कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १३ सप्टेंबर, २०२६

अभंग गणेशा

सर्वत्र संतोष । बहुत जल्लोष।
चालला उद्घोष । स्वागताचा ।।

धरती सजली । सृष्टी बहरली ।
पावसात न्हाली । श्रावणाच्या ।।

येता घरी-दारी । श्रीगणेश स्वारी ।
बाल-थोर सारी । आनंदली ।।

गोमटा सुंदर । लोभस आकार ।
मूर्ति मनोहर । लंबोदर ।।

शांति-समाधान । मागू हेचि दान ।
आणिक साधन । नको काही ।।

- कुमार जावडेकर

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

समाज

रूढींत गुंतला हा सगळा समाज आहे
काही न बदलणे हा इथला रिवाज आहे!

रस्त्यांत बांधलेली असतात देवळे, वा
रस्त्यामधेच कोणी पढतो नमाज आहे

सोसून उत्सवांचे आवाज कर्णभेदी
बहुतेक देव झाला बहिराच आज आहे

मी विनवले कितीदा त्यांना परोपरीने
त्यांना परंपरांचा भलताच माज आहे!

शोधू नकोस तूही आता उपाय येथे
धर्मांधळेपणावर कोठे इलाज आहे?

(विसरू कसे तुला, अन् ठुमरी प्रिये तुझी ती...
अजुनी मनात तू, अन् ओठी खमाज आहे!)

- कुमार जावडेकर

सोमवार, २३ जून, २०२५

रिकामा (अभंग)

रिकामेच होते
ज्ञानाचे पाकीट
फुकट तिकीट
दिले कोणी

आधीच मनी या
होता पूर्वग्रह
त्यात हा आग्रह
मैफिलीचा

आले मग येथे
बनून सर्वज्ञ
जरी पोटी यज्ञ
जाळणारा

रागाचा कळेना
जरासाही सूर
तरी मोठा नूर 
दाखवती

यापूर्वी केवळ
ऐकले भजन
नमो आवर्तन
परिचित

रेड्यासम होते
मुखोद्गत वेद
अंतरात भेद
भरलेला

जेव्हा न कळले
चांगले वाईट
झाली भाषा धीट
उगीचच

विचारले जेव्हा
ऐकले ते काय
विस्मरण हाय 
जाहले की

ठेवून बाजूला
आपले वैगुण्य
शिव्याशाप पुण्य
घेत गेले

सुमार पाखंडी
असे जन फक्त
स्वघोषित भक्त
दूर ठेवा

- सुमार (कुमार जावडेकर)

रविवार, ३० मार्च, २०२५

वर्ष नव्हे ऋतूचक्र

जात्या वर्षाला म्हटलं, थांबून गप्पा करूया
ओलांडलेला एकेक आपला टप्पा स्मरूया 

म्हटलं घराचे हप्ते वर्षात फिटले थोडे
मुलांचेही शिक्षणात पुढे दामटले घोडे

वाढीसकट राहिला पगार-बिगार चालू 
घेतला नाही तरीही - शक्य होतं घेणं शालू

काही मनाजोग्या गोष्टी, वाईटही झाल्या काही
कधी बातम्यांनी केली संतापानं लाही लाही

तू मात्र देत गेलास- पाऊस थंडी उन्हाळा
प्रत्येक वर्षी त्याच त्या आठवणींना उजाळा

वर्ष काय बोलणार, मीच सांगत बसलो
हव्या-नको त्या स्मृतींच्या मृगजळात फसलो

उमजलं मग तुम्ही, वय - वर्ष दोघे भाऊ!
नंबरांच्या स्पर्धेतले मातबर ऐतखाऊ 

घडायचं ते घडतं, करायचं ते उरतं
वय वर्ष मात्र सदा पुढे पुढे सरकतं

कळतं तुम्ही निमित्त, करायला मौज मस्ती, 
हरकत नाही माझी स्मरायला जुनी दोस्ती

तू कोण हे न कळता पक्षी-प्राणी जगतात
योग्य वेळी आपापली स्थलांतरं करतात

माणसा-माणसांचा का वर्षारंभ बदलतो?
'शक' मनी दृढ होतो, आणि काळ बिघडतो...

म्हणून म्हणतो आता तुझं नाव बदलूया
वर्ष नव्हे ऋतूचक्र इतकं तुला मानूया!

- कुमार जावडेकर

मंगळवार, २८ जानेवारी, २०२५

मागू

मोहमाया कशास मी त्यागू?
अन् नवा श्वास मी कुणा मागू?

वागणे जाणुनी तुझे सारे -
मी तुझ्याशी तसे कसे वागू?

आगळी वेगळी प्रथा इथली 
सांग होईल का तुला लागू?

तूच नाहीस जर इथे चंद्रा... 
रात्र मी का अशी वृथा जागू?

शून्य बाकी उरे जिथे त्याला
सांग ना मी पुन: कसे भागू? 

- कुमार जावडेकर

जा

जा मना, लगेच तू निघून जा 
दूर या इथून वा तिथून जा

तू न मैफिलीत या नवा सख्या 
जा खुशाल तू असा उठून जा!

मान्य! केवढा रुबाब हा तुझा
सर्व सर्व आज तू त्यजून जा 

थांबण्यास पाडले भरीस तर-
'हो' म्हणून तू जरा दुरून जा 

साथ तू कशास आज शोधिसी?
आपला प्रवास तू करून जा

- कुमार जावडेकर

रुबाया

जाता गळून पाने 
विरल्या जुनाट छाया
वाऱ्यात मुक्ततेच्या
गेली उडून माया 

येता बहार येथे
हृदयी वसंत फुलला
रंगांत प्रेरणेच्या
झाली प्रसन्न काया

गंधात मोहराच्या
वाहून गुपित फुटले -
सृष्टीस ओढ कुठली
दृष्टीत कोण राया

आकाश केशरी अन् 
हिरवी धरा इथे ही
तू वेळ मीलनाची 
दवडू नकोस वाया 

विसरून सर्व काही
येशील का पुनः तू
घेऊन साथ अपुल्या
आता नव्या रुबाया

- कुमार जावडेकर

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

पुळणीत टेकलेले

पुळणीत टेकलेले माथे अधीर नाही
दर्यासही जरासा इथल्या समीर नाही

स्वप्ने नकाच देऊ आता नवी कुणाला
ध्येयास पेलणारे कुठले शरीर नाही

सर्वत्र होत आहे शृंगार क्षुद्रतेचा 
का दुर्बळांत येथे कोणीच वीर नाही?

उल्का बुडून गेल्या विश्वांस सांधणाऱ्या
डोहास कालियाच्या का पैलतीर नाही?

प्रासाद-झोपड्यांच्या आहेत दूर रांगा
पुतळ्यास एकतेच्या त्यांची फिकीर नाही

होईल पुत्र कैसा राजास जाणता या
पूजेस देव नाही कौलास पीर नाही... 

- कुमार जावडेकर 

(संदर्भ / प्रेरणा - कुसुमाग्रजांच्या ' टिळकांच्या पुतळ्याजवळ' तसंच 'स्मरण' आणि 'पृथ्वीचं प्रेमगीत' या कवितांमधील प्रतिमा)

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

बाँड आणि बांध

विडंबन (बाँड):

बाँड हा वटण्यास थोडा समय आहे
आणि त्याला देणगीचे वलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
बातम्या मज वाचण्याची सवय आहे

सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे

'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?'

शासनाची का तमा मी बाळगावी?
आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे

रेखतो भक्तांत मी प्रतिमा स्वत:ची
भोवती माझ्या मतांचा प्रलय आहे

- 'सुमार' जावडेकर

बांध (मूळ गझल) -

बांध हा फुटण्यास थोडा समय आहे
आणि मागे जीवनाचा प्रलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
चेहरे मज वाचण्याची सवय आहे

सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे

'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे'

वादळाची का तमा मी बाळगावी?
आज झाले पत्थराचे हृदय आहे

मांडतो शब्दांत मी दु:खे जगाची
भोवती माझ्या सुरांचे वलय आहे

- कुमार जावडेकर

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

सांज असते

अता आर्त हळवी हवा सांज असते
स्मृती पाखरांचा थवा सांज असते

जुना तोच शृंगार लेवून उसना
समारंभ फिरुनी नवा सांज असते

जरी रात्र असते तुझी दाट छाया
छटांचा तुझ्या कारवा सांज असते

दिशाहीन क्षितिजे पुनः फेर धरता 
पुनः जीवनी नाखवा सांज असते

तुझा गाव गेला जरी दूर मागे
मनी सुखदसा गारवा सांज असते

न तू आज येथे न मी आज तेथे
अता रोज ही मारवा सांज असते

- कुमार जावडेकर 

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

सूर आकारले तुझ्यामुळे...

पं. यशवंत देव यांचं अलीकडेच निधन झालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शिकलो होतो, ते मी शब्दांत बांधलं होतं. या शब्दप्रधान देवाला त्याच्याबद्दलच्याच शब्दांत श्रद्धांजली...

http://www.manogat.com/node/8323

(I had written this article in 2006, on his birthday, 2nd November)….

'दिवस तुझे हे फुलायचे', 'पाऊस कधीचा पडतो', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'क्षितिजावर खेळ विजेचा' अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, 'प्रिया आज माझी', 'स्वर आले दुरुनी', इ. गीतांचे कवी, 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा कानमंत्र', 'कृतज्ञतेच्या सरी', 'पत्नीची मुजोरी' अशा अनेक पुस्तकांचे लेखक श्री. यशवंत देव यांचा आज ८० वा वाढदिवस...

त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

देव-सरांच्या मार्गदर्शनाखाली 'शारदा संगीत विद्यालय' (वांद्रे) इथे शब्दप्रधान गायकीमधे पदविकेचा अभ्यासक्रम चालवला जातो. त्यांच्याकडून तिथे ज्या गोष्टी शिकलो, त्याच मी शब्दांत बांधायचा प्रयत्न केलाय.... (यात कुठेही उपमा वगैरे नाहीत. शांता शेळके यांनी 'गुरु ईश्वर, तात, माय' म्हटलंय... यापुढे अजून काय उपमा देणार?). एकदा देव सर म्हणाले होते, मी चाल कवितेतूनच शोधतो, निराळी चाल बांधत नाही. त्यांनी शिकवल्याप्रमाणे, त्यांच्या शिकवण्यातूनच मला हे गीत सुचलंय... 

सूर आकारले तुझ्यामुळे...

गीत साकारले तुझ्यामुळे... 

[गाणं गाण्यासाठी आधी तोंड उघडा, जबडा खाली करा, तोंडाचा 'पॅराबोला' सारखा आकार झाला पाहिजे इ. गोष्टी ते नेहमी सांगतात आणि त्याची प्रात्यक्षिकं करून दाखवतात. त्यामुळे 'सूर 'आ'कारले...]

काल जे अंतरात राहिले,

आज ते सर्व मुक्त जाहले!

श्वास हुंकारले तुझ्यामुळे...

[गाणं येण्यासाठी श्वासानुसंधान महत्त्वाचं. 'श्वसनैवाधिकारस्ते मा स्वरेषु कदाचन' असं त्यांनी लिहिलं आहे. सूर हा श्वासांतून निर्माण व्हावा. म्हणून  श्वास हुंकारले ...]

हास्य ओठांत या फुलायचे

भाव गाण्यातले खुलायचे!

शब्द झंकारले तुझ्यामुळे...

[गाण्याआधी हसायला शिका... हे त्यांचं नेहमीचं वाक्य. हसलं की गाणं खुलतं हा आम्हांला सगळ्यांनाच अनुभव यायचा. त्यातूनच शब्द झंकारले ...]

गोड गाती अनेक कोकिळा

सूर माझा तयांत वेगळा!

स्वत्व स्वीकारले तुझ्यामुळे...

['अनुकरण' आणि 'अनुसरण' यांत फरक आहे. लता मंगेशकरांचा गळा तो त्यांचा आवाज, तुम्ही तुमच्या आवाजातच गा, असं ते नेहमी सांगतात. यामुळेच स्वत्व स्वीकारले ...]

- कुमार जावडेकर

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

प्रतिभा

मी तुझ्या रोज भोवती असते
एक अदृश्य सोबती असते

मी कधी रिक्त शाश्वती असते...
वा कधी दिव्य आरती असते!

आसवांचे जुनेच लोलक, पण-
मी नवी रंगसंगती असते

सांजवेळी तुझा विसावा मी
आणि दिवसा तुझी गती असते

तू करू पाहतोस जे त्याची
फक्त मी मूक संमती असते

- कुमार जावडेकर

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

नवल

सांग का सारे अचानक नवल भासू लागले?
सत्यही स्वप्नाप्रमाणे तरल भासू लागले...

कळत-नकळत होत गेल्या नजरभेटी जसजशा...
शांत मन इतके कसे चल-बिचल भासू लागले

मुग्ध डोळ्यांनी सुचवली उत्तरे जेव्हा मला
अंतरीचे प्रश्न सारे गझल भासू लागले

वेड जडले, अंतरे बेचैन झाली, हे खरे
मात्र हेतू सर्व अपुले सफल भासू लागले

नेहमीची वाट ही अन् खाच-खळगेही जुने
साथ क्रमता आज सारे प्रतल भासू लागले

लाभले ते देत गेलो मी जगाला, शेवटी-
एकले आयुष्य माझे सकल भासू लागले

- कुमार जावडेकर

बुधवार, ३ जून, २०२०

शोधू जरा

खिन्न रात्रींचे मुके आक्रंदणे शोधू जरा
चांदण्याने भिजवलेली अंगणे शोधू जरा

खिळखिळ्या खिडक्यांतुनी का रोज ही दिसती भुते?
हरवलेले आपले बुजगावणे शोधू जरा

वाट चुकलो की नवा पथ पावलांना गवसला
भेटलो इतके खरे, पण- कारणे शोधू जरा

चांदण्यांची रोजची वर्दळ नभी आहे तरी
आज चंद्राच्या मनीची धोरणे शोधू जरा

निरनिराळे अर्थ शब्दांना जरी असले तरी
फक्त त्यांचे रूप मोहक देखणे शोधू जरा

एक घडते भेट, पडते एक उत्कट ती मिठी
चल पुन: लाटेप्रमाणे विखुरणे शोधू जरा

- कुमार जावडेकर

बुधवार, १३ मे, २०२०

आत्मनिर्भर

मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले
आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले

शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले...
अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले

सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी...
दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले

बांधण्यासाठी नवे सेतू फुकाचे
माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले

चालणे नशिबात होते का म्हणू मी...
राहण्यासाठी कुठे घर होत गेले?

प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे
मौनही माझे निरुत्तर होत गेले

- कुमार जावडेकर

शुक्रवार, ८ मे, २०२०

वणवे

अता क्रुद्ध वणवे शमू लागले
थवे पाखरांचे जमू लागले

कधीच्याच सरल्या तुझ्या मैफ़िली
तरी स्वर तुझे आक्रमू लागले

अथक चालुनी पाय लक्ष्याकडे
असे शेवटी का दमू लागले?

जरी जाणतो मी न असणे तुझे
हृदय या ठिकाणी रमू लागले

तुझा भास माझ्यात होऊन का-
मला लोक इतके नमू लागले

न मी ईश्वरी वा न तू मानवी
जुने भेद नवखे गमू लागले

- कुमार जावडेकर

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

तरही गझल (हुंदका)

चेहरा हास्यात जे लपवून गेला
हुंदका साधा तुझा सांगून गेला

हुंदका साधा तुझा सांगून गेला
वचन मौनाचे मला मागून गेला

खूप वेळा ऐकलेली ती कहाणी
सांगताना तो पुन्हा रंगून गेला

(खूप वेळा ऐकलेली ती कहाणी
ऐकताना तो पुन्हा रंगून गेला)

मीलनाची शक्यता नव्हती तरीही
चंद्र सारी रात्र का जागून गेला?

दूरवर होते सुखाचे चांदणे, पण-
एक त्याचा कवडसा बिलगून गेला

जीवनाची शाश्वती मागू कुणाला?
मेघसुद्धा कोरडे वागून गेला

- कुमार जावडेकर

(सारंग पत्की यांनी दिलेल्या 'हुंदका साधा तुझा सांगून गेला' या मिसऱ्यावर, 'मराठी गझल' या संकेतस्थळाने आयोजित केलेल्या स्पर्धेत पारितोषिक पात्र)

स्पंदन

मुक्तकः

ओठी केवळ भाषा नसते
ते हृदयाचे स्पंदन असते
दुसऱ्यांसाठी जगणाऱ्यांचे
जगणे म्हणजे जीवन असते!

गझलः

जगणे म्हणजे जीवन असते
ते हृदयाचे स्पंदन असते

नाती-गोती येती नंतर
प्रेम पुरेसे बंधन असते

विरह तुझा घडल्यावर कळले
सुखद कसे हे मीलन असते...

राग तुझ्या डोळ्यांतिल लटका
दो-घटकेचे रंजन असते!

फसते, रुसते, खुदकन हसते
चंचल मूल जणू मन असते

- कुमार जावडेकर

सारखा

श्वास मीही घेत होतो सारखा...
दूर मृत्यू नेत होतो सारखा...

वृत्त कळता तेच आले धावुनी
दोष ज्यांना देत होतो सारखा

तू न येथे माहिती आहे तरी
का तुझा संकेत होतो सारखा?

भेट घेण्या पोचुनी दारी तुझ्या
रद्द माझा बेत होतो सारखा...

माहिती माझा कुणाला चेहरा?
थांबलो छायेत होतो सारखा...

एक तोही पूल आता मोडला
ज्यावरी मी येत होतो सारखा

- कुमार जावडेकर

भेट

भेट जेव्हा तुझी घडेल पुन्हा
जीवनी अर्थ सापडेल पुन्हा

(चांदण्याची नशा जडेल पुन्हा
लाजरा चंद्र सापडेल पुन्हा!)

पाहुनी चेहरा तुझा रात्री
चंद्र झाडांमधे दडेल पुन्हा

जीवना हा तुझा दुरावा पण -
आज त्याचा लळा जडेल पुन्हा

दूर जाशील तू पुन्हा आता
घास माझा इथे अडेल पुन्हा

जोवरी ओढ अंतरी आहे
भिंत दोघांतली पडेल पुन्हा...

- कुमार जावडेकर