शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

कोणी

लुप्त होते साधुनी संवाद कोणी
ठेवते आयुष्यभर ती याद कोणी

शब्द माझे तोलतो मी बोलताना
आपल्यांशी घालते का वाद कोणी?

बोलणाऱ्या माणसांचे पेव फुटले
ऐकणारे राहिले अपवाद कोणी

ठेवती आस्वाद कोणी अंतरी, वा
मुक्तकंठे देत जाती दाद कोणी

('राग' अपुला मांडशी 'थाटा'त अपुल्या-
'बोल' ते विसरून देते दाद कोणी!)

झाकण्यासाठी स्वतःचे कृत्य येथे
ईश्वरावर घालती फिर्याद कोणी

जीवनाचा खेळही रोमांचकारी
ऐनवेळी होत जाते बाद कोणी...

- कुमार जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा