचं या विषयीही अलिखित समन्वय साधला गेला आहे. (तो भाडं कुणीच भरायचं नाही असा आहे - फक्त माणसांनी मध्ये-मध्ये ती इच्छा व्यक्त केली की झालं.) बटाटे फक्त नावाचे धनी. नामा धुळा बटाटे हे नाव सार्थ करत ते (कुकरमध्ये) उकडत पडण्याआधी धूळ खात कुठल्याश्या चाळणीत मोड येईपर्यंत (गरम हवेत) उकडत पहुडलेले असतात. ते बेडूक आणि राजा या गोष्टीतल्या धोंड्यासारखे - नाममात्र.

याउलट झुरळांची प्रजा आपणच राजा असल्याच्या थाटात सगळीकडे बागडत असते. 

चाळकरी माणसं मात्र या राज्यात आपला दर्जा प्रजेपेक्षाही खुजा असल्याचं मान्य करून राहत असतात. कधी तरी कुणाच्या चपलेखाली एखाद्या झुरळाचं तन चिरडलं गेलं असेलही, पण रोज भरडलं जाण्याचं प्राक्तन मात्र माणसाचंच आहे याची चाळकऱ्यांना जाणीव आहे. 

असं असूनही बटाट्याची चाळ राजकारणापासून कधीच दूर नसते. गांधीवादी आचार्य बाबा बर्वे ते ध्येयवादी बंडू यांच्यामुळे चाळीला वेळोवेळी अनेक झेंडे मिळाले आहेत. ते फडकावणाऱ्यांचा 'चाळीचा सिंह', 'चाळीचा वाघ', 'चाळीचा छावा' वगैरे पदवी देऊन गौरवही करण्यात आला आहे. मात्र 'चाळीचं झुरळ' अशी उपाधी देण्याचं धारिष्ट्य आत्तापर्यंत कुणी केलं नव्हतं इतकं वरचं स्थान झुरळांचं आहे. 

अचानक कुणीतरी माणसांना झुरळाची उपमा द्यायची गोष्ट केली आणि चाळकऱ्यांचे डोळे खाडकन उघडले. (इतके की त्या उघड्या डोळ्यांनी आपल्या अंधाऱ्या खोलीत त्यांना आणखी काही झुरळांचं दर्शन घडलं.) पण या वर्षीच्या चाळ दिनाला 'चाळ झुरळ' हा खास पुरस्कार देण्याची मागणी करावी या विषयी 'कोअर कमिटी'ची बैठक झाली. 

मुख्य मुद्दा हा होता की कुठल्या गुणासाठी हे पारितोषिक द्यायचं.

"झुरळ त्याचं डोकं गमावल्यावरही महिनाभर जिवंत राहतं," कोचरेकर मास्तर म्हणाले. 

"मुरारबाजी फक्त काही क्षण जिवंत राहिला होता - पण लढला शौर्यानं - मुंडकं गेलं पण धड लढत होतं," इतिहास संशोधक बाबूकाका खरे यांनी माहिती पुरवली. त्यांना पुरंदरचं पुण्यस्मरण झालं. इथे मंडळी झुरळाला धुरंधरच्या जोडीला बसवत होती.

"झुरळ महिनाभर न खाता राहतं." कोचरेकर मास्तर म्हणाले, "वाघ-सिंहालाही हे शक्य होत नाही. झुरळ इतकं महान असतं!" 

"साला तू यात बक्षीस कसला देणार?" त्रिलोकेकर भडकले, "उपास जो जास्त करेल त्याला? मग हा बर्वेच जिंकेल." आचार्य बाबां बर्वे यांना पारितोषिक मिळण्यापेक्षा आपल्याला उपास घडेल हा विचार करणं त्यांना जड जात होतं.

"झुरळ ताशी तीन मैल वेगानं चालतं. म्हणजे माणसाच्या चालण्यापेक्षा..." 

"पण माणूस जर चालण्याऐवजी धावला तर एका तासात ... किती तरी जास्त पुढे जाईल," त्रिलोकेकर नक्की किती हे माहिती नसल्यामुळे फक्त अंदाजानं म्हणाले, "साला हे काही खरं नाही. अजून काही तरी वेगळा पॉईंट काढ." 

"चीनमध्ये झुरळाचं लोणचं करतात. पण झुरळ खाल्लं तर पोट बिघडू शकतं." मास्तरांनी उरली सुरली माहिती दिली.

"मग आता काय तू बायकांची 'आचार स्पर्धा' ठेवणार काय?" त्रिलोकेकरांनी हा विचारही (अंगावरचं झुरळ झटकल्यासारखा) झटकून टाकला.

"गनिमी कावा! औरंगजेबानं शिवाजी महाराजांना 'पहाड का चुव्वा' म्हटलं होतं, पण खरं तर उंदीर म्हणण्यापेक्षा झुरळ ही उपमाच योग्य ठरली असती. त्यालाही बहुधा झुरळाची भीती वाटत असावी," बाबूकाका तेवढ्यात म्हणाले. औरंगजेब झुरळाला घाबरत असेल या कल्पना-विलासानं मंडळी जरा सुखावली.

"चाळीतला गनिमी कावा कसा सिद्ध करणार?" मास्तरांनी विचारलं. सोमण त्यांचं वर्तमानमात्र पेपरवाला दरवाजाच्या कडीला अडकवत असतानाच शिताफीनं पळवतात, नळाला आपली बादली पहिली लावण्यासाठी बायकांच्या शक्ती आणि युक्तीची जणू शर्यतच लागलेली असते आणि नव्या मालकाचा (हो, ते येईल पुढे) हस्तक भाडं वसूल करायला आला की चाळीत लपाछपीचा खेळ रंगतो हे गनिमी कावे दखलपात्र असले तरी खुले-आम बक्षीसपात्र आहेत का हा मुद्दा संभ्रमात टाकणारा होता.

"पुरस्कार कसला देताय? उलट सगळ्या झुरळांचा नायनाट केला पाहिजे," प्रा. नागूतात्या आढ्ये नेहमीप्रमाणे सर्वांपेक्षा वेगळी भूमिका घेऊन उतरले रिंगणात. 

"झुरळांचा बंदोबस्त करणं हे मालकांच्या रेमिटमध्ये येतं." त्रिलोकेकरांचं रेमिट अनेकांना न कळल्यामुळे बाकीच्यांची तोंडं मिटली - थोडा वेळ.

"आपण बरोबर बोललात, आपण फक्त झुरळं आणि माणसं या सहजीवनाबद्दल बोलू शकतो," आचार्य बोलते झाले, "मात्र आपले नवीन मालक आपण जर पुरस्कार द्यायचा ठरवला तर त्याच्या विरोधात नसतील. तो आपला प्रश्न आहे."

आपला प्रश्न आहे हे मान्य, पण उत्तर काय ते कुणीच देत नव्हतं अशा पेचात ही सभा काही न ठरताच बरखास्त झाली. 

त्यातच अलीकडे बटाट्याच्या चाळीच्या मालकीत पुनः बदल झाला होता. मेंढे पाटलांनी चाळीतल्या अस्वस्थतेला (त्यांच्या भाषेत 'अस्वच्छतेला') कंटाळून ती एका पोपट नामक गुजराथी व्यावसायिकाला विकून टाकली. 

पोपटभाईंनी चाळीत येऊन अतिशय प्रभावी भाषण केलं. 

"मित्र हो", या शब्दांत आपल्या भाषणाची सुरुवात करून त्यांनी चाळकऱ्यांना खिशात टाकलं. पुढे म्हणाले, "आपण चाळीचा खरा विकास आता सुरू करणार आहोत. बटाटे आणि मेंढे पाटील यांच्यामुळे चाळ मागे पडली. आपण आत्मनिर्भर बनलं पाहिजे. चाळीत ज्ञानी लोकांची कमतरता नाही. इथे प्रत्येक जण चाळ-गुरू आहे. त्यांची आपण उपासना केली पाहिजे."

इथे त्रिलोकेकरांनी बाबांकडे प्रश्नार्थक चेहऱ्यानं बघितलं आणि बाबांनी "उपासना करणं म्हणजे उपास करणं नाही" असं हलक्या आवाजात त्यांना समजावताच त्यांचा चेहेरा खुलला. 

"उपास ना करा असाच म्हटला आसा!" त्यांच्या शेजारचे जनोबा रेगे शेजारच्या काशिनाथ नाडकर्णींच्या कानात कुजुबुजले. अर्थात जनोबा कुणाला बुजत नाही. त्यामुळे ते स्टेजवरच्या चापशीनेही ऐकलं आणि रेग्यांना खूण करून चापलं! 

पोपटभाई पुढे बोलतच होते,

"चाळ संस्कृती उच्च आहे. परदेशातून लोक आपली चाळ बघायला आले पाहिजेत. इंग्रजांनी दोनशे वर्षं भारतावर राज्य केलं. आपल्याला लुबाडलं. अगदी कोहिनूर पळवला. पण त्या देशात एक चाळ वसवता आली नाही. त्या लोकांना आपला हेवा वाटतो. वंदे चाळ, वंदे भारत!"

भरपूर टाळ्या आणि कौतुकाचे स्वर ऐकत त्यांनी मग घोषणा केली, 

"आपण "पोपट समृद्धी निधी" असा एक आपण फंड सुरू करणार आहोत. विकासात सर्वांचा सहभाग हवा." 

चाळीच्या चौकात एक दानपेटी लागली आणि चापशीकडे तिची किल्ली सुपूर्द करण्यात आली. अनेकांनी प्रश्न विचारायला हात वर केले, पण ते आपल्या अनुमोदनासाठी आहेत असा समज करून घेऊन आपलेही हात हलवत कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देता पोपटभाई निघून गेले!

लोक भारावून गेले होते. जनोबा रेगेच्या "अरे पण ह्यांका बदल नक्की कसलो करुचो आसा?" या प्रश्नाला उत्तर कुणाकडेच नव्हतं. पण "गप रे मेल्या जनोबा, शंका काढू नकोस" यात सर्वांनी त्याला गप्प बसवलं आणि "वंदे चाळ"चे नारे (पोपटपंची?) चाळीत घुमू लागले. ध्येयवादी बंडू आणि त्याचे सुपुत्र यात आघाडीवर होते. विशेषतः वर्गणी गोळा करण्यात. शिवाय अतिशय सकारात्मक संदेश चाळीचा नोटीस बोर्ड ते व्हाट्सअप पर्यंत सगळीकडे पसरवण्यात. चाळीत नवीन काय होणार आहे यापेक्षा आधीच्या मालकांनी काय केलं नाही हे अस्वच्छ शब्दांत (अस्वस्थ नव्हे) सांगितलं जाऊ लागलं.

चापशीनं पोपटरावांनी पेस्ट कंट्रोलची योजना आणली आहे अशी बातमी आणली तेव्हा आता झुरळांचं काय होणार या विचारानं सर्व चाळकऱ्यांना दुःख झालं. इतक्या वर्षांची सोबत दुरावणार हा कसला विकास असा प्रश्न ते (बंडू आणि नागूतात्या सोडून) विचारू लागले. पोंबुर्पेकरानं 'मन झुरंलं झुरंलं' अशी नवी साद घातली आणि एच. मंगेशरावांनी त्या कवितेला सॅड चाल लावली. चाळदिनाला पुरस्कार देता आला नाही तरी निदान स्मरणातून झुरळ जिवंत रहावं उदात्त हेतूनं ते 'चाळ गीत' व्हावं अशी आचार्य बाबा बर्वे यांनी इच्छा व्यक्त केली.

दरम्यान पेस्ट कंट्रोलवाले चाळीत आले. तळ मजल्यावरील चापशीचं किराणा मालाचं दुकान, आत्मू माईणकराचं हॉटेल, हातवळणेचा दवाखाना आणि इतर दुकानांचं पेस्ट कंट्रोल करून निघून गेले. सगळ्या व्यावसायिकांनी पोपटभाईंची मोठमोठी रंगीबेरंगी चित्रं असलेली चाळीच्या विकासाची जाहिरात आपल्या दुकानाबाहेर लावली. त्यांवर झगमगीत दिवे लावल्यामुळे चाळ बाहेरून चमकू लागली. 

'चाळ दिना'चं या वर्षी 'चाळ समृद्धी दिन' असं पोपटभाईंच्या संदेशाद्वारे नामकरण करण्यात आलं. बंडू 'चाळ झुरळ' या किताबाचा पहिला मानकरी ठरला. 'मन की बात' ओळखणारा मालक भेटला म्हणून चाळकरी आनंदले आणि 'अंदर की बात' न ओळखणारे चाळकरी भेटले म्हणून मालकाही!

आत्मू माईणकराच्या पदार्थांना पूर्वीची चव राहिली नाही एवढा एक बदल सोडला तर वर राहत असलेल्या चाळकऱ्यांसाठी काहीच बदललं नव्हतं. झुरळ, बटाटे आणि माणसं यांचं समीकरण (की त्यांच्या स्तरांतलं विषमीकरण?) पूर्ववतच होतं... 

- कुमार जावडेकर 

शनिवार, १८ एप्रिल, २०२६

ग' गच्छंतिचा

वास्तविक 'मी कझाखस्तानला जाऊन आलो' या एका वाक्यात हे प्रकरण संपवता येईल; पण काय करणार?  ... मला (अजून तरी) विसविशीत क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेट आवडतं.

'कझाखस्तान' या देशात जाण्याची इच्छा बाळगणारा मनुष्य मी अजून पाहिला नाहीये. (इच्छा नसणारे अनेक बघितलेत.) कदाचित, 'पाक' लोकांचा पाकिस्तान तसा 'कजाग' लोकांचा कझाखस्तान अशी व्युत्पत्ती असावी!  (पाकिस्तानला जायची मात्र माझी मनोमन इच्छा आहे.) माझ्या मनात मात्र तिथे जाताना थोडं कुतूहल होतं. तो युरोपातल्या देशांप्रमाणे 'प्रगत' नसेल, (आपल्या भारतासारखीच गत असेल) असं वाटत होतं.

मँचेस्टर ते ॲमस्टरडॅम हा प्रवास - जितपत चांगला होऊ शकतो तितपत चांगला झाला - म्हणजे विमानात कॉफी (इंग्लंडच्या सर्व गायी तूर्तास गाभण काय रे... म्हशी तर तिथे नसतातच – असं, पुलंना स्मरून, मी मनातल्या मनात म्हणून घेतलं) आणि दोन पाव (चीझ घातलेले) मिळाले. विमान आम्ही आत शिरल्यावर चांगलं अर्धा पाऊण तास उशिरा निघालं; पण वैमानिकानं तत्परतेनं हवाई वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे घडत आहे असं सांगून आम्हां प्रवासी मंडळींना दिलासा(!) दिला. पु. लं. च्याच 'पहाटे पाचला निघणारी एस. टी....  ठेचेवर ठेच म्हणत जेव्हा सड्यावर आली तेव्हा सकाळचे सात वाजले होते. ' - यात आणि त्यात फारसा फरक नाही. मागे फ्रांकफुर्टला विमानातल्या प्रवाशांची गणती (गिनती?) चुकल्यामुळे माझं विमान चांगलं तासभर उशिरा सुटलं होतं.

असो. ॲमस्टरडॅमला आम्ही (माझा ‘साहेब’ही माझ्या बरोबर होता, इंग्लंडपासूनच.  इतर दोन साथीदार इथे येऊन भेटणार होते) भरगच्च नाश्ता केला. दुसरं विमान ३-४ तासांनंतर असल्यामुळे विमानतळावरची शोभा बघितली आणि लॅपटॉपची उरलीसुरली बॅटरी वापरून टाकली.  मध्येच मी साथीदारांना आठवणही करून दिली की आमचा परतीचा प्रवास ९/११ या दिवशी (२००९ मधल्या) होणार होता. मग ९/११ या विषयावर (२००१ मधल्या) थोडा वेळ चर्चा झाली. असं करता करता पुढच्या विमानाची वेळ झाली आणि आम्ही 'एअर अस्ताना'च्या विमानात पोचलो. 'अस्ताना' नाव ऐकून 'मुन्नाभाई' आठवणं साहजिकच होतं. हे 'रशियन' नाव आहे की 'कझाख' हे मला माहिती नाही. ('कझाख' ही एक वेगळी भाषा आहे.)

विमान प्रवासात मी खिडकीतली जागा मागितली की हमखास मला अशी खिडकी मिळते की जिच्यातून फक्त विमानाचे पंख दिसतात. शिवाय मी नेहमीच पुस्तक घेऊन जातो असं नाही; यावेळी नेलं होतं - पण ते वर बॅगेत होतं.  सीटमागचे टी. व्ही. ही सोय लुफ्तांसाच्या भारतात जाणाऱ्या विमानांप्रमाणे एअर अस्तानातही नव्हतीच.  शेवटी मी शांतपणे इन-फ्लाइट मॅगेझीन वाचायला लागलो. ते चांगलं तीन-चार तास पुरलं. त्यात हंपी आणि बाली यांबद्दल अतिशय सुंदर लेख वाचायला मिळाले. (नाशिकच्या पोस्टात कानडी फॉर्म का मिळावा?... पु. ल. आठवल्याशिवाय राहत नाहीत.) 

रात्री आठ वाजता अटिरॉ विमानतळावर जेव्हा विमान उतरू लागलं तेव्हा विमानतळाची सुबक ठेंगणी रचना पाहून मन भरून आलं.  एकदा एअर सहारानं लखनौ विमानतळावर गेलो होतो, ते आठवलं. सगळं काही अगदी आटोपशीर होतं.  उगाचच कुठलाही बडेजाव नाही.

मी सामानातून माझ्या 'विसा' साठीची आवश्यक कागदपत्रं काढली. माझ्या कंपनीच्या कझाखस्तानातल्या 'अल्माटी' या शहरातल्या सहकारी बाईंनी पाठवलेली दोन पत्रं माझ्याकडे होती. ती दोन्ही कझाखस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं शिक्कामोर्तब केलेली होती आणि त्यातलं एक पत्र मी 'अटिरॉ' विमानतळावर दाखवलं की 'विसा' मिळालाच अशी ठाम इ-मेलही माझ्याजवळ होती.

इथे माझे अबुधाबी प्रवासाचे दोन अनुभव लिहिणं आवश्यक आहे.

पहिल्या अबुधाबी प्रवासासाठी मी लंडनला विसा काढायला गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यानं माझ्याकडनं अर्ज, पारपत्र आणि शंभर पौंड घेतले आणि कुठलीही रसीद न देता 'तीन दिन बाद पता करो - या तो विसा मिलेगा या पैसा वापस' असं इंग्रजीतून सांगितलं होतं. मी '... पण पावती तरी द्या' वगैरे हट्टाग्रह करून बघितला होता; पण 'डोण्ट वरी सार' असं म्हणून त्यानं मला परत पाठवलं होतं. मग तीन दिवसांनी एका कुरिअर कंपनीला ऑथॉरिटी लेटर दिल्यावर मला माझं पारपत्र (विसासहित) परत मिळालं होतं; त्याबरोबर पावती मिळाली होती आणि प्रवासही व्यवस्थित पार पडला होता.

अबुधाबी/दुबईसाठी तुम्ही तिथल्या हॉटेलांमार्फत विसा मागवू शकता अशी माहिती मिळाल्यामुळे मी पुढच्या वेळी तो मार्ग अवलंबला. माझ्या कझाखस्तानच्या पत्राप्रमाणेच मला एक (अरेबिकमधलं) पत्र मिळालं. ते आणि पारपत्र घेऊन मी विमानातून बाहेर आलो,  तर एक सुंदर सुहास्यवदन (भारतीय वंशाची असावी) तरुणी माझ्या नावाचं प्लॅकार्ड घेऊन उभी होती. तिनं मला कुठल्याही रांगेत उभं न करता (इतरांच्या कुत्सित नजरा चुकवून) सर्व उपचार पार पाडत विमानतळाबाहेर आणलं होतं. मी टॅक्सीत बसतोय याची खात्री करूनच ती परत फिरली होती.

'ऑन अरायव्हल विसा' घेतला तर एवढं 'रेड कार्पेट' वेलकम मिळू शकतं याची मला कल्पना नव्हती. पण कझाखस्तान हा पूर्वीच्या साम्यवादी सोविएत युनियनचा भाग असल्यामुळे तिथलं कार्पेटही 'रेड' असायला हरकत नाही असं मला वाटायला लागलं होतं.  माझ्याकडची दोन्ही पत्रं रशियन (किंवा कझाख) भाषेत असल्यामुळे मला त्यांच्यावरचा पारपत्र क्र. आणि तारखा फक्त वाचता येत होत्या. त्यातलं एक पत्र अटिरॉला 'सिंगल एंट्री विसा' साठी आणि दुसरं पत्र लंडनला (परतल्यावर) 'मल्टिपल एंट्री विसा'साठी द्यायचं होतं. मी आत्मविश्वासानं 'विसा काउंटर'वर पहिलं पत्र पुढे सरकवलं. अधिकाऱ्यानं वाचून बघितलं आणि म्हणाला 'सॉरी, आय कांट ग्रांट यू विसा'. मी दुसरं पत्र पुढे सरकवलं.... उत्तरात फरक पडला नाही!

पुढचा काही काळ मी माझा भ्रमणध्वनी सुरू करण्यात, नेटवर्क शोधून काढण्यात आणि कंपनीतल्या संबंधित व्यक्तींशी संपर्क करण्यात घालवला. माझा साहेब माझ्या शेजारीच होता. त्याच्याकडे गेल्या वर्षीच काढलेला 'मल्टिपल एंट्री विसा' होता. इतर दोन साथीदारही सुटले. तेवढ्यात एक मुंबईचा मराठी मनुष्य येऊन त्याची कागदपत्रं दाखवून विसा घेऊनही गेला. मी मात्र त्या आटोपशीर विमानतळावर आपला कारभार कधी आटपतो याची वाट बघत उभा होतो. तो लवकरच आटोपणार हे लक्षात आल्यावर मी माझ्या साहेबाच्या हातात आमच्या मीटिंगच्या संबंधातली फाईल स्वाधीन केली आणि तो इतरांबरोबर हॉटेलवर निघून गेला. ते सगळेजण जाताना अगदी प्रेमानं मला 'सी यू टुमारो' म्हणाले खरे; पण माझा त्यावर काही फारसा विश्वास बसला नाही. यावेळी माझा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला असावा, कारण विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी माझं छायाचित्र काढलं (दुर्दैवानं ते मला बघायला मिळालं नाही) आणि माझं पारपत्रही ताब्यात घेतलं. मग दोन-चार रखवालदारांसोबत विमानतळाच्या शेजारी असलेल्या बराकीत मी गेलो. ते त्या रात्रपाळीला येणाऱ्या रखवालदारांचं वसतिगृह असावं. तिथल्या एका कॉंफरन्स रूम सारख्या दिसणाऱ्या खोलीत त्यांनी मला बसवलं. मग एका बाईंनी मला येऊन, माझ्या अशा येण्याचं कारण देणारं एक पत्र लिहायला सांगितलं. त्या इंग्रजी पत्रातला 'मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स' हा शब्द काही त्यांना कळला असं मला वाटलं नाही. इतर रखवालदारांना काही विचारलं तर ते मला हातांनी विमान उडाल्याचा अभिनय करून 'ॲमस्टरडॅम' असं सांगत होते! ॲमस्टरडॅमचं विमान दुसऱ्या दिवशी सकाळी असल्यामुळे रात्र याच खोलीत काढायची हे माझ्या लक्षात आलं. मग मी घरी फोन करून झाल्या प्रसंगाची कल्पना दिली. कंपनीतल्या स्थानिक मंडळींनी मला आदल्याच दिवशी विसाचे नियम बदलले आहेत असा एस. एम. एस. पाठवला. मी त्यांना मी  एका दुसऱ्या मुंबईकराला विसा घेताना बघितलं होतं हे सांगून उगाचच त्रास दिला नाही.

मी बॅग उघडून पुस्तक बाहेर काढलं. 'पर्ल बक' या नोबेल पारितोषिकप्राप्त लेखिकेची 'गुड अर्थ' ही कादंबरी वाचायचा संकल्प मी अनेक वर्षं करत होतो; पण दोन वर्षापूर्वी साठ-सत्तर पानं वाचल्यावर पुढची वाचायचीच राहून गेली होती. वाचता वाचता लक्षात आलं की आपल्या जेवणाचं काय? (मी देहभान हरपून वाचू शकत नाही.) अटिरॉचे रात्रीचे अकरा वाजले होते आणि इंग्लंडमधले सात! इतका वेळ भूक लागली नसली, तरी पुढे लागू शकणार होती.  मी दुसऱ्या खोलीतल्या रखवालदाराकडे जाऊन त्याला जेवणाबद्दल विचारलं. त्यांनं 'तुझ्या बाहेर गेलेल्या सहकाऱ्यांकडून मागव' असा सल्ला दिला. मी ते शक्य नसल्याचं सांगितल्यावर 'काही तरी व्यवस्था करतो' असं म्हणाला. त्यानं मला कोरा चहा आणून दिला. (मला कोरा चहा आवडतो.)

हळू हळू त्या रखवालदारांशी माझी चांगली तोंडओळख झाली. भाषा कळत नसली तरी हसण्यावर (हसण्यावारी?) बऱ्याच गोष्टी निभावून नेता येतात! त्यांनी मला पुन्हा एकदा चहा (कोरा - मला आवडतो - हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे) आणि भरपूर बिस्किटं आणून दिली.  खाऊन झाल्यावर माझ्यासाठी एक फोल्डिंग कॉट, गादी, उशी आणि चादरही आणली. मला 'खेड्यातली माणुसकी' ('म्हैस') आठवली... एक मात्र खरं होतं - ही सगळीच माणसं साधी होती. भारतातल्या माणसांसारखीच, पॉलिश न केलेली. कदाचित 'गुड अर्थ' वाचत असल्याचाही परिणाम असावा. चीनमधला शेतकरी, कझाखस्तानातली माणसं आणि भारतातले पूर्वानुभव (तुरुंगातले नव्हेत - कृपया गैरसमज नसावा) यांचा संबंध मनात नक्कीच जोडला गेला.

भारताची आठवण यायचं अजून एक कारण म्हणजे खोलीत थोडेसे डास आणि माश्या होत्या. सुरुवातीला मला त्यांचीही सोबत/गंमत वाटली. हे प्राणी इंग्लंडच्या हवेला फारसे येत नाहीत. मला पलीकडच्या रखवालदारांच्या खोलीत लावलेलं एक ‘गुड-नाईट’ही (त्याला तिथे ‘गुड-नाईट’ म्हणतात की ‘ऑल-आउट’?) दिसलं. अर्थात या सोबतीमुळे मी झोपेचा विचार रद्द करून पुस्तक वाचायचा संकल्प तडीस न्यायच्या मागे लागलो आणि रात्रीत दोनशेच्या वर पानं वाचून काढली.

सकाळी (रखवालदार) उठल्यावर माझी पुन्हा विमानतळावर रवानगी करण्यात आली आणि ॲमस्टरडॅमच्या विमानात बसवून देण्यात आलं. विमानात खाण्यात दवडलेल्या वेळाच्या व्यतिरिक्त मी झोप काढली. सुदैवानं माझ्याकडे युरोपात लागणरा 'शेंघन विसा' होता. त्यामुळे ॲमस्टरडॅमच्या अधिकाऱ्यानं अतिशय प्रेमानं माझी विचारपूस केली. मी हा घोटाळा सांगितल्यावर 'मायनर प्रॉब्लेम' असं म्हणून तो मला माझं पुढचं तिकीट काढून देण्यासाठी स्वतःहून घेऊन गेला.  

कागदपत्रांत चूक काय असावी (मला रशियन / कझाख येत नाही) याचा मला रात्री उशिरा अंदाज आला होता. ते पत्र चुकून  'अल्माटी' विमानतळासाठी बनवण्यात आलं होतं आणि मला 'अटिरॉ'ला जायचं होतं. मी अटिरॉच्या अधिकाऱ्यांना अल्माटीला जाऊ का वगैरे विचारण्याचा प्रयत्न केला होता; पण तेवढं इंग्रजी त्यांना कळलं नाही. 'जाते थे जापान, पहुंच गए चीन' हे पूर्वी होत असावं, हल्ली मात्र अगदी एकाच देशाच्या दोन शहरांबाबत असं झालं तरी होते ती 'गच्छंति'!

... आता मी लंडनला दूतावासात जाऊनच  विसा काढणार आहे - कझाखस्तानसाठी आणि अबुधाबीसाठीही.

- कुमार जावडेकर

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

निवडक अ–पुलं: नाथा का मत!

"पण... ‘प्रेमाला उपमा नाही’ असं तर मी लहानपणापासून ऐकत आलोय." एक जण समोर ‘कैवारी’ म्हणून उभ्या ठाकलेल्या त्याच्या गुरूला हे सांगत होता. गुरूच्या चेहेऱ्यावर हा ‘कैच्या कै’ सांगतोय हा भाव होता.

"पण प्रेमात पोहे आहेत की!" दुसरा.

"पोहे लग्नात, प्रेमात कुठले? अशी घोडचूक करू नका." घोडचूक कोणती - पोहे कधी मिळतात हे माहिती नसणं ही की लग्न करणं ही - हे स्पष्ट न करता गुरू 'उसळ'ले.

"खरंच की. माझी सरमिसळ झाली," पहिल्या विद्यार्थ्यानं कबुली दिली.

"प्रेमात अशी मिसळ करू नका. प्रेम निर्भेळ असतं."

"म्हणजे मिसळ, भेळ काहीच चालत नाही?"

'प्रेम ही काही खायची गोष्ट नाही' या विषयावर नाथा कामत हे चर्चासत्र घेत होता... आणि ’प्रेमात आपली डाळ कशी शिजणार’ याची चिंता असलेले ते सगळे चेहरे नाथाकडे ‘आ’ वासून बघत होते.

"प्रेम करणं म्हणजे नुसती पोळी भाजून घेणं नसतं." नाथानं स्पष्ट केलं.

"पण मग प्रेमात पडायचं कसं?"

"अरे बाबा, प्रेमात पडू नका. प्रेमात शिरा! नुसते नजरेस पडू नका, तर डोळ्यांवाटे हृदयात शिरा!"

आपल्या आयुष्यात न घडलेल्या परिकथा, नाथा कामत या परिसंवादांच्या रूपानं, आपल्या परीनं, अशा प्रकारे सतत लोकांच्या गळी उतरवत असतो.

‘नाथा का मत' या त्याच्या युट्यूब चॅनेलचे अनेक फॉलोअर्स आहेत. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’ हे ब्रीद घेऊन त्यानं ते सुरू केलं आहे... त्याच्या पॉडकास्टवर तो पायरी–पायरीनं एकेका भागात सफल प्रेमाची बीजं पेरत असतो. आपली पायरी हापूस कधी झाली नाही हा प्रश्नही तो स्वतःला पुसत नाही. प्रेमात अनेकदा पडणं- बरं नुसतं पडणं नाही तर प्रत्येक वेळी ठेच लागून पडणं आणि मार खाणं - ही गुणवत्ता प्राप्त केलेला, मात्र तरीही त्या विषयाची शिष्यवृत्ती बाळगणारा तो एकमेव गुरू असावा.

नाथाचा आणि माझा संपर्क अनेक वर्षं तुटला होता. त्याच्या लग्नात मी त्याला भेटलो होतो. त्यानंतर चार-पाच दिवसांतच, बायकोच्या उपासाला लागणारे साबुदाणे कुठे मिळतात हे विचारायला, तो माझ्या दारात आला होता. त्याच्या संसाराची खिचडी आता शिजू लागली आहे हे त्यावरून मला कळलं होतं. (अशा एकादशी - संकष्टीच्या उपवासचक्रात इतके दिवस उगाच समकष्टी मानत असलेल्या माझ्यासारख्या मित्राचा सहवास मात्र तो विसरून गेला.) वास्तविक - वागळेंच्या मुलीशी विवाह केल्यामुळे त्याची दुनिया पूर्वीपेक्षा वेगळी झाली होती. ती आता माझ्या विश्वासारखी झाली होती. ‘बाबा रे तुझं जग निराळं आणि माझं निराळं’ हे एखादी नवी आगळीक करून आल्यावर म्हणायचं वाक्य आता त्याला उच्चारता येणार नव्हतं... निदान असा माझा समज झाला होता.

यानंतर अचानक नाथाची गाठ पडली ती खूप वर्षांनी – एका 'व्हॅलेंटाईन डे'च्या कार्यक्रमात. ज्या महाविद्यालयात मी भाषा विषयाचा प्राध्यापक आहे तिथेच नाथा ही व्यक्ती प्रेमाची परिभाषा शिकवायला उगवेल असं मला वाटलं नव्हतं. पण त्याला ओळखणं मला कठीण गेलं नाही. थोडेसे अजून मागे सरलेले आणि पांढरट झालेले केस हा बदल सोडला तर नाथा तसाच होता. टापटीप. उरलेल्या केसांचा तसाच भांग. जराही न सुरकुतलेला कडक इस्त्रीचा शर्ट, टायची गाठ, हातावर कोट, चकचकीत पॉलिश केलेले शूज - सगळं तसंच.

त्याचा घोळका आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये भरला होता. मला तिथे थबकलेला बघून त्यानं खुणावलं, "संपत आलाय आजचा सेशन. थांब. भेटूच." 

त्याचे विद्यार्थी/ विद्यार्थिनी निघून गेले आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांत नाथा आता एका १७–१८ वर्षांच्या मुलाचा बाप झाला आहे हे मला कळलं. अर्थात आमचं बोलणं भलत्याच विषयावरून सुरू झालं होतं.

"शित्या सरमळकर आठवतो का तुला?" 

"वेलकम स्टोअर्सवाला ना?"

"तोच. शरयू प्रधानने तीन आण्यांच्या सेफ्टी पिना घेण्यासाठी दहा रुपयांची नोट दिली म्हणून तिच्यावर खेकसला होता तो खेकडा! त्याला प्रीती नावाची मुलगी आहे."

हंबरते ती हम्मा तसं खेकसतो तो खेकडा करणं मला गंमतीदार वाटलं. शित्यासमोर नाथा हे बोलेल की नांगी टाकेल हा प्रश्नही मनात येऊन गेला. नाथाच्या संभाषणाचा ’रोख’ एक मुलगी असा असला की त्यात तिच्या बापाबद्दल अनेक ’उधार’ गोष्टी येतात. 'आज रोख आणि आजच उधार' हे तत्व वापरून. त्याच्या या वृत्तीत अजूनही बदल झाला नाहीये ही गोष्ट माझ्या ध्यानात आली.

"दुकानात असते प्रीती कधी कधी. माझा मुलगा जातो ना तिथे रेजर ब्लेड्स वगैरे घ्यायला. शित्या असतोच लोंबकळत अवती-भवती अकॉर्डियनच्या भात्यासारखा." 

नाथा शित्यावरून भात्यावर गेला. हे बोलताना नाथाच्याच छातीचा भाता धाप लागल्यासारखा वर खाली होत होता.

"तुझा मुलगा प्रेमात पडलाय का तिच्या?" 

"छे रे... एकदा बापाची नजर चुकवून प्रीतीच म्हणाली त्याला, ‘तुमच्या वडिलांबद्दल खूप ऐकलं आहे. त्यांना एकदा कॉलेजात बोलवा ना भाषणाला.’ एकाच वर्गात आहेत दोघं, पण वेगवेगळ्या महाविद्यालयांत." 

"काय सांगतोस?" 

"तेव्हापासून हा उद्योग सुरू झाला. त्यातच व्हॉट्सॲप वरून अनेक जुन्या मैत्रिणींनी संपर्क करून आपली मुलं माझ्या मार्गदर्शनासाठी पाठवायला सुरुवात केली. शरयू प्रधान, रेखा गोडबोले, सुषमा नेने, शांता गोळे, लिली पेंडसे, सरोज केरकर... किती नावं घेऊ?"

इतक्या बायकांची नावं एकत्रितपणे तर मी 'निरमा'च्या जाहिरातीतही ऐकली नव्हती!

"बायकोला माहिती आहे तुझ्या?" मी घाबरून मला जे सुचू शकतं ते विचारलं. 

"तीही मला लीड्स देत असते. श्यामा चित्रे आठवतेय?"

"न आठवायला काय झालं? तुझी प्रत्येक–" 

"माझ्याशी लग्न झालं असतं तर लग्न, घटस्फोट, त्यानंतर दुसरा विवाह आणि अखेर मृत्यू –आत्महत्या वा मर्डर– ह्या सगळ्यांतून वाचली असती असं माझीच बायको ग्रुप्सवर सांगत असते."

"आणि तुझा मुलगा?" 

"प्रीती त्याच्यावर प्रेम करते असा माझा संशय आहे. मला भेटायला म्हणून येते कधी कधी, त्या – शाळेतल्या ड्रिलमध्ये वापरल्या जाणाऱ्या मळक्या ढोलाची सर नसलेल्या – तिच्या सरमळकर बापाला चुकवून. प्रत्यक्ष नजर राज कुठे आहे त्याकडे असते."

नाथा व्हिलनच्या नावाला स्वरवाद्याची तर आडनावाला तालवाद्याची विशेषणं देऊ शकतो यात मला विशेष असं काहीच नव्हतं. फक्त त्याच्या मुलांचं नाव राज आहे हे नवं यावरून समजलं मला.

"राज? तुझ्या मुलाला शोभेल असं नाव आहे." 

नाथा माझ्या बोलण्यातला उपहास समजण्याच्या पलीकडे गेला होता, नेहमीप्रमाणे.  

"बायको एका सिनेमाला घेऊन गेली होती. त्यातला हीरो आवडला मला. त्याला अरेंज्ड मॅरेज करायचं आहे असं म्हणतो तो नेहमी."

एका दमात नाथा उत्तरला. त्यातलं पहिलं वाक्य एक घटना सांगणारं, दुसरं त्या चित्रपटातल्या 'राज' या नायकावर आधारित तर तिसरं नाथाच्या स्वत:च्या 'राज' या सुपुत्रावर म्हटलेलं होतं ही तोडफोड करायला मला जरा वेळ लागला. पण निदान नाथाचे सालस आई-वडील आणि निष्पाप भाऊ यांच्या वळणावर त्याचा मुलगा गेला हे ऐकून मला जरा हायसं वाटलं.  

"त्यात काय वाईट आहे? तू नाही का केलंस शेवटी? आणि मीही –" 

"तो जमाना गेला आता..." 

"प्रत्येक आई–बाप असंच म्हणतात आपल्या मुलांबद्दल." 

"खरं आहे."

"मग तू कशाला असे प्रेम शिकवायचे उपद्व्याप करतोस? राजसाठी मुलगी शोधायला वेळ आहे की तुला – जर प्रीतीचं नाहीच जमलं त्याच्याशी तर –"

"बाबा रे, तुझं जग निराळं आणि माझं निराळं." शेवटी नाथाला हे माझ्यावर फेकायची संधी मिळाली. तो पुढे म्हणाला,

"मला सांग. तू भाषा का शिकवतोस?"

"मला आवडतो तो विषय. मी शिकलो आहे. मुलांना व्याकरण, आशय वगैरे स्पष्ट करून सांगताना मजा येते मला."

"तू भाषा या विषयावर प्रेम करतोस. मी प्रेम या विषयावर प्रेम करतो. मी त्याचं व्याकरण, त्याचा आशय मुला–मुलींना सांगतो. मला मजा येते."

नाथा प्रेम–विद्याविभूषित आहे याबद्दल कुणाचं दुमत नसावं.

मी विचारात पडलो. नाथानं लिहिलेलं सॉनेट सदू अभ्यंकरानं शांता गोळेला स्वत:चं म्हणून दिलं किंवा नाथाबद्दल चौपाटीवरच्या वाळूत लिहिलेली अक्षरं विसरून श्यामा चित्रे मधू शेट्याच्या बॅडमिंटनवर भाळली ह्या गोष्टींमध्ये त्या मुली आधी खरंच नाथाच्या प्रेमात पडल्या होत्या का?

माझ्या लक्षात आलं. पूर्वी संशय होताच, आता खात्री पटली – 

नाथाच्या प्रेमाची ती चालती–बोलती प्रतीकं होती. त्याच्या प्रेमावरच्या प्रेमामुळे तो स्वतःला त्या कथांमध्ये गुंफत होता. त्यांचे मग त्यानं अनेक – एक हिरॉईन, एक व्हिलन आणि त्यांच्यात परिकथेतल्या शापित राजकुमाराप्रमाणे असलेला असा नाथा – असे ट्रेलर्स तयार केले. त्यांचं रूपांतर पूर्ण पटकथेत झालं नाही याचं दुःख त्यानं मला सांगितलं... पुढच्या ट्रेलरच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार करता करता...

एकदा संसार–चित्रपट सुरू झाला आणि मग त्यानं ती मुख्य भूमिकाही जबाबदारीनं निभावली / आणि अजूनही निभावतोय.

नाथाचे लग्नाआधीचे लोणकढी मिसळलेले खयाली पुलाव असोत वा लग्नानंतरच्या संसाराचं सार वा आता तो चरित्र नायक बनून देत असलेला संदेश. या सर्वांत मिठास आणणारा एक समान घटक होता- तो म्हणजे त्याची प्रेमावारची अतोनात प्रीती.

'प्रीती'चा विचार करणारा नाथा हे फक्त त्याचा चिरंजीव अनाथ राहू नये म्हणून हे करत नव्हता. किंवा त्याच्या 'राज' ला प्रीती मिळावी यासाठी करत नव्हता. हे 'राज' आता मला कळून चुकलं होतं. 

समोर बसलेला नाथा मला नेहेमीप्रमाणे दिल, गुल वगैरे शब्द असलेले शेर ऐकवण्यात मशगुल झाला होता –

"दिल से कब मैंने मचलने को कहा 
है किसी ने गुल से खिलने को कहा?

दूर से ही छू लिया मैंने तुम्हें 
जो हवा से रुख बदलने को कहा

जब सम्हलना हो गया मुश्किल मुझे
तब तुझे मैंने सम्हलने को कहा

वक्त किसके पास है ग़म के लिये 
किस्सा दिल का दिल बहलने को कहा

प्यार का मतलब समझने के लिये
लोगों से बस मिलने जुलने को कहा"

.... नाथाच्या चॅनेलचा मीही यानंतर एक सबस्क्राईबर झालो.

या घटनेलाही काही वर्षं होऊन गेली. काल परवाच पुनः नाथा दारी आला. मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन. 'राज वेड्स प्रीती' असं तिच्यावर लिहिलेलं होतं! 

© कुमार जावडेकर

+447405693330 / jawadekar123@yahoo.co.uk

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

संगीत प्र(या)वास

अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच हा मित्र त्याचं ते आडनाव नसलं तरी माझ्यावर खार खायचा.

पुलंनी, त्यांच्या बिगरी ते मॅट्रिक प्रवासाला 'खडतर' सोडून दुसरं कुठलंच विशेषण त्यांना सुचत नाही असं म्हटलं होतं... माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. 

प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले. लगेच "मी 'असुर' आहे" असा विनोद केला तर तो फार बाळबोध ठरेल असं मला वाटतं. (तसं एकदा बाळासाहेब ठाकऱ्यांनी लता मंगेशकरच्या 'शिवउद्योगसेने'साठी केलेल्या कार्यक्रमात म्हटलं होतं असं आठवतंय. त्यांना ते शोभून दिसलं होतं.)

सूर गवसण्याआधी 'सूर किती असतात?' हा प्रश्नच अनेक वेळा भाव खाऊन गेलेला मला आठवतोय. माझ्या गाण्याच्या पहिल्या 'क्लासा'त (माझं गाणं आणि क्लास या शब्दाचा आलेला हा एकमेव संबंध) मला (आणि इतरांना)  वीस-तीस वेळा 'सा रे ग म प ध नि सां' घोकायला लावल्यावर आमच्या शिक्षकांनी विचारलं होतं -

'सांगा - सूर किती?'

माझी लगेच हात वर करायची सवय मला नडली होती. मी 'आठ' म्हटल्यावर माझं उत्तर कसं चुकीचं आहे, वरचा 'सां' हा खालचाच 'सा' कसा 'वर' म्हटलेला आहे आणि त्यामुळे सूर सातच आहेत, वगैरे गोष्टींची माझ्या ज्ञानात भर पडली होती.

यानंतर काही वर्षांनी आम्ही घर (आणि संगीत विद्यालय - 'क्लास' नको) बदलल्यावर पुन: नवीन ठिकाणी 'सा रे ग म...' घोकायला लागलो होतो. पुन: शिक्षकांनी हाच प्रश्न विचारला होता.

'सात' या माझ्या उत्तराला ते फक्त हसले होते. 'बारा' या उत्तरात कसे सगळे एका आवर्तनातले कोमल, शुद्ध आणि तीव्र स्वर येतात आणि त्यामुळे तेच उत्तर कसं बरोबर आहे हे मला आता कळलं होतं.

थोडक्यात, संगीतात आपली काही प्रॉपर्टी करायची असेल तर या सात-बाराचा हा (चढ-) उताराच कामी येईल अशी माझी धारणा या गुरुजनांनी करून दिली होती. अर्थात, साध्या प्रॉपर्टीसाठी कर्ज मिळतं. इथे खर्जापासून वर सगळं मुद्दल आपल्यालाच उभं करायला लागतं हा एक दोघांतला मोठा फरक.

शास्त्रीय संगीतापासून सुरुवात करुया. त्याच्या गतीचा 'अगतिक' या शब्दाशी काही संबंध नाही, हेही मी आधीच स्पष्ट करू इच्छितो. खरं तर असे अनेक खुलासे करणं भाग आहे. 

माझ्या दृष्टीनं काही शास्त्रीय विधानं: 

१. मला शास्त्रीय संगीत आवडतं.

२. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि कळतंही.

३. मला शास्त्रीय संगीत आवडतं, कळतं आणि शिवाय त्याविषयी बोलायलाही आवडतं.

४. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि (कळत नसलं तरी) त्याविषयी बोलायला आवडतं.

माझ्या दृष्टीनं काही अशास्त्रीय विधानं:

१. मला शास्त्रीय संगीत आवडतं. इतर संगीत अशास्त्रीय आहे आणि/अथवा अमानुष आहे.

२. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि कळतंही. ज्यांना ते कळत नाही त्यांची करायचीच तर फक्त कीव करावी.

३. मला शास्त्रीय संगीत आवडतं, कळतं, आणि शिवाय त्याविषयी बोलायलाही आवडतं. मी किती उच्च आहे हे त्यावरून सिद्ध होतं.

४. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि (कळत नसलं तरी) त्याविषयी बोलायला आवडतं. मी किती उच्च आहे हे त्यावरून सिद्ध होतं. 

वास्तविक वर दिलेल्या विधानांमधे 'कळणं' ह्या ठिकाणी 'कळतंय असा समज असणं' अशीही एक उपश्रेणी टाकायला हवी. एकंदरित या विधानांमधे शास्त्रीय संगीत याऐवजी वारुणी ('तू वाइन पीत नाहीस? कंबख्त तू ने तो ...'), गाडी ('अरे जर्मन गाड्या म्हणजे...'), मोबाइल फोन ('आय-फोनची सर...') अशा अनेक गोष्टी घालता येतील. मला शास्त्रीय संगीतापासून प्राप्त झालेलं सगळ्यांत महत्त्वाचं ज्ञान हे की आपल्याला काय येतंय हे दाखवण्यापेक्षा आपण ज्याच्याशी बोलतोय त्याला (किंवा तिलाही) काय येत नाही हे दाखवणं आत्मसात करावं. एखादा गायक 'गोरख कल्याण' म्हणायला लागला तर 'जसराजांचा ऐकलाय का?' असं विचारायचं. बागेश्री म्हणायला लागला तर 'आमिर खान' यांनी 'बागेश्री' 'कानडा' अंगानं म्हटला होता असं म्हणून त्याला नडायचं. कुणी 'येरी आली पिया बिन' म्हटलं तर किशोरी आमोणकरांनी किती वेगळं पेश केलंय हे सांगून त्याला घेरी आणवायची. 'कोमल ऋषभ आसावरी तोडी' या रागाचा संपूर्ण उल्लेख करणं म्हणजे अगदीच शाळकरी. त्याला 'कोमल ऋषभ आसावरी', 'कोमल ऋषभ' (वास्तविक हा स्वर आहे) किंवा अगदी 'कोमल' हे श्रोता बघून (?!) संबोधता यायला हवं. मात्र मतमांडणी अगदी आटोपशीर असावी. अलीकडेच एकदा कुणी तरी विचारलं, 'कौशिकी चक्रवर्तीबद्दल काय मत आहे तुमचं?' - 'अगदीच नवशिकी आहे नाही?' मी इतकंच उत्तरलो. आता तो शोधत बसलाय तिला नवशिकी म्हणणाऱ्या मला किती ज्ञान आहे ते.

थोडक्यात, असं केलं म्हणजे आपली सरशी होते. अगदी नाहीच झाली, तरी 'ऐकणाऱ्याची लायकीच नव्हती' हे म्हणायला आपण मोकळे! कारण आपला विषयच महान असतो.

वास्तविक ही विधानं (पहिली चार - 'शास्त्रीय') माझ्या लेखी - कुठल्याही बाबतीत - मग ते मासे असोत की वांगं, क्रिकेट असो की कबड्डी (केवळ गोल्फ किंवा स्नूकर असायची गरज नाही) - लागू पडायला हवीत. संगीताबद्दलच म्हणायचं झालं तर कुठल्याही प्रकारच्या संगीताला (मग ते एकविसाव्या शतकातलं 'बॉलिवूड'चं असो की एकोणिसाव्या शतकातलं नाट्यसंगीत असो) समाविष्ट करणारी असावीत. पण तसं होत नाही, हे खरं.

शिवाय शास्त्रीय संगीतात भ्रमण करण्यासाठी - मग ते श्रोता म्हणून जरी असलं तरी - आपल्याला एक अतिप्रचंड शब्दकोशच शिकायला लागतो. राग किंवा तालांची नावं जाऊ देत. मी फक्त बाकीच्याच शब्दांबद्दल बोलतोय. त्यांची तुलना मला लग्न या आयुष्यातल्या घटनेच्या वेळी जे शब्द आत्मसात करायला लागतात त्यांच्याशीच करता येईल असं वाटतं. एक समजा 'ब' हे अक्षर घेतलं, तर बस्ता, बायको, बाशिंग, बिदाई, बोहला असे अनेक शब्द प्रथम अनुभवायला मिळतात. दुसरं एखादं - समजा - 'म' हे अक्षर घेतलं, तर मधुचंद्र, मानपान, मिरवणे, मंगळाष्टक, मंगळ, मंगळसूत्र, मुंडावळ्या असे अनेक शब्द आपल्या पदरी पडू शकतात. हे शब्द मी बाराखडीच्या क्रमानं (ब/बा/बि/बी...इ. किंवा म/मा/मि/मी... इ.) लिहिले आहेत, घटनाक्रमानं नाहीत, हे अजून एक स्पष्टीकरण. मिरवणूक जरी इतरत्र निघत असली (उदा. गणपतीची, नेत्याची) तरी मिरवण्यासाठी लग्नच (शक्यतो दुसऱ्याचं) हवं. याव्यतिरिक्त अंतरपाट, करवली, केळवण, रुखवत, सप्तपदी, हुंडा असे कित्येक शब्द, आणि 'स्थळ सांगून येणे', 'सूप वाजणे', असे अनेक वाक्प्रचार आपल्याला आत्मसात करायला मिळतात. एवढं झालं तरच लग्नसोहळा ही काय चीज आहे हे कळू शकतं. 

'लग्नाच्या साड्या घेतल्या का?' असं म्हणणं चुकीचं आहे, तिथे 'बस्ता'च हवा. तसंच शास्त्रीय संगीतात. इथे 'काल गायकानं कोणतं गाणं म्हटलं?' हा प्रश्न चुकीचा ठरतो. 'काल बुवांनी कोणती बंदिश म्हटली?' असंच म्हणायला हवं. चिज, गत (ही आपली होणारी अवस्था नसते) हे शब्द अवगत नसले तर इथे काम महाकठिण.

मला घराणी ओळखता येत नाहीत. 'किराणा' घराणं हे मारवाड्यांचं असतं अशी माझी लहानपणीच पक्की समजूत झाली होती. ते शास्त्रीय संगीतातल्या घराण्याचं नाव आहे असं कळल्यावर 'गेला बाजार आता भेंडीबाजार हेही कुणी घराण्याचं नाव म्हणेल' असं मी म्हटलं होतं. त्यावर 'आहेच मुळी!' असं उत्तरही मिळालं होतं! शिवाय लता मंगेशकर याच घराण्याची आहे हेही कळलं होतं. गुलाम अली पतियाळा घराण्याचे आहेत हे पुढे माझ्या माहितीत जमा झालं आणि शास्त्रीय संगीताचं आणि सध्याच्या भूगोलाचं फारसं बरं नसावं हे लक्षात आलं. ग्वाल्हेर घराणं शिंद्यांचं आणि इंदूर घराणं होळकरांचं असं इतिहासात वाचलं होतं. त्यातून मग संगीताचा आणि इतिहासाचाही काही संबंध नसतो असं मी अनुमान काढलं. ..आणि त्यावर 'शास्त्रीय संगीताइतकं पारंपरिक आणि अभिजात दुसरं काही नाहीये' असं ऐकून घेतलं. मी या अशा शब्दांना जाम घाबरतो. हे असे शब्द आले, की त्यापुढे लगेच त्या सगळ्यांचा संस्कृतीशी संबंध लावला जातो. मग तिच्या रक्षणाची जबाबदारी आपण कशी घेत नाही हे स्पष्ट केलं जातं. 

मला राग येत नाही, असं नाही. (इथे मी परिच्छेद बदलला आहे. यावरून या रागाचा संस्कृतीरक्षणाशी संबंध नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल.. .की आहे? ) 

शालेय अभ्यासक्रमाच्या जोडीनं छंद म्हणून शिकायच्या(!) काही गोष्टी आपल्या नशिबात येतात. पोहणे, गाण्याचा क्लास लावणे इत्यादी. (माझ्या गाण्याचा आणि क्लास या शब्दाचा संबंध एवढाच काय तो आला.) पण त्या क्लासात मी काही लक्षणगीतं आणि चिजा शिकलो होतो. ओडव, षाडव वगैरे शब्दांनी डोक्यात तांडव केलं होतं. सम, काल (किंवा खाली - मग सम 'वर' का नाही?) या शब्दांपासून पलटे, आलाप, ताना, बोलताना, गत (हा  शब्द पुन: आला - तो आपली अवस्था दर्शविणारा नाहीये) अशा अनेक गोष्टी अवगत व्हायला हव्यात, तरच आपली धडगत आहे हे कळून चुकलं.

शिवाय, रागांची नावं हा तर अचाट प्रकार आहे. 'मधमाद सारंग' असं नाव असलेल्या रागात 'ध' वर्ज्य असतो हे शिकताना मला धक्का बसला होता. मग त्याला म आणि ध या दोन्हींचा माद का म्हणायचं असा माझा प्रश्न होता. कुणीतरी मध्येच रागातल्या 'ध' चा 'म' करून नाव बदलण्याआधीच गारद झाला असेल आणि बाकीचे विशारद तसंच गात बसले असतील, असं त्यावर मग मी संशोधनही केलं होतं! सारंगच्या शुद्धीकरणात 'ध'ची भर घालण्याचं महत्कार्य पूर्वीच झालेलं आहे हे मला मागाहून कळलं. बागेश्री आणि भीमपलास अशी नावं असलेल्या रागांचे सूर सारखेच असतात (फक्त चलन वेगळं असतं) हेही त्याच काळातलं अध्ययन. एकंदरित काय, संगीत आणि जीवन या दोन्हींत, चलन जास्त महत्त्वाचं हा उपयुक्त धडा मात्र मला या प्रसंगांतून मिळाला होता.

बागेश्रीला रागेश्री नावाची एक जुळी बहीण आहे. बागेश्रीतल्या कोमल 'ग'चा रागेश्रीत शुद्ध 'ग' होतो. दोघी निशाचर. एक नुसताच श्री नावाचाही राग आहे. पण या नुसत्याच श्रीचे स्वर खूपच निराळे. तो संध्याकाळचा गंभीर राग. त्यामुळे राग पटकन ओळखता नाही आला तर 'कुठला तरी श्री' असेल असं सांगायची सोय नाही. बागेश्री आणि रागेश्रीत माझा नेहमी गोंधळ व्हायचा. बागेश्रीतली 'कौन करत तोरी बिनती पियरवा' ही चिज आणि रागेश्रीतलं 'कौन आया मेरे मन के द्वारे' हे गीत यांनी माझ्या चंचल बालमनात फारच चलबिचल केली होती. बरं दोन्ही गाण्यांचा अर्थही पूर्ण निराळा. एकात 'पिया'ची बोळवण तर दुसऱ्यात प्रियेची आळवणी!

मात्र कंसातल्या रागांचं असं नसतं. तिथे 'कंस अंगाचा राग आहे' हे वाक्य टाकायला मुभा असते. मग त्या कंसांत माल, मधु, चंद्र, गुण दडपता येतात. एवढंच नाही तर हरि, जय इत्यादी नावं आणि जोग वगैरे आडनावंसुद्धा!

किशोरकुमारनं (आणि अन्नू मलिकनंही) संगीताचं शिक्षणच घेतलं नव्हतं अशी चर्चा अनेकदा होत असते. इतकी की असं काही शिक्षण न घेताच गाणं आलं पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं. आता संगीत न येता 'भोले नीचे से' असं तो सुनील दत्तला 'पडोसन'मध्ये कसं म्हणू शकला (पेटीवर सारेगम शिकवत असताना) आणि 'कोई हमदम ना रहा' हे झिंझोटीतल्या एका सुंदर चिजेवर आधारित गाणं कसं संगीतबद्ध करू शकला ही कोडी मला कायम पडत असत (अजूनही पडतात). त्याला राग येत नसेल कदाचित, पण संगीत नक्कीच येत होतं हे माझं अनुमान मात्र अजून अनेकांना पटलं नाहीये. एखादं ज्ञान उमजत नसलं की ते उपजत असतं असं म्हणायचं मी यातूनच शिकलो. त्यामुळे जगात मात्र आपली सोय होते फार. 'मला स्वयंपाकातलं काही कळत नाही, ते ज्ञान उपजतच असावं लागतं', 'मला कुठलाही खेळ येत नाही कारण माझ्या जीन्समधेच तो नाहीये' वगैरे वाक्यं आपल्याला आरामात टाकता येतात. या सगळ्यातून झालेलं सर्वांत मोठं ज्ञानार्जन म्हणजे, 'मला संगीतातलं कळतं' आणि 'मला संगीतातलं काही कळत नाही' या दोन्ही वाक्यांना जगात सारखाच मान आहे या गोष्टीची जाणीव. फक्त कोणतं वाक्य कोणासमोर बोलायचं एवढे उपचार समजले की 'उरलो उपकारापुरता' ह्या नीतीनं फक्त गाण्याचा निर्भेळ आनंद घेता येतो!

हा साक्षात्कार झाला आणि तो सांगावासा वाटला म्हणून हे प्रयोजन. 

आता माझं ऐकायचं आणि बोलायचं संगीत मी वेगळं केलंय...!  

- कुमार जावडेकर

रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

गुमोसोस आणि अफ़सोस

 आमच्या गुलमोहर सोसायटीची अनेक 'व्हॉटस ॲप' मंडळं आहेत. त्यांची नावं काय असावीत या विषयापासूनच त्यांच्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी अतिरंजित चर्चा होत आल्या आहेत. वास्तविक बरेच दिवस आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरातल्या, नात्यातल्या, मित्रांतल्या इत्यादी ‘व्हॉटस ॲप’ मंडळांमध्ये मान्यता आणि धन्यता पावत होतो; पण सोसायटीचं असं मंडळ व्हायला हवं हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ करायला आम्हांला परुळेकर मामा लागतात. ते स्वतः गेली वीस वर्ष, निवृत्त झाल्यापासून, सोसायटीचे सेक्रेटरी (आणि सर्वांचे एल. आय. सी. एजंट) आहेत. तसा त्यांच्याकडे इतके दिवस स्वतःचा लॅपटॉप होताच, पण त्यांच्या पंच्याहत्तरीला त्यांच्या चिरंजीवांनी त्यांना एक सुंदर 'स्मार्ट फोन' आणून दिला आणि मामांनी अक्षरश: कात टाकली. धडाधड 'गुमोसोएक' (गुलमोहर सोसायटी एक्जिक्युटिव्ह कमिटी), 'गुमोसोस' (गुलमोहर सोसायटी सभासद) अशी दोन मंडळं तयार झाली. काही दिवसांतच बायकांनी आपलं एक वेगळं मंडळ तयार केलं. त्याचं नाव रोज बदलत होतं. 'गुल-शान' (आपण गुलमोहर सोसायटीची 'शान' आहोत असं अभिप्रेत असावं), 'गुल-फाम' (याची फोड माहिती नाही, बहुधा फेमस या शब्दाशी काहीतरी संबंध असावा) अशी अनेक नावं आली आणि गेली. या नावांचा आपल्या संकृतीशी (म्हणजे धर्माशी असंही काहींनी स्पष्ट केलं) संबंध दिसून येत नाही असं काही बायकांचं म्हणणं होतं. 'गुल-मोह' असंही एक नाव आलं होतं, पण त्या मोहात न पडता शेवटी 'गुलु-गुलू' या नावावर सगळ्यांचं एकमत झालं.

एकदा मंडळं तयार झाल्यावर मग मात्र कुणी मागे वळून पाहिलं नाही. मामा सभासदांना लागणारी सगळी माहिती, कमिटीचे निर्णय, बिलं, त्यांचे तगादे इ. सगळ्या गोष्टी एका नव्या जोमानं आम्हांला पाठवायला लागले. भुजबळांकडून रोज सकाळी न चुकता 'सुप्रभात' (रोज नवीन चित्र आणि संदेशासकट) चा निरोप येऊ लागला. शर्मानं रोज किमान दहा विनोद पाठवले नाहीत तर लोकांचा दिवस आनंदात जाणार नाही अशी आपली समजूत करून घेतली. नवीनच पहिल्या मजल्यावर राहायला आलेल्या उमेश आणि उमा या जोडप्यानं प्रत्येकाच्या वाढदिवसाला आपल्याकडून शुभेच्छा सर्वांच्या आधी गेल्या नाहीत तर आपली खैर होणार नाही अशी उगाचच आपली भावना करून घेतली. याशिवाय उमा प्रत्येक संकष्टी, एकादशी, शिवरात्र इत्यादींची आगाऊ माहिती द्यायला लागली. दोशी शेअर मार्केटमध्ये काय होणार याची भाकितं सांगू लागला आणि चाफेकर (जन्मगाव आणि शिक्षण पुणे) ट्रंप पासून किम पर्यंत कुठे काय खुट्ट होतंय हे कळवू लागला. याशिवाय मोदी, क्रिकेट, बॉलिवूड इत्यादी जिव्हाळ्याचे विषय... जो जे वांछील तो ते लिहायला (किंवा दुसऱ्यांनी लिहिलेलं पुढे सारायला) लागला.

अर्थातच, या सगळ्या विषयांवर चर्चा करताना एखाद्याच्या नाकी नऊ आले असते. पण आमच्या सभासदांचा उत्साह अफाट! त्यातून मुंबईत कितीही गर्दी भासली तरी अजूनही त्यात सहज सामील होते हे सिद्ध झालेलं आहेच, तेच ‘व्हॉटस ॲप’च्या बाबतीत झालं. अगदी येता-जाता आम्ही एकमेकांना 'आज चतुर्थी आहे? अरे, मी उमानं लिहिलं होतं तरी कसं विसरलो?', 'आजचा शर्माचा विनोद वाचलात?' किंवा 'फक्त ‘व्हॉटस ॲप’वरच नको, प्रत्यक्षात पण केक मिळू दे की तुमच्या प्रकटदिनाचा' असं म्हणायला लागलो.

मला 'व्हॉटस ॲप’वर असं कार्यरत असणाऱ्यांचा मनापासून आदर वाटतो. 'मी तीस मंडळांमध्ये आहे आणि मला प्रत्येक ठिकाणी रोज पन्नास निरोप येतात' असं सांगणारे स्वतः त्यातले तीस-चाळीस विनोद/लेख/कविता/बातम्या पुढे पाठवून इतरांच्या ज्ञानात किंवा आनंदात भर घालण्यासाठी वेळात वेळ काढतात हे खरंच कौतुकास्पद आहे.

"कसा काय वेळ मिळतो बुवा लोकांना वाचायला?" असं एकदा मी मामांना विचारलं होतं.

"अहो, मला तर आनंद होतो. या वयातही आपल्याला इतके लोक संपर्क करतायत. आपल्यावाचून त्यांचं अडतंय असं उगाच वाटतं किंवा निदान वाटवून घ्यायला तरी मिळतं! आपण किती महत्त्वाचे आहोत या सर्वांसाठी, हे कळतं."

मामांचा सगळ्यांना इमोजी किंवा प्रतिसाद देण्यात पहिला क्रमांक असायचा. फक्त सेवानिवृत्ती हे एकच त्याचं कारण नाहीये याची त्यांनी मला या संभाषणातून जाणीव करून दिली होती. 

अर्थात, या निरोपांत कधी कधी रुसवे-फुगवे, हेवे-दावे हेही आलेच. पण सुदैवानं 'आता माझी सटकली' म्हणून कुणी मंडळं सोडली नाहीत. कुणाची मनधरणी करायला लागली नाही. असंच पुढे चालू राहील असं वाटत होतं आणि वॅलेंटाईन डे आला. 

प्रेमाचं प्रतीक असलेल्या या दिवसाचं निमित्त साधून एकाच दिवशी एकच गोष्ट तिन्ही मंडळांवर - एकदा हिंदीत आणि दोन वेळा मराठीत (आणि प्रत्येकाच्या अनेक इतर मंडळांमधे त्यांच्या त्यांच्या भाषेत) आली...

"वर्गात शिक्षकांनी मुलांना विचारले, 'प्रेमाचे प्रतीक कोणते?' 

सगळ्या मुलांनी (एक सोडून) 'ताजमहाल' हे उत्तर दिले. फक्त गण्या म्हणाला, 'रामसेतू'.

शिक्षकांनी विचारले, 'का?'

गण्या म्हणाला, 'बायकोच्या नावाने ताजमहाल बांधून झाल्यावर शहाजहान बादशाहाने त्या कामगारांचे हात तोडले. या उलट बायकोला आणण्यासाठी पूल बांधणाऱ्या वानरांचा रामाने सन्मान करून त्यांच्याशी प्रेमाचे नाते जोडले.'

असे इतिहास आणि पुराणाकडे आपण नवीन दृष्टीने बघायला हवे."

"गण्या, तोडलंस मित्रा, " असं एक वाक्य माझ्या मनात गुप्तपणे (की 'गुप्तें'प्रमाणे?) उगाचच जुळून गेलं. पण ते खोडून मी असा विचार केला की आपल्याला अलीकडेच चाळिशी लागल्यामुळे आपण या नवीन दृष्टीनं ही गोष्ट वाचायला हवी. कधी नव्हे ते मी (मामांना स्मरून आणि आपण फार महत्त्वाचे आहोत असं समजून) आमच्या मंडळात लिहिलं,

'पण नंतर रामानं आपल्या बायकोला सोडलं त्याचं काय?' 

शेवटी स्माइली टाकला की तो विनोद होतो या माझ्या भ्रमाचा भोपळा लगेचच फुटला. 

वास्तविक आमची सोसायटी तशी पुरोगामी. 'हॅपी वॅलंटाईन डे' आणि 'मातृ-पितृदिनाच्या शुभेच्छां'च्या निरोपांची मंडळांवर एकत्र देव-घेव झाली होती. काही विनोदही येऊन गेले होते. पण या एका वाक्यावरून आमच्याकडे जे रामायण घडलं ते जर रामानं वाचलं असतं तर बहुधा सीतेला रावणाकडूनच नाही तर पुढे वाल्मिकींकडूनही परत आणलं असतं असं मला वाटायला लागलं!

नमुन्यादाखल काही प्रतिक्रिया - 

'वाह ताज' असं म्हणायचंय का तुम्हांला? तुमचा खरा पक्ष कळला.' (भुजबळ, रागावलेल्या इमोजीसकट, शिवाय सोबत एक हिरवा आणि एक पाकिस्तानचा झेंडा. त्यांना बहुधा 'तुमचा खरा देश कळला' हे अभिप्रेत होतं.)

'यात परकीय शक्तींचा हात आहे, आपल्या लोकांना ते असेच फितवतात.' (उमा... चक्क चपला, हाय हिल्स. ती घालते तशाच.)

'आपल्या लोकांतच एकी नसते.' (उमेश, दोन रागावलेले इमोजी. उमेश त्या मानानं शांत स्वभावाचा आहे.)

'असं नुसतं चालणार नाही, शब्द मागे घ्या. आपणच जर आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला नाही आणि तिचा प्रचार केला नाही तर ती शिल्लकच राहणार नाही.' (चाफेकर, पाच ठेंगे, पाताळाच्या दिशेनं.)

'प्रभु राम की और शहाजहान की कोई तुलना हो ही नही सकती. भगवान जो भी करते हैं वो सही होता है. उसके पीछे उनका क्या कारन है वो समझनें की भी हमारी योग्यता नहीं है. ' (शर्मा, तीन नमस्कार - हे बहुधा रामाला आणि सहा रागावलेले इमोजी - त्यातले तीन शहाजहानसाठी आणि तीन माझ्यासाठी असावेत.)

'हे राम. ' (दोशी, दहा नमस्कार आणि दहा रागीट तोंडं - ह्यानं माझा रावणच करून टाकला. फक्त त्यापुढे एक धनुष्य-बाण घालायला हवा होता.)

सकाळी निघताना मी हा निरोप टाकला होता. संध्याकाळी आपली धडगत नाही हे माझ्या लक्षात आलं. मी 'गंमत केली, कुणाच्याही भावना दुखावायचा माझा हेतू नव्हता' असं लिहावं का असा विचार करायला लागलो. पण अचानक बघितलं तर मामांचा मला व्यक्तिगत निरोप- 

'उत्तर देऊ नका आणि यापुढचे कुणाचे निरोपही बघू नका.'

मी 'ठीक आहे' असं उत्तर दिलं. घरीही उशिराच परतलो, रात्रीचे आठ वाजायला आले होते. ऑफिसात आणि परतीच्या प्रवासात, आपण आधी नीट विचार का नाही केला अशी दूषणं स्वतःला देत होतो. आता पुढे काय होईल याची वेगवेगळ्या प्रकारे कल्पना करत होतो. 

अखेर सोसायटीच्या कमानीतून आत आलो तेव्हा आमच्या इमारतीखालच्या अंगणातच घोळका (चक्रव्यूह?) करून असलेले आमचे सभासद मला दिसले. त्यांना सामोरं जाणंच भाग आहे हे माझ्या लक्षात आलं आणि हळू हळू पुढे सरकलो. मामांनी माझी उजवी बाजू सांभाळली होती; पण डावीकडून भुजबळ, शर्मा, दोशी, चाफेकर, उमेश आणि उमा असं पूर्ण वर्तुळ (वाटोळं?) होतं.

मी जमलेल्या जमावात आपला शिरकाव करून घेतला. पहिल्या वाराला सिद्ध झालो.

अचानक, माझ्या खांद्यावर भुजबळांचा हात पडला.

"सॉरी."

आपण बरोबरच ऐकतोय ना असं वाटून मी चमकून त्यांच्याकडे बघितलं.

"हो, आम्ही जास्तच वाईट लिहिलं तुम्हांला." उमानं थोडं स्पष्टीकरण दिलं.

"म्हणजे... " मी बोलायचा प्रयत्न केला. ('थोडंसं वाईट चाललं असतं का?' माझ्या मनात प्रश्न. पण इथे मी उत्तरं देण्यासाठी उभा असणं आवश्यक होतं.)

"टेन्शन मत लो," शर्माचं प्राज्ञ हिंदी एकदम मुन्नाभाईच्या वळणावर गेलं.

"अरे, पण मला कोणी काही सांगेल का? मी तर अगदी घाबरूनच गेलो होतो. तुम्ही काही म्हणा, पण आधी मीच तुम्हांला.... "

"चालायचंच," चाफेकरनंही मला मध्येच तोडलं.

शेवटी मामा म्हणाले, "चला, रात्र झाली आहेच, घरी जाऊ. " सगळे एकमेकांना पुनः एकदा 'हॅपी व्हॅलंटाईन डे' म्हणून आपापल्या फ्लॅटकडे निघालो. मामा आणि मी सगळ्यांत वरच्या मजल्यावर राहतो. वर पोहोचताच मी मामांना विचारलं,

"हा चमत्कार कसा झाला?" 

मामा हसून म्हणाले,

"विनीतमुळे झाला. ‘व्हॉटस ॲप’वर बघा. " 

विनीत - मामांचा नातू - तर आता इंग्लंडमध्ये असतो हे मला माहिती होतं. त्यानं इतक्या लांबून इतक्या थोड्या वेळात काय केलं असेल, असा विचार करत मी दार उघडलं आणि घरात शिरल्यावर फोनमध्ये डोकं खुपसलं. 

मामांनी अनेक यूट्यूब व्हिडिओज आमच्या सभासदांसाठी पाठवले होते. सगळ्या कार्यक्रमांचा विषय मात्र एकच होता - 'हॉरिबल हिस्टरीज'. प्रत्येक व्हिडिओनंतर मामांनी एकच वाक्य थोड्या-फार फरकानं लिहिलं होतं.

"राणी व्हिक्टोरिया, राणी एलिझाबेथ यांच्यापासून चर्चिल, शेक्सपिअरपर्यंत निदान त्यांच्या देशाच्या आणि भाषेच्या दृष्टीनं तरी आदरणीय, पूजनीय असलेल्या व्यक्तींच्या आयुष्याकडे ते गंमतीनं बघू शकतात, त्यांची खिल्ली उडवू शकतात आणि त्यावर हसू शकतात, तर आपण का असं करू शकत नाही? एखाद्या गोष्टीतला विरोधाभास दाखवून देणं हा गुन्हा आहे का?"

अर्थात, एवढ्याशा शिकवणीमुळे लगेच मतपरिवर्तन होईल हे पटणं अवघड होतं. लोकांच्या प्रतिक्रियाही तशाच होत्या. 

"राम देव होता, ह्या सगळ्यांमध्ये कुठे देव आहे? "

"ब्रिटिश राण्यांपासून ते चर्चिलपर्यंत राज्यकर्ते क्रूरच होते. त्यांना फक्त जगावर सत्ताच चालवायची होती. "

"आपल्याकडे असं चालणार नाही. आपण फक्त हिंदू-देवतांवर टीका सहन करून घेतो. इतरांवर नाही."

मामांनी सगळं ऐकून घेऊन एकच वाक्य लिहिलं होतं. "एक निदा फाजलींचा शेर फक्त आता लिहितो -

'घर से मस्जिद है बहोत दूर चलो यूं कर ले

किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए'..."

यापुढे कुणाचीच प्रतिक्रिया नव्हती.

मी मामांना फोन लावला आणि म्हटलं,

"तुम्ही सांगितलंत खरं इतकं, पण म्हणून सगळ्यांना पटलंय - मतपरिवर्तन नाही, पण दुसऱ्याच्या मताचा आदर करण्याइतपत तरी - असं वाटतं तुम्हांला? "

"अजिबात नाही. पण आपल्या मंडळावर मी मला जे पटतं ते लिहिलं आहे. यानंतर मी इतरांना संध्याकाळी भेटल्यावर काय सांगितलं ते तुम्हांला कुठे माहिती आहे? "

"काय सांगितलंत? "

"तुम्हांला पश्चात्ताप झालाय तुमच्या वागण्याचा. तुम्ही खूप उशिरा परत येणार आहात. तुमच्यावर अजिबात रागवायचं नाही. आपला मोठेपणा मेलेल्याला मारण्यावरून सिद्ध होतो का? शिवाय, आपल्यातच एकी नाही असं म्हणायचं आणि आपल्याच लोकांशी भांडायचं हे तरी योग्य आहे का?"

थोडक्यात, मामांनी माझीच विकेट काढली होती.... त्याचबरोबर सभासदांची आणि त्यांची स्वतःचीही!

फोन ठेवण्याआधी मामा मला म्हणाले,

"मी विनीतमुळे इंग्लंडमध्ये असताना हे हॉरिबल हिस्टरीजचे कार्यक्रम बघू शकलो होतो आणि खूप हसूही हसलो होतो. तुझ्या वाक्यामुळे ते आठवलं… अलीकडे मीही लिहायला लागलोय - आपल्या इतिहासावर असंच काहीसं!"

- कुमार जावडेकर

सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

इतिहास्यटिका - माउंटबॅटन

(पडदा उघडतो. भिंतीवर 'यमसदन' अशी पाटी. मागे तीन दारं, त्यांच्यावर 'स्वर्ग', 'प्रतीक्षा' आणि 'नरक' अशा तीन पाट्या. स्वर्गाच्या दाराच्या डावीकडे आणि नरकाच्या दाराच्या उजवीकडे एक-एक खिडकीही आहे. तिला पडदे आहेत. या शिवाय डावीकडे आत यायचा दरवाजा आहे उजवीकडे आत जायचाही एक दरवाजा आहे. खोलीत एक टेबल, खुर्ची, टेबलावर पेपरवेटखाली ठेवलेला एक अर्धा उघडलेला कागद आणि शेजारी एक 'ब' लिहिलेली फाईल. टेबलावर एक संगणक, एक रिमोट आणि कोपऱ्यात टी. व्ही. आहे. या व्यतिरिक्त एक सोफा, अजून एक खुर्ची आणि एक अ ते ज्ञ पर्यंत फायली ठेवलेलं जुनाट उघडं शेल्फ. 
आत यायच्या दरवाज्यातून एक गृहस्थ प्रवेश करतात. जाडजूड. नखशिखान्त काळे कपडे. येताच प्रेक्षकांकडे बघून थबकतात. "शू:! " अशी गप्प बसण्याची खूण करतात. दबक्या पावलांनी जाऊन 'स्वर्ग' आणि 'नरक' या पाट्यांची अदलाबदल करतात. इकडे-तिकडे बघतात. पुनः प्रेक्षकांकडे बघून तोंडावर बोट ठेवतात. मग 'प्रतीक्षा' लिहिलेल्या दाराला कान लावतात. मान डोलावतात, स्वतःच हसतात आणि समोर येतात.)
गृहस्थ: नमस्कार. वास्तविक आपली 'प्रोसीजर'च आहे ही. मी उगाच तुम्हांला गंमत वाटावी म्हणून खुणा करत होतो. येईलच तुमच्या लक्षात थोड्या वेळात. आधी साहेब आले की नाही ते बघू. (पुढे वाकून, कान दिल्याची कृती - ) काय म्हणता? कोण साहेब? अहो, इथे दोन साहेब आहेत. कुणाबद्दल सांगू? तुमच्या पैकी कुणाला आहेत का दोन साहेब? - आहेत ना? (आवाज बदलून) मग काय, येते ना मजा? (डोक्यात प्रकाश पडून -)  पण आधी मी कोण, हे तर सांगतो. माझं नाव -
(तेवढ्यात डावीकडून आवाज येतो - "ए रेड्या". गृहस्थ खजील होतात. डावीकडून अजून एक मनुष्य येतो.)
गृहस्थः  साहेब, तुम्हांला किती वेळा सांगितलं, जरा चारचौघांत तरी मला "अहो रेडकर" म्हणा! मी म्हणतो ना तुम्हांला (नाटकी आवाजात) "मान्नीय यमदेव!"
यमदेवः पुरे! चल, आज बरीच कामं आहेत पृथ्वीवर.
रेडकरः (प्रेक्षकांना - ) कोणती ते तुमच्या लक्षात आलं असेलच. ('गळ्यावरून हात फिरवतो - सुरी फिरवण्याची / मरण्याची नक्कल. पण उघडपणे म्हणतो-) जमणार नाही. 
यमदेवः आलं ध्यानात. अहो श्रीयुत रेडकर! आपण प्रस्थान करायचं का?
रेडकर: (हंबरल्यासारखं) हम्म....जमणार नाही.
यमदेवः का?
रेडकरः चित्रगुप्त साहेबांचा आदेश आहे. ('प्रतीक्षा' लिहिलेल्या दाराकडे बोट दाखवून -) इथल्या एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला कमी केल्याशिवाय नवीन कुणाला भरती करायचं नाही! (प्रेक्षकांकडे बघून - ) आमच्याकडे इथे इतकी माणसं आहेत की या दालनाला 'प्रतीक्षागृह' न म्हणता 'प्रतीक्षानगर' म्हणायला लागेल. काय आहे, साधी माणसं सरळ स्वर्गात किंवा नरकात जातात. त्यांचा हिशोब जुळलेला असतो. पण अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना मात्र फार तपासून पुढे पाठवायला लागतं बरं का.
यमदेवः हा चित्रगुप्त म्हणजे... 
रेडकरः अहो साहेब, थांबू की जरा. बघू की मजा.
यमदेवः पुरे रे तुझ्या गमजा... खाली कोविडमुळे किती काम वाढलंय माहिती आहे?
रेडकरः म्हणूनच सांगतो साहेब. इथे नवीन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना जागा नाही. आधी रिकामी करा थोडी.
यमदेवः ठीक आहे. कुठे आहे तो चित्रगुप्त?
रेडकरः आत गेलेत. माणूस शोधतायत. 
यमदेवः बरं. कोणाचा नंबर लागतोय आज? (म्हणत टेबलाकडे जातात... पेपरवेटखालचा कागद उचलतात. ) माउंटबॅटन. छान. फाईल बघू. ('म' ची फाईल काढतात.)
रेडकरः आता माउंटबॅटन म्हणजे? 
यमदेवः 'माउंट' म्हणजे पर्वत आणि 'बॅटन'म्हणजे सांधा.
रेडकर:  म्हणजे गंमतीचा वांधा. माणूस चांगला निघणार... दुसरा पण अर्थ असेल की बघा एखादा.
यमदेवः तूच सांग. तू वेदशास्त्रसंपन्न आहेस.
रेडकरः (पुनः हंबरून) हम्म... तो संकृतमधला. ज्ञानेश्वर महाराजांनी (इथे डोळ्याला नमस्कार केल्यासारखे हात) इंग्रजी नाही शिकवली आपल्याला.
यमदेवः (प्रेक्षकांना -) बघा. एरवी त्याचं ज्ञान फाडत असतो. (रेडकरांना -) ठीक आहे, पुनः बघू. 'माउंट' म्हणे पर्वत. 'बॅटन' म्हणजे 'दुसऱ्यांच्या जिवावर स्वतःची प्रगती करणे'. 
रेडकरः म्हणजे, दुसऱ्यांच्या जिवावर स्वतः प्रगतीचे पर्वत चढून जाणे. ... (कळून स्वतः वर खूष होतो आणि हसतो. पुढे म्हणतो, थोडं स्वतःशी थोडं प्रेक्षकांशी) माउंटबॅटन...हे उंटावरचे शहाणे की पर्वतावरचे? 
यमदेव (दुर्लक्ष करत): अरे, पण फायलीत नाव सापडत नाहीये!
(तेवढ्यात चित्रगुप्त आणि माउंटबॅटन येतात.)
चित्रगुप्तः प्रतीक्षागृहातही सापडत नव्हते... तिथे 'म' च्या फायलीत नाही सापडणार नाव - या 'ब' मध्ये बघा. (टेबलावरच्या फाईलकडे बोट दाखवतात. ) जर्मन नावाचा बभ्रा होऊ नये म्हणून 'बॅटनबर्ग' चं 'माउंटबॅटन' केलं होतं ह्यांनी.
रेडकरः आता 'बॅटनबर्ग' म्हणजे...
यमदेव: अर्थ तोच होतो रेडकर. माणूसही तोच आहे. फक्त जर्मन शब्दांऐवजी इंग्रजी शब्द केले.
रेडकरः मग ठीक आहे.
चित्रगुप्तः ठीक काय आहे?
रेडकरः शब्दांची उलटापालट करूनही अर्थ बदलत नाही हे! नाही तर बघा ना, नुसत्या 'पर्वते'चं 'ते पर्व' केलं तरी अर्थ बदलतो की.
यमदेवः किंवा डीमेलोचं मेलोडी! 
(दोघे "पर्वते डीमेलो, ते पर्व मेलोडी" असं तीन-चार वेळा तालात म्हणतात.)
रेडकरः साखरदांडे, गायकवाड आणि इंगळहळ्ळीकर यांचं कसं होईल?
चित्रगुप्त (अडवून): थांबा, पुरे.
यमदेव: पण आडनाव बदललं कशाला?
चित्रगुप्तः अहो, मूळचे जर्मन वंशाचे हे. पण इंग्लंडच्या राज्यकर्त्यांपैकी. महायुद्ध सुरू झाल्यावर यांनी देश बदलण्याऐवजी आडनाव बदललं. 
यमदेव: असं झालं होय? आडनाव जाऊ दे. नाव काय ह्यांचं?
चित्रगुप्तः लुई फ्रान्सिस अल्बर्ट व्हिक्टर निकोलास.
रेडकर (मोजत): एक, दोन, तीन, चार, पाच... मग बाकीचे चार पांडव कुठे आहेत?
माउंटबॅटन (प्रथमच तोंड उघडतात): व्हॉट अ प्रिपॉस्टरस क्वेश्चन! ही सगळी माझीच नावं आहेत!
चित्रगुप्तः हे तर काहीच नाही. (फाईल चाळत... ) यांना मिळालेल्या उपाध्या अजून खूप आहेत. फर्स्ट अर्ल माउंटबॅटन ऑफ बर्मा, फर्स्ट सी लॉर्ड, व्हाइसरॉय ऑफ इंडिया, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ, लॉर्ड, .... 
(माउंटबॅटन प्रत्येक ठिकाणी आत्मप्रौढीनं माना डोलावतात.)
रेडकरः पण केलं काय यांनी जीवनात? 
यमदेव: त्यांनाच विचारुया की. त्याचसाठी आले आहेत ना ते इथे?
चित्रगुप्तः हो तर! विचारायचंय तर...
माउंटबॅटनः दुसऱ्या महायुद्धात मी रॉयल नेव्हीत होतो.
रेडकर: छान छान. आपल्या देशासाठी - म्हणजे इंग्लंडसाठी - युद्ध करत होतात.
माउंटबॅटनः हो. एच एम एस केली चा कमांडर होतो.
रेडकर: छान छान. 
चित्रगुप्तः पण त्या जहाजाला जर्मन टॉर्पीडोच्या तावडीत नेऊन सोडलं! 
यमराजः हो का? मग त्यानंतर?
माउंटबॅटनः केली दुरुस्तीला गेलं आणि मी एच एम एस जावलीन चा कमांडर झालो. 
चित्रगुप्तः आणि त्या जहाजालादेखील जर्मन टॉर्पीडोनी जर्जर केलं. 
रेडकर: अरे वा! कन्सिस्टंट...
चित्रगुप्तः मधल्या काळात एच एम एस केली दुरुस्त झालं होतं. त्याला त्यांनी ग्रीसला जर्मनांशी युद्ध करायला पाठवलं.
यमदेव: थांबा, आणि त्याला जर्मनांनी बुडवलं. बरोबर?
चित्रगुप्तः अगदी बरोबर!
रेडकर आणि यमदेव (हसून): अरे वा! कन्सिस्टंट... (यमदेव आणि रेडकर दोघेही चित्रगुप्तांना टाळ्या देऊ पाहतात. पण दोघे एकदम करायला गेल्यामुळे कुणाचीच टाळी वाजत नाही.) 
चित्रगुप्तः हो ना. मग त्यांना बढती मिळून ते व्हाइस ऍडमिरल झाले. 
रेडकरः चर्चिलचे चांगले मित्र होते ते. शिवाय राजघराण्यातलेही. पण या सगळ्याचा त्याच्याशी काही संबंध नसावा.
यमदेवः मध्ये मध्ये बोलू नका रेडकर!
चित्रगुप्तः या नंतर त्यांनी ऑपरेशन ज्युबिली हाती घेतलं. कॅनडाच्या सुमारे पाच हजार सैनिकांना (आणि ब्रिटनच्या एक हजार सैनिकांना) एका फ्रेंच बंदरावर सोडलं.  त्यांपैकी ६८% मारले गेले.
माउंटबॅटनः पण त्याच अनुभवातून आम्ही पुढे नॉर्मंडीची लढाई करू शकलो. 
चित्रगुप्तः असं तुम्हीच म्हणालात! 
यमदेवः पण त्या अनुभवाची गरज होती का?
चित्रगुप्तः या पुढे त्यांनी काय केलं हे आपण त्यांनाच विचारुया.
माउंटबॅटनः मग आम्ही नॉर्मंडीपर्यंत पाण्याखालून तेलाचे पाईप टाकले.
चित्रगुप्तः पण नॉर्मंडीच्या लढाईत त्या तेलाचा वापरच झाला नाही!
रेडकर: छान! म्हणजे ती पाइपलाइन इतके वर्षं नुसतीच भिजत पडली आहे...
यमदेव: भिजत नाही, कुजत... इंग्लिश खाडीत आहे ना ती! 
माउंटबॅटनः पण मग ब्रह्मदेशातली लढाई आणि मुख्य म्हणजे शेवटी महायुद्ध कोण जिंकलं?
चित्रगुप्तः ब्रह्मदेशातली लढाई तुम्ही आणि महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी.
माउंटबॅटनः म्हणजे आम्हीच की. 
चित्रगुप्तः युरोपातली तुमच्याशिवाय.
माउंटबॅटनः हे खरं नाही. तुमच्या नोंदी चुकीच्या आहेत. असंच जर चालू राहिलं तर तुम्ही मला नक्कीच नरकात पाठवाल... वास्तविक माझ्यामुळे भारताला स्वातंत्र्य...
यमदेवः या यमसदनात कोणावरच अन्याय होत नाही. ती माझी जबाबदारी आहे. चित्रगुप्ता, चल लवकर जमाखर्च सांग. रेडकर, आपण गप्प बसायचं.
चित्रगुप्त (आपल्या खुर्चीत बसतात.) 
आवक - भारताला स्वातंत्र्य दिलं. जावक - भारताची फाळणी केली.
आवक - स्वातंत्र्य वेळेआधी दिलं (जून १९४८ ची मुदत ठरली होती). जावक - स्वातंत्र्य देण्याची घाई केली (१५ ऑगस्ट १९४७ ला), नकाशेही आखण्याआधी फाळणी केली. 
आवक - काश्मिरच्या सामिलीकरणावर सही केली. जावक - काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेण्याचा सल्ला दिला.
आवक - ब्रिटिश राजघराण्याचे नातेवाईक आणि प्रेमळ सल्लागार. जावक - ब्रिटिश लोकशाही उलथून स्वतःकडे सत्ता घ्यायचा प्रयत्न.
यमदेवः काय म्हणता?
रेडकरः शेवट कसा झाला त्यांचा?
माउंटबॅटन: आठवत नाही तुम्हांला? आय. आर. ए. ने मारलं.
रेडकरः म्हणजे इंडियन रिपब्लिकन आर्मी?
यमदेवः हट. आयरिश रिपब्लिकन आर्मी.
चित्रगुप्तः आहे इथे. आवक - हुतात्मा झाले शेवटी. जावक - काही नाही.
यमदेवः म्हणजे?
चित्रगुप्तः निवडा माउंटबॅटन. कुठे जायचंय तुम्हांला? स्वर्ग की नरक?
रेडकरः थांबा. यांच्या हायलाइटस नाही बघितल्या आपण टी. व्ही. वर...
चित्रगुप्तः (रेडकरांना -) ते शक्य नाहीये. सेन्सॉर बोर्डानं सगळ्या चित्रफिती ठेवून घेतल्या आहेत. हं... माउंटबॅटन, सांगा, कुठे जाणार तुम्ही?
(माउंटबॅटन स्वर्गाचं दार उघडून पलीकडे जातात. रेडकर शांतपणे त्यांच्यामागून जातात, 'स्वर्ग' आणि 'नरक' या पाट्या आपल्या मूळ जागांवर लावून टाकतात...पडदा पडतो.)

- कुमार जावडेकर

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

गुलमोहर सोसायटी, हत्ती आणि शेर

"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले,

"नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची."

"विचार करून सांगतो, " मी म्हणालो.

वास्तविक, गप्प बसून राहणे, गप्पा मारत बसणे किंवा अगदी गप्पी मासे पाळणे या 'गप्प' च्या बाराखडीत येणाऱ्या कुठल्याही क्रियेला माझा कधीच विरोध नसतो. मामांनाही हे माहिती आहे. आम्ही आपापल्या बाल्कन्यांमधून अशी चर्चा गेली वीस-बावीस वर्षं करत आलो आहोत. त्यामुळे त्याला 'सामाजिक दूरता' ('सोशल डिस्टन्सिंग') असं नाव कुणी देणार असेल तर देवोत, आमच्या समजात मात्र दूरता नाहीये. फक्त आम्ही कुठलाही नवीन व्याप किंवा उपद्व्याप मांडला की त्याचं रूपांतर ताप किंवा पश्चात्ताप यांत होतं (हे पूर्वीच्या 'कॅस'* किंवा 'व्हॅलेंटाईन डे'*च्या अनुभवांवरून आम्हांला चांगलंच कळून चुकलंय).  कारण कधी कधी इतरांपासूनच आमची 'सामायिक दूरता' मात्र झालेली असते. म्हणूनच मामा या वेळेला काही करण्याआधी माझा सल्ला विचारत होते. 

माझ्या मते सगळेजण आपापल्या घरी बसून जे हवं ते खातायत (शिवाय गरजेनुसार पितायत) ही गोष्ट पुरेशी समाधानकारक होती. नाही तर, पुलंनी म्हटल्याप्रमाणे 'यांच्यासारखा गोंधळ राजकारणीदेखील घालू शकत नाहीत' अशी आमच्याकडे परिस्थिती असते - अगदी दर वर्षी.

प्रथम मामा पार्टीचा प्रस्ताव आणतात. ती कोणत्या दिवशी करायची हा पहिला प्रश्न असतो. २४ डिसेंबर ते १ जानेवारी यातल्या प्रत्येक दिवसावरून चर्चा (आणि मतभेद) होतात. एक तर गुड फ्रायडे-ईस्टर संडे/मंडेंसारखा ख्रिस्ताच्या जन्मदिनाचा वार कुणी  पक्का केलेला नाही.  ती तारीख आठवड्यात कुठेही भरकटलेली असते आणि अनेकांच्या सोयीची नसते. ३१ तारखेच्या आपापल्या पार्ट्या प्रत्येकानं ठरवलेल्या असतात त्यामुळे तो दिवस रद्द होतो. एक तारखेला सगळ्यांना सुट्टी नसते. ज्यांना असते त्यांच्यातल्या काहींना आदल्या रात्रीच्या हँग-ओव्हरची चिंता असते. काहींनी एक तारखेपासून आपण अपेय-पान सोडणार असा एक संकल्प सोडलेला असतो. अर्थात, 'संकल्प' या शब्दालाच 'सोडणे' हे क्रियापद जोडलं गेलं असल्यामुळे त्यांना पुढच्या एक-दोन दिवसांतच अपेय-पान सोडणे  किंवा सोडलेला संकल्प सोडणे असे त्यातून दोन विकल्प सापडतात!

पार्टी सोसायटीपुढच्या अंगणात करायची की गच्चीवर हा मुद्दा मग चर्चिला जातो.  २०१८ च्या संपण्याच्या वेळी अंगणात झालेल्या पार्टीत 'मान ना मान, मै तेरा सलमान' असं म्हणत शर्मानं आपला टी-शर्ट फेकून देऊन नाच केला होता आणि रस्त्यावरून जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीची मेहमाननवाजी ओढवून आणली होती. सुदैवानं त्यांनी ते फक्त बघण्यावारीच नेलं होतं. त्यामुळे शर्माला झाकण्यासाठी गच्चीचे कठडे तरी कामी येतील असं वाटून मग गेल्या वर्षीची पार्टी गच्चीत करण्यात आली होती.  त्यानं तिथे गच्चीच्या कठड्यावर उभं राहून 'टायटॅनिक'चा सीन करायची कल्पना आमच्यासमोर मांडून वात आणला होता. अर्थात, आधीच पुरेशी चढलेल्या शर्माला तितपत चढणंही अशक्य झालं असतं. पण तरी तो धोका न पत्करता आम्ही गच्चीत बऱ्यांच दिवसांपासून पडलेली एक वेताची खुर्ची त्याच्यासमोर आयत्या वेळी सारली होती.  तो आणि सौ. शर्मा तिच्यावर टायटॅनिक पोज मध्ये उभे राहताच त्या खुर्चीचंच टायटॅनिक झालं होतं!

पार्टीतले गेम्स हा पुढचा मुद्दा येतो. भुजबळांचे पार्टी गेम्स हे आमच्या पार्ट्यांचं आकर्षण असतं. (निदान असा त्यांचा समज आहे.) त्यांना डोळ्यांना पट्टी लावणं (इतरांच्या) या गोष्टीचं अत्यंत अप्रूप आहे. त्यात (मुलांनी) गाढवाला शेपटी लावण्यापासून ते (मोठ्यांनी) ऐश्वर्याला बिंदी (किंवा अभिषेकला शेंडी) लावण्यापर्यंत सगळे सोपस्कार होतात. जसं वर्ष पालटतं, तसे गाढवाच्या ऐवजी हत्ती/घोडे आणि ऐश्वर्या/अभिषेकच्या ऐवजी दीपिका/रणवीर वगैरे येतात एवढाच काय तो बदल. 

उमा मुलांचा नाच बसवते, काही मुलं गाणी म्हणतात. मीही कुणी तरी फर्माइश केल्याचं निमित्त करून एखादी गझल म्हणतो.

मामांची रॅफल तिकिटं, त्यातून जिंकलेली बक्षिसं (जी मला कधीच मिळत नाहीत), त्यानंतर बरोब्बर बारा वाजता त्यांचं सँटाक्लॉज होऊन येणं आणि मुलांना भेटवस्तू देणं, रॅफलचे उरलेले पैसे आपण कुठल्या संस्थेला देणार आहोत त्याची वाच्यता करणं हे बाकीचे नित्याचे कार्यक्रम होतातच.

मेनूवर मात्र पूर्वीच तोडगा निघालेला आहे. दिवाळीला साग्रसंगीत भारतीय जेवण तर नवीन-वर्षाला पाश्चात्य. त्यात पिझ्झ्याबरोबर बर्गर्स, शिवाय त्याआधी "कुछ तो स्पायसी स्नेक्स चाहिये" या दोशीच्या मागणीवरून समोसे (मग मराठी पदार्थ का नकोत म्हणून भुजबळांच्या इच्छेप्रमाणे बटाटेवडे), अगदीच कुणाची संकष्टी निघाली तर त्यानं कष्टी होऊन नये म्हणून साबुदाणे वडे (आणि बर्गरसोबत आलेल्या फ्रेंच फ्राईज) असतात.  आता इतके सगळे पदार्थ आहेतच तर शेवटी भात खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखं वाटत नाही म्हणून मी, परुळेकर मामा-मामी त्या यादीत पुलाव घुसवतो. ब्लॅक फॉरेस्ट केक आणि  त्याच जोडीला 'वॅनिला आईसक्रीम और गुलाबजामून का काँबिनेशन होना चाहिये' म्हणून तेही समाविष्ट झालेले असतात... 

आता या सगळ्यांत परिस्थितीजन्य बदलांपेक्षा अन्य काही करणं मला अवघड वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी मी पुनः बाल्कनीत आलो. मामांना म्हटलं,

"एक सकारात्मक गोष्ट सांगायची आहे. ती आपल्या पार्टीत चालेल का बघा. "

"म्हणजे ही कल्पना आवडली तर तुम्हांला. "

"थांबा, आधी गोष्ट तर ऐका, " मी सुरुवात केली, "अलीकडेच एक बातमी वाचली - 'हत्तीच्या सुटकेला 'शेर' धावून'...

"हो, वाचली आहे मी ती."

"सकारात्मक आहे की नाही? "

"प्रश्नच... "

मी मामांना मध्येच अडवत म्हटलं,

"थांबा. विचार करा. पाकिस्तानातल्या एकाकी हत्तीच्या सुटकेसाठी 'शेर' नावाची एक पॉप गायिका धावून आली. तिच्या मदतीनं त्या हत्तीला विमानात घालून कंबोडियात नेण्यात आलं. आता तिथे त्याला तीन हत्तिणी सांगून आल्या आहेत. अशी ती पूर्ण बातमी आहे." (https://www.bbc.co.uk/news/av/55122863)

मामा हसले,

"खरं आहे. वास्तविक तो हत्ती पाकिस्तानातला. म्हणजे भारतीय वंशाचाच असणार. मग त्याला भारतातलंच स्थळ का नाही बघितलं? इथे काय हत्ती नाहीत का?"

"नाही तर काय? शिवाय विमानानं पाठवायची काय गरज होती? भारतात तो चालत चालतही येऊ शकला असता. "

"पण तो आला नाही तेच बरंय. त्याला बाटवून त्यांनी हेर केला नसेल कशावरून? "

"आता असं केलं पाहिजे. निदान त्या कंबोडियातल्या अंकोर वाट मध्ये शुद्धीकरण करून त्याची चांगली मुंज लावली पाहिजे आधी. "

दोघेही हसलो. मामा म्हणाले,

"छे. छे. ही बातमी अजिबात सकारात्मक किंवा आनंददायी नाहीये."

"ठीक आहे. तुम्हांला दुसरी एक बातमी दाखवतो," मी म्हटलं.

'महाराष्ट्रातला एक एकटा वाघ तीन हजार किलोमीटर चालून शेवटी महाराष्ट्रातल्याच दुसऱ्या अभयारण्यात पोचला' अशी ती बातमी होती.  (https://www.bbc.co.uk/news/world-asia-india-54973452)

"यात काय सकारात्मक किंवा आनंददायी आहे? "

"राष्ट्रच काय पण महाराष्ट्रदेखील सोडला नाही त्यानं. बायको करीन तर आपल्याच जातीची."

"खरं आहे. वाघाची नरभक्षक म्हणून ओळख होती, संस्कृतीरक्षक म्हणून आजच झाली. अगदी शिवसेना किंवा म. न. सेना यांच्या वाघांना जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं."

मामांनी लवकरच पार्टीची घोषणा केली. त्यात भुजबळांनी एक 'व्हर्च्युअल क्विज' घेतलं. उमानं 'झूम'वर मुलांचा एक 'सिंक्रोनाईज्ड डान्स' करवून दाखवला. शर्मा फक्त "इस बार वो मजा कहां' असं बार बार म्हणून घेत होता. (त्याचा फोन मात्र मधेमधे 'म्यूट' वर जात होता आणि कॅमेरा बंद पडत होता. )

मधल्या गप्पांमध्ये कोविडवरची लस, ब्रेक्झिट, शेतकरी, सर्वबाद छत्तीस असे अनेक विषयही चघळले गेले.

निरोप घेताना आम्ही एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

"आपण उगाचच आपल्या आवडीनिवडी जगावर थोपवायला बघतो. आहे ते उत्तमच आहे. " मामा दुसऱ्या दिवशी मला म्हणाले.

- कुमार जावडेकर

(* ह्या कथा अनुक्रमे 'लोकसत्ता - हास्यरंग पुरवणी सप्टेंबर २००३' आणि माझ्या 'निवडक अ-पुलं' या इ-पुस्तकात पूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत.)

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण

काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या.

आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.)

असं अनेकदा होतं. काही गाणी आपण रेडिओ, टीव्ही, सीडी. इ. माध्यमांतून पुनः पुन्हा ऐकतो, पुनर्प्रत्ययाच्या आनंदासाठी. काही गाणी तर इतकी लवकरच का संपून जातात असंही वाटतं. 'नखरेवाली' या गाण्यात किशोर कुमारला अजून एक तरी कडवं का नाही इथपासून 'किरवाणी' या रागातली गीतं कितीही ऐकली तरी अधुरीच का वाटतात (आणि मनात तो राग रेंगाळतच का राहतो) असे प्रश्न मला वारंवार पडत आले आहेत.

याउलट काही गाणी रेडिओ, टीव्ही, कॅसेट, सीडी, मोबाईल, युट्यूब कुठूनही ऐकू आली की आपल्याकडून त्यांना बदलणं किंवा बंद करणं या क्रिया घडवण्यासाठीच तयार केली जातात का?

कधी कधी मला असं वाटतं की रसग्रहणाचेही कदाचित तीन प्रकार असावेत. 

पहिलं साधं-सोपं रसग्रहण. उसाचा रस पिण्यासारखं. निव्वळ आनंद. कितीही वेळा घ्यावा. आपली भूमिका फक्त घेणाऱ्याची.

दुसरं रसग्रहण म्हणजे, गाणं चवीनं ऐकणं किंवा पुस्तक चवीनं वाचणंच; पण त्याबरोबरच त्यातली सौंदर्यस्थळं जाणून घेऊन. त्या रागांच्या, कवितांच्या किंवा नाटकांमधल्या संवादांतल्या खुब्या लक्षात घेऊन केलेलं. बालगंधर्वांनी भीमपलासमध्ये लावलेल्या शुद्ध निषादासारखं. (अर्थात, या गोष्टीचा विषाद वाटणारेही काही महाभाग होतेच.)

तिसरा 'रसग्रहणा'चा अर्थ - रसाला लागलेलं ग्रहण - असा असेल का?... असा प्रश्न मला अनेक वेळा पडतो. (आता अर्थात, प्रश्न पडतो हे म्हणणं मला खरं तर पटत नाही. तो तर उभा असतो... 'खडा सवाल' म्हणून आणि आपल्याला टोचत असतो, आपल्या विचारधारेत - की रसात - खडा आल्यासारखा.) या रसग्रहणात 'चंद्रग्रहण' म्हणजे चंद्राला लागलेलं ग्रहण, सूर्यग्रहण म्हणजे 'सूर्याला लागलेलं ग्रहण'; त्याचप्रमाणे 'रसग्रहण' म्हणजे रसाला लागलेलं ग्रहण असं अभिप्रेत आहे.

असो. रसग्रहण कुठलंही असो, विषय गोड असला म्हणजे झालं. पेरू खाणाऱ्याला बियांचं वावडं नसावं.

अन्नू मलिकबद्दलचं रसग्रहण हे दुसऱ्या प्रकारातलंच आहे हे तरीही मला सुरुवातीलाच (म्हणजे नमनाला घडाभर तेल झाल्यावर) नम्रपणे, नमून, नमूद करावंसं वाटतं.

"अन्नू मलिक यांच्याबद्दल मला एक चांगली गोष्ट सांगायची आहे, " एका कार्यक्रमात एक निवेदक म्हणाला होता, "की ते सरदार मलिकांचे चिरंजीव आहेत." या वाक्यावर सगळे श्रोते हसले आणि चिरंजीव अन्नूला असं 'विरासती' मधून चांगल्या संगीताचा वारसा मिळाला असला  तरी त्याचं संगीत कसं चिरंजीव नाही याची त्यांना जाणीव झाली. वास्तविक, 'सारंगा तेरी याद में' हा एक रंग सोडला तर मला तरी सरदारांचे इतर रंग काही फारसे याद किंवा ज्ञात नाहीयेत. अन्नूचे मात्र अनेक राग-रंग बघितले आहेत. पण काय आहे, जुन्या लोकांसारखा अन्नू मलिकला कुणी वाली (किंवा राममित्र सुग्रीव) नसल्यामुळे कुणीही माकडं त्याची चेष्टा करू शकतात. वास्तविक हिंदीत 'चेष्टा' म्हणजे 'प्रयत्न'. तशी संगीताची चेष्टा अन्नू मलिकनं खूपच केलेली आहे, याबद्दल कुणाचं दुमत नसावं!

'एखादी गोष्ट पडणे म्हणजे त्याचा अण्णू गोगट्या होणे' हे जसं पु.ल. 'अंतू बर्वा'त म्हणून गेले होते, तसाच काहीसा समज माझा अन्नू मलिकबद्दल झाला होता. ‘एखादे गाणे न आवडणे म्हणजे ते अन्नू मलिकचे संगीत असणे' असं मला अनेक दिवस वाटत आलं होतं.

'त्यासाठी रसिकता म्हणजे काय हे तुम्हांला आधी कळलं पाहिजे' असं माझे एक विद्वान मित्र म्हणाले. मी त्यांना पु. लं. च्या 'गाठोड्या'तली सामंतांच्या घरची मासे खाण्याची 'रसिकता' सांगण्याचा मोह आवरला. आता त्यांच्यासारखं (म्हणजे आमच्या मित्रवर्यांसारखं - सामंत वैनींच्या बांगड्याच्या आमटीसारखं नाही -) रसग्रहण जर मी करायला लागलो तर माझी काही खैर नाही.

"१९६० नंतर संगीत संपलं." (वास्तविक आमच्या मित्रांचा तेव्हा जन्मही झाला नव्हता.) "शास्त्रीय संगीतात फक्त आमिर खान आणि बडे गुलाम अली खान, तर चित्रपट संगीतात नौशाद, सज्जाद आणि सुरुवातीचा मदन मोहन यांपलीकडे काही दम नाहीये", असा त्यांनी एकदा मला सज्जड दम भरला होता. (आता सज्जादचा नौशादवर फार राग होता हे त्यांना माहिती होतं की नव्हतं याची शहानिशा मी न करता फक्त त्यांच्यासमोर 'ये हवा ये रात ये चांदनी' हे माझं सर्वांत आवडतं गाणं आहे अशी कबुली दिली होती.)

सज्जादचं जाऊ द्या; पण नौशाद किंवा शमशादवरसुद्धा लिहिण्याची कुणाची बिशाद आहे? शिवाय, जुन्या कुठल्याही विषयावर काही लिहायचं म्हणजे हे मित्र सोडून अनेक इतर व्यक्ती-प्रकृतींनाही सामोरं जावं लागतं. म्हणून आमचा बिचारा अन्नू बरा. आता साधी गोष्ट घ्या. 'बैजू-बावरा'तलं प्रत्येक गाणं (आमिर खान यांच्या गाण्यांचा अपवाद वगळता) 'हो जी हो' नं सुरू होतं. म्हणून आम्ही ते संगीत चांगलं या म्हणण्याशी 'हो ला हो' करतो. 'बचपन की मुहब्बत को' आळवतो. पण अन्नूच्या 'बाली उमर ने मेरा हाल वो किया' ला नावं ठेवतो. वास्तविक दोन्ही चित्रपटांच्या गीतांमध्ये लता मंगेशकर आहे. आता बैजूमधल्या बावऱ्या महंमद रफी ऐवजी इथे अजीजीनं गायलेल्या महंमद अजीजचाच काय तो फरक.

याखेरीज, अगदी बडे गुलाम अली खान किंवा आमिर खान नसले तरी गुलाम अलीच्या आवाजात त्याच चित्रपटात गीत ध्वनिमुद्रित करूनही अन्नू 'चमकता चांद' होण्याऐवजी 'आवारगी'च 'टूटा हुआ तारा' ठरला. हीच त्याची गत पुढे (चालू काळातल्या) आमिर खानला घेऊन केलेल्या 'अकेले हम, अकेले तुम' नं केली. आमिर खान हा एक अयशस्वी संगीतकार असतो अशी ती कथा होती आणि अन्नू(अण्णू)नं ती, अत्यंत सहजपणे, अत्यंत यशस्वीरित्या सादर केली होती.

'१९४२-अ लव्ह स्टोरी' च्या काळात आर. डी. बर्मनचं निधन झालं आणि पुढच्या 'करीब' या चित्रपटासाठी विधुविनोद चोप्रांनी अन्नूला जवळ केलं. त्याची गाणी लोकप्रिय झाली असतील, पण नवीन आर. डी. सापडला असं कुणी म्हटलेलं अन्नूच्या नशिबात काही आलं नाही. 'बॉर्डर'नं सोनू निगमचा उदय झाला आहे हा संदेसा दिला, तर 'रेफ्युजी'नं जावेद अख्तरच्या शब्दांनाच जास्त भाव दिला. 'अशोका'च्या संगीताची त्याच सुमारास आलेल्या 'लगान' मार्फत रहमाननं विकेट काढली आणि 'उमराव जान' ऐकताना लोकांना नवीन अन्नू स्मरणात राहण्यापेक्षा जुना खय्यामच आठवत राहिला.

अन्नूनं तरीही आपल्या अख्ख्या कारकीर्दीत कधी डगमगण्यात किंवा हिरमुसण्यात वेळ घालवला नाही. 'बाजीगर' नंतर आपला पथच नाही, तर आपला 'विजयपथ' कोणता आहे हे त्यानं 'राहों मे उन से मुलाकात हो गयी' म्हणत स्पष्ट केलं. आधीच्या 'सोनी महिवाल' किंवा 'मर्द'वर लक्ष्मीकांत-प्यारेलालचा प्रभाव असेल, पण आता चलती असलेल्या नदीम-श्रवणच्या संगीत-संयोजनाशीही आपण कशी सलगी करू शकतो हे त्यानं दाखवून दिलं. पुढे नदीम-श्रवण आटपले/आपटले, पण अन्नू 'फिर तेरी कहानी याद आयी', 'सोल्जर', 'बादशहा', 'डुप्लिकेट', 'सर' पासून 'मुन्नाभाई एम. बी. बी. एस.', 'मै हूं ना' पर्यंत लोकप्रियच होत राहिला आणि आपलं संगीत-संयोजनही काळाप्रमाणे बदलत राहिला.

'मास अपील' मिळालं; त्याला फक्त साधलं नाही ते 'क्लास अपील'. अर्थात, त्या मोहातही तो पुढे कधी पडला असेल असं वाटत नाही. आपलं संगीत 'उरलो उपकारापुरता' या भावनेनं 'दम लगाके हैश्शा' करत तो ढकलत बसला आणि 'चमत्कार' झाला! (हा १९९२ मधला 'प्यार हो जाएगा' हे गीत असलेला त्याच्या उमेदवारीच्या काळातला 'चमत्कार' नव्हता.) 'मोह मोह के धागे' हे गीत त्यानं संगीतबद्ध केलं आणि कधी नव्हे ते अन्नू मलिकला अनुल्लेखानं मारणारेच त्याचं गुणगान गाऊ लागले.

'सम्हाला है मैने बहोत अपने दिल को, जुबांपर तेरा फिर भी नाम आ रहा है' ही अन्नूची ओळ आळवायची पाळी आता त्या बिचाऱ्यांवर आलेली होती!

'रास्ते आस्ते चल जरा' एवढंच अन्नू यानंतर त्यांना म्हणाला, मनातही आणि जनातही. त्यानं आपलं धोरणही चालूच ठेवलं - 'बत्ती गुल, मीटर चालू.'

- कुमार जावडेकर

शुक्रवार, १२ जून, २०२०

बटाट्याच्या चाळीतला लॉकडाउन

बटाट्याच्या चाळीतल्या 'लॉकडाउन'ची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यानं झाली!

चापशीनं पुढाकार घेऊन मेंढेपाटलांची परवानगी आणली; पण नेमका किल्ली हरवून बसला! वास्तविक ते कुलूप, कडी आणि दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी टाचणी, पिना, हातोडी, लाथ असं काहीही चाललं असतं. त्यानं आपल्या कानावरच्या बॉलपेनानं त्या कुलुपाची कळ फिरवली आणि चाळकऱ्यांची कळी खुलली.

चाळकऱ्यांचं 'लॉकडाउन' यामुळे होऊ लागलेल्या 'अप-डाउन'मधून मार्गी (?) लागलं. 'निदान गच्चीतली हवा आणि ऊन तरी खायला मिळतील,' अशा समजातून ते मेंढेपाटलांना दुवा देऊ लागले. (अनेक जण भाडं देत नव्हतेच त्यामुळे मेंढेपाटलांना चाळीकडून जी काही नवीन प्राप्ती झाली ती इतकीच.)

'गच्चीत सुरक्षित अंतर ठेवून धान्य-विक्री करता येईल' असा चापशीचा अंतस्थ हेतू होता. तो जाणल्यामुळे किंवा गच्चीमुक्तीच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान न लाभल्यामुळे आचार्य बाबा बर्वे मात्र हिरमुसले. त्यातच चापशीच्या कुलूप उघडण्याचा सोहळा पोंबुर्पेकरानं त्याच्या 'चाळभैरव' या (अ-)नियतकालिकाच्या 'फेसबुक' पानावर 'लाइव्ह' दाखवला!

नागूतात्या आढ्यांचा प्रत्येक गोष्टीलाच विरोध. 'खोलीबाहेरच पडता कामा नये' असं त्यांचं म्हणणं होतं.

'सगळेच लोक जर एकदम गच्चीत जायला लागले तर त्यांच्यांत अंतर राहणार कसं?' असा प्रश्न जोगदंडांनी एकदा जिना चढताना विचारला. त्यावर 'बरोबर आहे, आपण प्रत्येकाची 'वर' जायची वेळ ठरवली पाहिजे,' असं कोचरेकर मास्तरांनी वरच्या दारातून सुचवलं. अर्थात, त्याची अंमलबजावणीही त्यांच्यावरच आली.

दुसऱ्या दिवशी जिन्याखालच्या भिंतीवर एक वेळापत्रक चिकटवलेलं चाळकऱ्यांना दिसलं. सोबत गच्चीचा आराखडा आणि त्यावर आखलेले एक-दिशा मार्ग! 'सुरक्षित अंतर ठेवून वीस मंडळी एका वेळी गच्चीत मावू शकतात. चापशीच्या दुकानाच्या वेळेत ही संख्या दहावर येईल' अशा सूचनेसकट.

वेळापत्रकाची फक्त झलक -

५.५५ ते ६.०० - जिना चढण्याची वेळ.
६.०० ते ६.३० - बर्वे (पहिला क्रमांक मिळाला म्हणून बाबा खूष!), सोमण, पावशे, गुप्ते.
६.३० ते ६.३५ - जिना उतरण्याची वेळ.
६.३५ ते ६.४० - पुढील मंडळींच्या जिना चढण्याची वेळ.
....

अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या चाळकऱ्यांसाठी स्वतंत्र वेळा होत्या.

काही दिवसांतच 'नळ आणि इतर विधींचा वेळापत्रक?' अशी तळटीप त्यात सामील झाली. मालवणीत 'चे' चा 'चा' होतो हे काहींना माहिती होतं. मग त्यावर 'जनोबा तुझो आणि नळाचो काय रे संबंध?' अशी अजून एक टिप्पणी आली. हळू हळू या भित्तीपत्रकाशेजारी 'चाळभैरव', कविता (नाही निर्मळ हात? -  करोना करेल घात!), 'आज रात्री नऊ वाजता टाळ्या' (त्यात नागूतात्यांची 'मग शिट्ट्याही का नाहीत?' ही भर) इत्यादी बातम्याही चिकटू लागल्या.

मंगेशराव, वरदाबाई आणि काशिनाथ नाडकर्ण्याचा मुलगा यांची वेळ एकच होती. त्यांनी गच्चीत पेटीवादन, तबलावादन आणि गायन दोन-दोन मीटरचं अंतर ठेवून सुरू केल्यावर आणि त्याला नाट्यभैरव कुशाभाऊंच्या स्वगतांची जोड मिळाल्यावर चाळकऱ्यांनी आपल्या खोलीतच आपल्याला 'विलग' केलं!

चाळीच्या (विशेषतः जिन्याच्या) दीर्घारोग्यासाठी बाबलीबाईंनी मात्र स्वतःच गच्चीप्रयाण करणं टाळलं.

नागूतात्या मोदी-ट्रंप यांच्या निवेदनांपासून बटाट्याच्या चाळीतल्या या संवेदनांचं धावतं वर्णन आपल्या खोलीच्या दारात उभं राहून, जो कोणी जिन्यात दिसेल त्याच्याशी करत होते. प्रत्येक संभाषणाचा शेवट मात्र 'मी हे आधीच ओळखलं होतं' हा असायचा.

एकदा ते दारात दिसले नाहीत तर चाळकऱ्यांनाही चुकल्यासारखं वाटलं.

... त्यांना करोनाची बाधा होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं!

बटाट्याची चाळ अजूनही आत्मनिर्भरपणे का उभी आहे हे तेव्हा जगाला कळलं. त्या बाजूच्या खोल्यांचं विलगीकरण झालं. कुणी त्यांच्यासाठी नाश्ता पाठवला तर कुणी जेवण. डॉ. (कंपाउंडर) हातवळणे, चवाथे नर्सबाई, समेळकाका (न्यू गजकर्ण फार्मसी) यांनी त्यांच्या औषधोपचारांची जबाबदारी घेतली. दोन आठवडे, रोज, अण्णा पावशे त्यांची कुंडली मांडत होते आणि आचार्य बाबा बर्वे एका वेळच्या उपोषणावर होते.

अखेर नागूतात्या बरे झाले. ते पुनः दारात आल्यावर अख्ख्या चाळीनं टाळ्या वाजवल्या. 

'मी हे आधीच ओळखलं होतं' एवढंच ते म्हणाले...

- कुमार जावडेकर

पु. ल. स्मृतिदिनानिमित्त (१२ जून २०२०) आयोजित केलेल्या 'पुलोत्सव' या स्पर्धेत पारितोषिक विजेती कथा.

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

निवडक अ-पुलं (थोडं पुलं, थोडं अपुलं)

My dream book ‘निवडक अ-पुलं (थोडं पुलं, थोडं अपुलं)’ is published as an e-Book now!

पु, लं. चा विनोद आपल्याला पुनः पुन्हा हसवत असतो.
त्यांची आठवण, त्यांची पात्रं आणि त्यांच्यासारखी शैली पुनश्च वाचकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न! 'पु. ल. - अखेरचा अध्याय', 'बटाट्याची चाळ - बाजीराव आणि मस्तानी', इत्यादी कथांमधून.
आणि त्याचबरोबर थोडंसं अ-पुलंही! -
काळानुसार बदललेल्या अनेक नवीन व्यक्ती आणि वल्लींतून.
अन् प्रसिद्ध घटनांच्या आणि व्यक्तिमत्त्वांच्या उडवलेल्या खिल्लीतून!

India:



UK:



USA:

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

मॅच-फिक्सिंग

क्रिकेटमधलं मॅच फिक्सिंग जेव्हा हॅन्सी क्रोनिएनं दिल्ली पोलिसांना दिलेल्या कबुलीतून जाहीर झालं, त्यावेळी - १२ एप्रिल २००० या दिवशी - मी ही कथा लिहिली होती 'लोकमत. पुणे'मध्ये 

गुलमोहर सोसायटीच्या कमानीतून मी कमीत कमी वेगानं आत गाडी वळवली, जवळ-जवळ थांबलोच म्हणा ना. असं केलं ना की तिथे खेळणाऱ्या मुलांचं लक्ष वेधलं जातं (गाडीचा हॉर्न न वाजवताही. हे महत्त्वाचं. फक्त आपल्यात थांबायची तयारी हवी.).... बोलर आपण लांबच लांब आपला रन-अप धुंडाळत जातो. मिड-ऑफचा लाँग-ऑफ होतो आणि फॉरवर्ड शॉर्टलेगचा बॅकवर्ड. जेव्हा जेव्हा एखादी गाडी आत वळते, तेव्हा तेव्हा असंच फील्ड सेटिंग बदलतं. 

आज मात्र असं काहीच घडलं नाही. मी थोड्याशा आश्चर्यानंच बघितलं. तीन स्टंप्स जागेवरच होते. एक बॅटही शेजारी पडलेली होती. मुलं बहुधा बॉल शोधायला गेली असावीत असा विचार करत मी जिना चढायला लागलो. घरी गेल्यावर बाल्कनीत बसून चहा पिता-पिता पोरांचं क्रिकेट बघता येईल की नाही? बॉल हरवला असला तर तो शोधायला किंवा नवीन बॉल आणायला किती वेळ लागेल, असा विचार करत मी घरात शिरलो. शेजारच्या घरातनं त्याच वेळेला आपल्या हातात काहीतरी घेऊन गेलेला विनीत मात्र माझ्या नजरेतून काही सुटला नाही. अर्थात मी त्याला काही विचारण्याआधीच तो गायब झाला.
चहाचा कप घेऊन जेव्हा मी बाल्कनीत आलो, तेव्हा मात्र खेळ सुरू झालेला होता. मी मनातल्या मनात 'हुश्श' करणार एवढ्यात माझं लक्ष विनीतकडे गेलं. हे साहेब चक्क सोसायटीच्या भिंतीवर चढून हातात मोबाईल (बहुधा बहिणीचा खेळातला) घेऊन बसले होते. एरवी स्वतः कप्तान असल्याच्या थाटात बोलिंग करताना सतत ऑर्डर्स देणारा, बॅटिंग करताना स्वतःला नाबाद म्हणणारा आणि क्षेत्ररक्षण करताना उगाचच आरडाओरडा करणारा विनीत नुसताच बसलेला? कमानीच्या दुसऱ्या बाजूच्या भिंतीवर असेच आमचे चिरंजीव पिंटूही बसलेले होते. दोघांच्याही हातात मोबाईल फोनसदृश काही तरी चीजवस्तू होत्या.
उरलेली तीन-चार मुलं मात्र खेळत होती. एकानं बॉल टाकला. तो बॅटसमनच्या पायावर आपटला. 'हाउज दॅट' म्हणून अपील झालं. विनीतनं भिंतीवरूनच 'नाही, आऊट नाहीये' असं सांगितलं. इकडे पिंटू आपला फोन कानाला लावून 'सिक्स बॉल्स, फोर रन्स' असं ओरडला. 'तुला जिंकायचं आहे का?' अशी विनीतनं त्यावर पृच्छा केली. 'होय!' आमच्या पिंटुरावांनी त्यावर उत्तर दिलं!
'अरेच्च्या! हे काय नवीन? ' असा प्रश्न माझ्या मनात आला आणि अचानक एकदम लख्ख प्रकाश पडला.  सकाळीच पिंट्यानं मला विचारलं होतं,
"बाबा, मॅच फिक्सिंग म्हणजे काय हो?"
मी वर्तमानपत्र वाचत असताना हा उलट्या बाजूनं नको त्या बातम्या तेवढ्या नेमक्या वाचत असतो! त्यातून क्रिकेटची बातमी म्हटल्यावर कशी सोडेल?
"मॅच फिक्सिंग म्हणजे आधी ठरवून खेळणं. आधी कोण जिंकणार हे ठरवायचं आणि मग त्याप्रमाणं खेळायचं."
तसा मी संस्कारप्रिय असल्यामुळे त्यातला 'बेटिंग' हा मुद्दा वगळलाच.
"काय, बघताय ना आजचा खेळ? " शेजारच्या बाल्कनीत नुकत्याच आलेल्या परुळेकर मामांचा आवाज आला.
"हो ना! पोरांनाही कळलं वाटतं बेटिंग?"
"कळलं? अहो, त्या क्रोनिएचं पूर्ण संभाषण पाठ झालंय आमच्या विनीतचं! सांगत होता, 'आता यापुढे प्रत्यक्ष कप्तान म्हणून खेळण्यापेक्षा असाच बाजूला बसून 'गेम हँडल' करेन.' आता बोला! "
"काय म्हणता?"
"तर हो... काय नको ते शिकून येतात. आता कसं समजावायचं त्यांना?"
"अहो मामा, लहान मुलं आहेत. शिकतात नवीन फॅडं आणि टिकतात ती दोनच दिवस!"
"पाहा बुवा! 'मॅच जिंकण्याच्या बदल्यात पिंट्याकडून सगळा गृहपाठ करून घेईन' असं म्हणत होता विनीत!"
मी फक्त हसलो.
"मला वाटलं गंमत वाटतेय मुलांना. चांगलं सोडून वाईट मात्र लवकर शिकतात. थांबा जरा, बघतोच त्याला..."
आमच्या गप्पांमध्ये खालची मॅच संपल्याचं माझ्या लक्षातच आलं नव्हतं. कोण जिंकलं ही उत्सुकता मला होतीच. पिंट्या घरात शिरला (आणि बहुधा विनीतही त्याच्या घरात). मी काही बोलणार एवढ्यात आत जाऊन तो दोन वह्या हातात घेऊन आला.
"शहाण्या, हात-पाय तरी धू!" मी म्हटलं.
"बाबा, आम्ही आज मॅच फिक्सिंग खेळलो, "तो माझ्या बोलण्याकडे (नेहमीप्रमाणे) संपूर्ण दुर्लक्ष करत म्हणाला, "पण तुम्ही कुठे मला सांगितलं होतं की असं आधी ठरवून खेळण्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी द्यावं लागतं? आता विनीतचं होम-वर्क कोण कॉपी करणार?"
मी काही बोलणार एवढ्यात बेल वाजली. बघतो तर विनीत दारात!
त्याच्या चेहेऱ्यावर मामांचे दोन धपाटे स्पष्ट लिहिलेले दिसत होते.
"ए पिंटू," आपला आवाज कसाबसा फोडत तो म्हणाला, "नको रे बाबा हे मॅच-फिक्सिंग. आजोबा म्हणतात, अशा लोकांना चांगली शिक्षा द्यायला हवी!" आपली वही घेऊन तो निघून गेला.
पिंट्या हळूच माझ्याकडे आला आणि म्हणाला,
"मला पण नको बाबा... किती बोअरिंग! ठरवून आऊट होताच येत नव्हतं!"
... आमच्या गल्लीतलं मॅच-फिक्सिंग असं संपलं. आमची गल्ली छोटी, मुलं छोटी, पैजाही छोट्याच! (... आणि शिक्षाही छोट्याच!)
दिल्लीतल्या मॅच-फिक्सिंगचं काय?

- कुमार जावडेकर

रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

लेले आनंदले

सचिन पिळगावकर आणि वसंत सबनीस जर लेले आजोबांना भेटले असते, तर 'अशी ही बनवाबनवी'च्या पूर्वार्धात दाखवलेल्या पुणेरी घरमालकाच्या पात्रात त्यांनी बदल केला असता. इतका प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदी  पुणेकर माझ्या तरी पाहण्यात नाही. (ही कथा काल्पनिक आहे. घटना, स्थळं आणि पात्रं प्रत्यक्षात आढळली तर केवळ योगायोगच समजू नये, अयोग्यही समजावं ही विनंती.) खुलासा - इतर पुणेकर प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदीच असतात, लेले आजोबांइतके नसले तरी. ते स्वतः वर आणि पुण्यावर प्रेम करतात (कुण्या सोम्यागोम्या व्यक्ती किंवा शहरावर करत नाहीत), आतिथ्य वेळ पाहून करतात (म्हणजे दुपारचे एक ते चार आणि रात्री सातनंतरची वेळ टाळून) आणि त्यांचा विनोद पाट्या-पाट्यांमधून काळ्या दगडावरची रेघ म्हणून आपल्या दृष्टीस पडत असतो.

फक्त सबनीस / पिळगावकरांना हे का जाणवलं नाही हा खरा प्रश्न आहे. कदाचित, सचिन एक 'रीमेक'काढून चुकीची दुरुस्ती करतीलही. हल्ली रीमेक / सिक्वलची  फॅशन आहे. ('संजू' चं नाव 'संजू बन गया जंटलमन' असं ठेवायला हवं होतं असं अलीकडेच राजू हिरानी म्हणाल्याचं कळतं. आता ते खरा संजय दत्त म्हणून उभा करण्यासाठी 'लगे रहो संजूभाई' आणतायत. त्यामध्ये तो 'खलनायक' होऊन 'मान्यता' पावेल असं दाखवण्याविषयी त्यांचा खल चालला आहे असंही ऐकण्यात आलं आहे.)

असो...माझी पुण्याबद्दलची, त्यातून तिथल्या माणसांबद्दलची आणि विशेषतः तिथे आपल्याला लाभणाऱ्या शेजाऱ्यांबद्दलची धाकधूक घालवण्याचं मोठं श्रेय लेले आजोबांना जातं. कार्तिकी एकादशीच्या दिवशी मी प्रथम त्यांना भेटलो होतो. मी सकाळी 'इंद्रायणी'त चांगला ऑम्लेट/कटलेटचा नाश्ता केलेला असूनही मला आजींनी आग्रहानं साबुदाण्याची खिचडी खायला घातली होती... आपल्या पुण्यातल्या मुक्कामाच्या पहिल्याच दिवशी उपासाच्या मुहुर्ताला न जुमानता कुणी मला खायला घातलं होतं ही माझी पुण्याई मी अत्यंत अभिमानाने अनुभवी लोकांना सांगितली आहे. किंबहुना मी ती तशी सांगावी हे लेले आजोबांनी तितक्याच हट्टानं मला बजावलं होतं. 

"आता पुढच्या वेळी मटार-उसळ, वरण-भात आणि शिकरणीचा बेत करूया, " असं मी माझ्या त्यांच्या शेजारच्याच घरात आलेल्या सामानाचं स्वागत करायला जाण्यापूर्वी त्यांनी डोळे मिचकावत मला सांगितलं होतं.

"ह्यांचं काय ऐकतोस रे.... गंमत करतायत तुझी. स्वतः जाऊन श्रीखंड घेऊन येतील बघ ते चितळ्यांचं." आजी हसत म्हणाल्या होत्या....आणि खरंच, काही दिवसांनी, चक्क (चक्का नव्हे) चितळ्यांचं आम्रखंड, वर त्यात आजोबांनी स्वतः केळी, सफरचंद, द्राक्षं  इत्यादी फळ घालून केलेलं 'फ्रूट सॅलड' खायचं भाग्य मला लाभलं होतं. आजोबांनाही मधुमेह असल्याचं आजींनी याच वेळी मला सांगितलं होतं... 'बनवाबनवी'शी अजून एक संबंध.

"तुझा नाही का रे इस्रायलला एखादा मित्र? " त्याच वेळी आजोबांनी मनातलं ओळखून मला विचारलं होतं; आणि वर लगेच मला सावध केलं होतं, 

"मला फसवू शकणार नाहीस हं तू औषधांच्या बाबतीत. हिंदुस्थान अँटिबायोटिक्समध्ये नोकरीला होतो मी." 

"तो कशाला फसवणार आहे तुम्हांला?  त्याचीच बहुधा इथे येऊन फसगत झाल्यासारखी अवस्था झालीये," आजी माझी बाजू घेऊन म्हणाल्या होत्या. पण आजोबा स्वतःच्याच विनोदावर हसत होते.

... लेले आजोबांबद्दल अजून काही सांगण्याआधी आनंद दामले या वल्लीची ओळख करून घेणं भाग आहे. त्यांची माझी भेट होण्यासाठी तोच कारणीभूत ठरला होता. काही व्यक्ती काही पुण्यं अगदी बेमालूमपणे करून जातात, त्यातलंच त्याचं हे एक.

आत्ताही तो समोर आल्यामुळेच मला हे सगळं क्षणार्धात आठवलं होतं.

मी पुणं सोडल्यानंतर पहिल्यांदाच तो भेटत होता, तोही परदेशात. त्याला मी कुठूनही ओळखेन. अजूनही तेच केस, तोच भांग, आणि तीच (...ते पुढे येईल. ) आनंदची आणि माझी नजरानजर झाली तेव्हा आम्ही मँचेस्टरच्या ट्रॅफोर्ड सेंटर या मॉलमध्ये शिरत होतो. मी 'आनंद!' म्हणून आनंदाश्चर्यानं ओरडलो. त्यानं ओळखल्यासारखं करून फक्त 'भेटू' अशी खूण केली.

आनंद असा अचानक उगवल्याचा मला झालेला आनंद त्याच्या पहिल्याच वाक्यानं मावळला. 

"किती वर्षांनी."

तो फार तुटक बोलतो. तो जरी बरोबर बोलत असला तरी (तो नेहमी बरोबरच बोलतो) मला उगाचच त्याचं बोलणं विचित्र वाटत आलं आहे. वास्तविक मीही 'किती वर्षांनी!?' हेच म्हणार होतो, पण त्यात उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह इत्यादी भाव आले असते. आनंदची सगळी वाक्यं (म्हणजे मोजके शब्द) पूर्णविरामात संपतात, जणू स्थितप्रज्ञानं म्हटल्यासारखी.... आणि तरीही तो दुसऱ्याच्या आधी आपलं बोलून टाकू शकतो.

हा मनुष्य कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून माझ्या वसतिगृहाच्या खोलीत, वर्गात आणि राशीत वास्तव्य करून बसला होता. अगदी आमचं अभियांत्रिकीचं शिक्षण होईपर्यंत. हॉस्टेलचे काही नियम आणि शिस्ती असतात. उदाहरणार्थ, पार्टनरला कधीही 'कुठे गेला होतास' असं न विचारणं, खोलीतला पसारा न आवरणं, (मुंबईत राहत असल्यामुळे) अंगावर अतिशय मोजके कपडे घालणं इत्यादी. पण आनंद कधीच यांत सामील झाला नाही. रात्री दहा वाजले की 'उशीर झाला' असं म्हणायचा. मला उगाचच अपराध्यासारखं वाटायचं. मग मी शेजारच्या खोल्यांमधल्या मित्रांबरोबर इराण्याकडे चहा प्यायला पळायचो आणि बाहेर गॅलरीत अभ्यासाच्या नावाखाली बारा वाजेपर्यंत तरी मस्त्या करायचो. भल्या पहाटे पाचला त्याचा गजर वाजायचा आणि 'सकाळी चांगला अभ्यास होतो' हे मला दिवसातून एकदा तरी ऐकायला लागायचं.

"पुढच्या वर्षीची रूम मिळाली आहे. तू उजवीकडची कॉट घे," या वाक्यानं तो प्रत्येक वर्षी माझी विकेट काढून मला फक्त क्षेत्ररक्षक म्हणून घेतल्यासारखा पार्टनर म्हणून नवीन रूममध्ये वर्षभर ठेवायचा. 

एकदाच मी 'का?' असं विचारलं होतं. त्या 'का?' मध्ये अनेक प्रश्न होते. उदाहरणार्थ, पण 'आपणच का पार्टनर्स?', किंवा 'हीच रूम का घेतलीस?', किंवा 'उजवीकडचीच बेड का?'. त्यानं फक्त तिसऱ्याच प्रश्नाचं उत्तर दिलं होतं.

"तू डाव्या कुशीवर कमी घोरतोस."

असंच मी त्याला कोकणात आमच्या घरी सुट्टीत नेलं होतं. तो शुद्ध शाकाहारी असल्यामुळे मासे वगैरे खायचा प्रश्नच नव्हता. पण त्याला आंबे खाताना बघतानाही आंब्यांचं भाग्य चांगलं असावं असं काहीसं मला त्याच्याकडे बघून  वाटलं होतं. 

पुण्याला एकदा त्याच्या घरी जायचा सुदिनही माझ्यावर आला होता, तो नोकरीला लागल्यावर. वर्गमैत्रिणीचं लग्न हा एक नशिबाचा भोग 'सुयोग मंगल कार्यालया'त आम्ही साहिला होता. (पुण्यात प्रसंग या शब्दाला सुयोग हा पर्याय वापरतात हे तेव्हा कळलं होतं.) पण आनंदला त्याचं काही सोयर-सुतक नसावं, तो पंगतीतल्या जेवणातली अळूची भाजी, मठ्ठा आणि जिलबी खाताना समाधी लावल्यासारखा दिसत होता. शाळेत असताना साने गुरुजींचं 'यती की पती? ' हे पुस्तक मी वाचलं होतं. इथे एकीकडे आपली पती होण्याची संधी एक हिरावून नेतेय आणि दुसरीकडे आपल्यात यती होण्याचंही कसं धारिष्ट्य नाहीये हे दुसरा दाखवून देतोय अशा दुहेरी न्यूनगंडांत मी 'मसालेभात पाहिजे का?' हा वाढप्याचा क्षणभंगुर पण त्यातल्या त्यात उपयुक्त प्रश्न हेरू न शकल्यामुळे (म्हणजे तो वाढायचं नाही या निर्धारानं धावत जाताना त्याला वेळीच अडवता न आल्यामुळे) अर्धपोटी उठलो होतो.

'संध्याकाळी ये' असं सांगून शेजारचा आनंद यानंतर अचानक गायब झाला होता. मी उगाचच भिकारदास मारुतीपासून दगडूशेठ गणपतीपर्यंत-जमिनीवरच्या (रस्त्यात पडलेले-सापडलेले अनेक धरून), पाण्यातल्या (सारसबाग... ते पाणी रसदार असतं का - पंजाब हे पंच आब तसं सहा रस ते सारस -, असा माझ्या मनात वायफळ प्रश्न आला होता. एक गुजराथी मित्र या बागेला 'सरस छे' असं म्हणाला होता) आणि आकाशातल्या (पर्वतीलाही जाऊन आलो) देवांना कौल लावत घेत वेळ घालवून त्याच्याकडे सात-साडेसातला पोहोचलो होतो.

पुण्यातली भाषा त्याच्यासोबत राहूनही मला फारशी आकलन झाली नाहीये हे मला या वेळेला अगदी नेमकं कळलं. "जेवायचं आहे ना?" या त्याच्या आईचा प्रश्नाला "जेवण व्ह्यायचं आहे ना? " असं न समजता मी "पुरेसं झालंय ना खाणं येण्यापूर्वीच?' असं चुकीचं समजलो होतो. 

"म्हणजे दुपारी लग्नाचं जेवण... "  असं अर्धवट उत्तर देऊन आपल्या, अगदी पायावर नसला तरी, पोटावर धोंडा मारून घेतला होता.

माणसानं पुण्यात कधी संकोच करायचा नसतो ही शिकवण म्या पापभीरू पामराला तेव्हा मिळाली होती.

"किती पदार्थं असतात ना हल्ली पंगतीत" हेही वर ऐकायला मिळालं होतं.

"चहा घेऊया. " या आनंदच्या वाक्यानं मला पुनः ट्रॅफोर्ड सेंटरच्या जमिनीवर (का आकाशात) आणलं, आम्ही गच्चीवरच्या कार पार्कमध्ये होतो आणि आता दारात भेटत होतो. मँचेस्टरमध्ये असं पुणेरी अस्तराचं मराठी वाक्य इतक्या वर्षांनी ऐकून मला धन्य धन्य वाटलं. पुण्याचं पाणी आणि मराठी दोन्ही निराळं. इतर महाराष्ट्रात सकाळ होते, पण पुण्यात 'सकाळ' येतो. 'सकाळ झाली का' असं विचारण्याऐवजी पुण्यात 'सकाळ आला का' हा प्रश्न आपल्याला उठल्या उठल्याच पडतो. आणि असे आपण सतत पडतच असतो पुण्यात.

"इकडे कुठे?" या विचारांत चालत असताना मी आनंदला विचारलं.

"थोडी खरेदी. " तीच जुनी जीवघेणी सवय. ह्याचं नाव स्वानंद का नाही ठेवलं त्याच्या जन्मदात्यांनी?

"इंग्लंडमध्ये कसा आलास? " मी माझ्या चुकीची दुरुस्ती केली.

"तीन महिने डेप्युटेशन. " निदान आता तरी सरळ उत्तर मिळालं म्हणून मी खूष. मला विचारल्यावर वाटलं होतं तो 'विमानानं' म्हणून सांगेल असं.

"मी इथेच आहे गेली दहा वर्षं". तो विचारेल की नाही याची खात्री नव्हती म्हणून मी सांगून टाकलं. 

"मला कंटाळा आला तीन आठवड्यांत. " त्यानं पुनः मला चकवलं.

"मला नाही आला." मी आता याला घाबरत नाही असं मी स्वतःला बजावलं.

"वन टी प्लीज, विथ हॉट मिल्क, " त्यानं ऑर्डर दिली. पुनः एकदा शहाण्यानं एका दगडात तीन पक्षी मारले. (किंवा एका चेंडूत तीन दांड्या गुल केल्या. ) माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष, इंग्रजांना आपल्या अस्स्ल चहाची शिकवण आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे अजूनही हॉस्टेलमधल्यासारखी फक्त स्वतःच्या चहाची ऑर्डर! 

मी माझी कॉफी घेतली आणि आम्ही एका कोपऱ्यात स्थानापन्न झालो. प्रत्येकानं आपापल्या पेयाचा एक घोट गिळंकृत केला आणि -

"लेले आजोबा कसे आहेत? " हे मी आणि तो "लेले आजोबा गेले रे..." हे वाक्य दोन्ही आम्ही एकदमच बोललो...

"काय सांगतोस? " मी धक्का बसून म्हटलं. त्याच्या बोलण्यातला "रे" हा सूर ऐकून त्यालाही काही भावना आहेत याची मला पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी जाणीव झाली.

"गूढच आहे सगळं. " तो पुनः कोड्यात म्हणाला.

"आनंद, हे तरी आता नीट सांगशील का? " मी कळकळीनं म्हणालो.

"वेळ लागेल. तुझं इथलं काम झालं की जेवायला भेटू." 

संध्याकाळचे सुमारे सहा वाजले होते. तिथल्या 'Apple' च्या दुकानात माझा आय-फोन दुरुस्त करायला देऊन मी त्यांनी बोलवायची वाट बघत बसलो. 'इथेच येतो' सांगून आनंद निघून गेला.

आनंद लेले आजोबांच्याच इमारतीत राहत असे. आनंद पहिल्या मजल्यावर तर आजोबा तिसऱ्या. पहिल्या वेळी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा मला हे माहिती नव्हतं; पण माझी जेव्हा पुण्याला बदली झाली तेव्हा त्याच्या इमारतीतही एक घर बघितलं होतं. खरं तर त्यानंच ते सुचवलं होतं.

"वरच्या लेले आजोबांना फ्लॅट भाड्यानं द्यायचा आहे. "

कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीतल्या त्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर दोनच फ्लॅटस होते. एक आजोबांचा आणि दुसरा त्यांचाच, पण भाड्यानं देण्याचा. मी दारावरची पाटी वाचून बेल वाजवली होती. "श्री. र. स. लेले आणि सौ. स. र. लेले" अशी सुवर्णाक्षरात (तुळशीबागेत अशी पितळी अक्षरं करून मिळतात हे नंतर कळलं) लिहिलेली अक्षरं न्याहाळात आणि काय नावं असावीत असा विचार करत असतानाच आजोबांनी आतून मारलेली हाक ऐकू आली होती. "येतोय, तोपर्यंत दारावरची पाटी वाचा आणि हसा. "

गोलगरगरीत चेहेरा (आणि पोट), घारे डोळे, गोरापान रंग, स्वच्छ टक्कल, भरपूर मिशी, कानाच्या आजूबाजूचे पांढरे केस, काळ्या जाड काड्यांचा चष्मा आणि या सगळ्याला साजेसे असे पांढरे कपडे. आनंदसुद्धा असाच पांढरी बंडी आणि लेंगा घालायचा पण आजोबांना ते अगदी शोभून दिसत होते.

"रमेश सचिन लेले... तुम्हांला सचिन रमेश तेंडुलकर ऐकायची सवय असणार. आमचं उलटं आहे." त्यांनी माझं स्वागत केलं होतं, घर दाखवायला बाहेर पडता पडता.

"वडिलांचं खरं नाव सचिंद्र असं होतं. पण मी लाडानं सचिन म्हणतो." त्यांनी पुढे टिप्पणी केली होती.

"आणि आजींचं - म्हणजे हीचं - नाव सरिता आहे, ". मनकवडेपणा आजोबांमध्ये पुरेपूर भरला होता. 

"माझा मुलगा उदय. अर्थात -"

"'उ. र. लेले, " मी म्हटलं. आता त्यांनी मला बोलायला संधी दिली होती.

"चूक. 'उरलेले लेले'. एकच मुलगा आहे मला! ... अर्थात, त्याला आता एकच बायको आणि त्यांना एकच मुलगाही आहे."

एवढ्या बडबडीत घर बघून झाल्यावर मी "लवकरच कळवतो" असं सांगितलं होतं. त्यावर तेवढ्यात बाहेर आलेल्या आजी "ह्यांचा दंगा सहन होणार असेल तरच ये हो" असं म्हणाल्या होत्या.

मी थोड्याच दिवसांत तिथे मुक्काम हलवला. लेले आजोबा, आजी, आनंद आणि मी ब्रिज खेळायला रात्री त्यांच्या घरी जमायला लागलो. ह्या एकाच जागी आनंद रात्रीचे दहा वाजले तर 'उशीर झाला' असं म्हणत नसे. (पुणेकर पुणेकरांशी पुण्यात फार वेगळे वागतात.) 'चला जेवणं झाली, आता उद्या उठायचं लायसन्स काढू' असं म्हणून आजोबा एकीकडे त्यांच्या काचेच्या दोन मोठ्या बरण्यांतल्या गोळ्या काढायचे, एकीतल्या स्वतः घ्यायचे आणि दुसरीतल्या आजींना द्यायचे. तोपर्यंत आम्ही पत्ते वाटायचो.

आजोबांचा मुलगा उदय आणि त्याची बायको उमा आणि चि. उन्मेश यायचे तेव्हा आम्ही बदाम सत्ती खेळायचो. ते मुंबईत असायचे. आनंदचं आणि या सर्वांचं काहीतरी नातं होतं. पण मीदेखील त्यांच्या घरचाच झालो होतो. 

आनंद डमी असला की मी हरायचं, मी डमी असलो की आनंदनी मात्र जिंकायचं ही आमची रोजची रीत झाली होती; आजोबा तर कायम जास्तच हात बोलून, "मला वाटलं झाले असते" असं हरल्यावर आजींना म्हणायचे. 

"सिली मिस्टेक्स करतोस. " आनंद मला म्हणायचा. बाकी डावाबद्दलच्या चर्चेत त्याचा सहभाग नसे.

"पुणेकर आहेस." हे आजोबा मग आनंदला बोलून दाखवायचे.

"आम्ही 'कसले' पुणेकर आणि हे 'कसलेले' पुणेकर, " हे वर माझ्याकडे वळून म्हणायचे. "माझ्या 'लेले'तला एक 'ले' त्याला दिलाय. त्यामुळे मी एकदम लेचापेचा पुणेकर झालो आहे. 'ले'चा पेच... आलं ना लक्षात?"

"आजोबा, तुम्ही एवढे मजेत कसे असता नेहेमी? " मी विचारायचो.

"सांगेन कधीतरी. " ते स्वतःशीच हसायचे. त्यांनी सांगितलं कधीच नाही.

"बसूया." ... आनंदच्या या शब्दांनी मी पुनः भानावर आलो. माझा फोनही दुरुस्त झाला होता. आम्ही निघालो आणि एका त्यातल्या त्यात शांत खाद्यगृहात जेवायला बसलो.

"बोल."

आनंद प्रथमच जरा सविस्तर बोलला.

"आजोबांना मधुमेह होता, तरी रोज गोड खायचे आणि रात्री औषधाच्या गोळ्या घ्यायचे, स्वतःच्या आणि शिवाय आजींनाही द्यायचे. आठवतं?"

"हो! "

"गेल्या वर्षी त्यांचा शहात्तरावा वाढदिवस झाला. पंच्याहत्तरी उदयनं जोरात केली होती. शहात्तरावा वाढदिवस मात्र घरगुती होता. रात्री उदय, मी आणि आजी-आजोबा ब्रिज खेळायला बसलो होतो. तुझी खूप आठवण काढायचे ते. "

"अरे, मलाही... "

"तू विचारायचास त्यांना, 'एवढे कसे मजेत असता तुम्ही नेहेमी? ' असं."

"त्यांनी कधीच उत्तर नाही दिलं. "

"त्या दिवशी दिलं. म्हणाले ही की तुलाही ते कधीतरी सांगणार होते; पण कधी योग येईल काय माहिती." 

"काय म्हणाले? "

"त्यांनी त्यांची बरणी दाखवली. खरं-खोटं माहिती नाही; पण म्हणाले की त्यांत एक गोळी अशी आहे की ती घेतल्यावर ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठणार नाहीत. आणि गंमत म्हणजे त्या असंख्य गोळ्यांमधली कोणती गोळी ती आहे हे त्यांना माहिती नाहीये. त्यामुळे ते प्रत्येक दिवस शेवटचा असल्यासारखा संपूर्ण आनंदात जगतात."

मला बसल्या जागीच अंगावर शहारा आला.

"तुला खरं वाटलं हे? तू त्यांना परावृत्त करायचा प्रयत्न नाही केलास? "

"उदय औषधं टाकून द्यायला निघाला होता. पण आजी म्हणाल्या लगेच आजोबांना,'उगाचच काहीतरी सांगू नका मुलांना' म्हणून. आजोबाही 'कशी गंमत केली' असं म्हणाले, आणि वर 'अरे, हा माझा स्वभाव आहे, दुसरं काय? मी माझ्या पद्धतीनं जगणार. अशी कारणं थोडीच सांगता येतात मजेत जगण्याची?' असं म्हणून त्यांनी तो विषय संपवला. "

"यानंतर काही दिवस मी त्यांच्यावर पाळत ठेवून होतो. उदयशीही बोलायचो रोज. त्यानं त्या बरण्या उलट्या पालट्या करून कुठली गोळी वेगळी दिसतेय का वगैरेही बघितलं होतं. मी दर सकाळी काही तरी कारणासाठी वर जाऊन यायचो. दोन-तीन महिने असेच गेले. मग माझं असं जाणं थोडं कमी झालं. त्यांनाही संशय यायचा.....आणि अचानक एका सकाळी उठलेच नाहीत."

माझा अजूनही ऐकतानाच थरकाप होत होता.

"डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं. आजींनी स्पष्ट ताकीद दिली होती - 'उगाच पोस्ट मॉर्टम' वगैरे विचारू नका म्हणून."

दोघेही काही वेळ एकमेकांकडे हतबलपणे बघत होतो. जेवण बाजूला तसंच होतं.

"आणि आजी? " मी विचारलं.

"त्या आणि त्यांची औषधांची बरणी दोन्ही शाबूत आहेत. रोज त्यातली एक गोळी घेतात."

मी काही बोलणार या आधीच तो म्हणाला - 

"त्यांनी बजावलंय अनेकदा. 'औषधं माझी आहेत. तुम्ही रोज थोडेच येणार आहात बदलायला ? ' असं."

"भयंकर आहे. " मी म्हटलं.

"गूढच आहे. " तो पुनः म्हणाला.

"मग? " मी विचारलं.

"मग काय."

त्या तीन महिन्यांच्या आनंदच्या मुक्कामात आम्ही अनेकदा भेटलो. एक-दोनवेळा उदयशीही स्काइपवर बोललो. आनंद निघायच्या दिवशी सकाळी उदयचा 'What's App'वर निरोप आला.

"काल रात्री झोपेत आईला देवाज्ञा झाली. आत्ताच पुण्याला पोहोचलो."

- कुमार जावडेकर