जिंकण्याची, हारण्याची सारखी भाषा कशाला?
तारण्याची, मारण्याची सारखी भाषा कशाला?
देव किंवा देश दोन्ही कल्पना या माणसांच्या
व्यर्थ त्यांनी भारण्याची सारखी भाषा कशाला?
माणसांनी घेत जावी काळजी; पण - माणसांची
देवळे उद्धारण्याची सारखी भाषा कशाला?
सारुनी बाजूस साऱ्या वंचना-गरजा प्रजेच्या
भावना गोंजारण्याची सारखी भाषा कशाला?
धन किती अन् ऋण किती हे शोधताना आज माझी
शून्यता स्वीकारण्याची सारखी भाषा कशाला?
शून्यता स्वीकारण्याची सारखी भाषा कशाला?
स्वप्न बघतो, मान्य! पण ते छंद किंवा मौज म्हणुनी
त्यास मी साकारण्याची सारखी भाषा कशाला?
(रोज थोड्या मिळकतीने जुळवतो मी दोन टोके
कर नवे आकारण्याची सारखी भाषा कशाला?)
मानतो मी एक बिंदू-मात्र आहे या जगी पण -
सूक्ष्मता स्वीकारण्याची सारखी भाषा कशाला?
- कुमार जावडेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा