सोमवार, २७ एप्रिल, २०२०

रेखीव

भोवताली कडे ताशीव होते...
दु:ख माझे कसे रेखीव होते!

कंठतो दिवस मी व्यापांत अपुल्या
सांज होता तुझी जाणीव होते...*

भेट घडता तुझी कळले मलाही
तर्क माझे कसे ऐकीव होते!

कारणे सर्व वर-वरची तुझी ती
मात्र नाकारणे ठाशीव होते!

देव, माणूस - दोन्ही पाहिले मी
फक्त पुतळेच ते निर्जीव होते

रागरूपी जिथे रस्ते निराळे...
ते सुरांचे शहर आखीव होते!

- कुमार जावडेकर

* क्र. २ चा शेर ग़ुलाम अली- आशा भोसले यांनी गायलेल्या 'फिर सावन रुत की पवन चली' (मिराज़ ए ग़ज़ल) मधल्या शायर नासिर काजमी यांच्या सुंदर शेरावर आधारित -

'दिनभर तो मैं दुनिया के धंदों में खोया रहा
जब दीवारोंसे धूप ढली तुम याद आए'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा