Monday 1 February 2021

इतिहास्यटिका - माउंटबॅटन

(पडदा उघडतो. भिंतीवर 'यमसदन' अशी पाटी. मागे तीन दारं, त्यांच्यावर 'स्वर्ग', 'प्रतीक्षा' आणि 'नरक' अशा तीन पाट्या. स्वर्गाच्या दाराच्या डावीकडे आणि नरकाच्या दाराच्या उजवीकडे एक-एक खिडकीही आहे. तिला पडदे आहेत. या शिवाय डावीकडे आत यायचा दरवाजा आहे उजवीकडे आत जायचाही एक दरवाजा आहे. खोलीत एक टेबल, खुर्ची, टेबलावर पेपरवेटखाली ठेवलेला एक अर्धा उघडलेला कागद आणि शेजारी एक 'ब' लिहिलेली फाईल. टेबलावर एक संगणक, एक रिमोट आणि कोपऱ्यात टी. व्ही. आहे. या व्यतिरिक्त एक सोफा, अजून एक खुर्ची आणि एक अ ते ज्ञ पर्यंत फायली ठेवलेलं जुनाट उघडं शेल्फ. 
आत यायच्या दरवाज्यातून एक गृहस्थ प्रवेश करतात. जाडजूड. नखशिखान्त काळे कपडे. येताच प्रेक्षकांकडे बघून थबकतात. "शू:! " अशी गप्प बसण्याची खूण करतात. दबक्या पावलांनी जाऊन 'स्वर्ग' आणि 'नरक' या पाट्यांची अदलाबदल करतात. इकडे-तिकडे बघतात. पुनः प्रेक्षकांकडे बघून तोंडावर बोट ठेवतात. मग 'प्रतीक्षा' लिहिलेल्या दाराला कान लावतात. मान डोलावतात, स्वतःच हसतात आणि समोर येतात.)
गृहस्थ: नमस्कार. वास्तविक आपली 'प्रोसीजर'च आहे ही. मी उगाच तुम्हांला गंमत वाटावी म्हणून खुणा करत होतो. येईलच तुमच्या लक्षात थोड्या वेळात. आधी साहेब आले की नाही ते बघू. (पुढे वाकून, कान दिल्याची कृती - ) काय म्हणता? कोण साहेब? अहो, इथे दोन साहेब आहेत. कुणाबद्दल सांगू? तुमच्या पैकी कुणाला आहेत का दोन साहेब? - आहेत ना? (आवाज बदलून) मग काय, येते ना मजा? (डोक्यात प्रकाश पडून -)  पण आधी मी कोण, हे तर सांगतो. माझं नाव -
(तेवढ्यात डावीकडून आवाज येतो - "ए रेड्या". गृहस्थ खजील होतात. डावीकडून अजून एक मनुष्य येतो.)
गृहस्थः  साहेब, तुम्हांला किती वेळा सांगितलं, जरा चारचौघांत तरी मला "अहो रेडकर" म्हणा! मी म्हणतो ना तुम्हांला (नाटकी आवाजात) "मान्नीय यमदेव!"
यमदेवः पुरे! चल, आज बरीच कामं आहेत पृथ्वीवर.
रेडकरः (प्रेक्षकांना - ) कोणती ते तुमच्या लक्षात आलं असेलच. ('गळ्यावरून हात फिरवतो - सुरी फिरवण्याची / मरण्याची नक्कल. पण उघडपणे म्हणतो-) जमणार नाही. 
यमदेवः आलं ध्यानात. अहो श्रीयुत रेडकर! आपण प्रस्थान करायचं का?
रेडकर: (हंबरल्यासारखं) हम्म....जमणार नाही.
यमदेवः का?
रेडकरः चित्रगुप्त साहेबांचा आदेश आहे. ('प्रतीक्षा' लिहिलेल्या दाराकडे बोट दाखवून -) इथल्या एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला कमी केल्याशिवाय नवीन कुणाला भरती करायचं नाही! (प्रेक्षकांकडे बघून - ) आमच्याकडे इथे इतकी माणसं आहेत की या दालनाला 'प्रतीक्षागृह' न म्हणता 'प्रतीक्षानगर' म्हणायला लागेल. काय आहे, साधी माणसं सरळ स्वर्गात किंवा नरकात जातात. त्यांचा हिशोब जुळलेला असतो. पण अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना मात्र फार तपासून पुढे पाठवायला लागतं बरं का.
यमदेवः हा चित्रगुप्त म्हणजे... 
रेडकरः अहो साहेब, थांबू की जरा. बघू की मजा.
यमदेवः पुरे रे तुझ्या गमजा... खाली कोविडमुळे किती काम वाढलंय माहिती आहे?
रेडकरः म्हणूनच सांगतो साहेब. इथे नवीन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना जागा नाही. आधी रिकामी करा थोडी.
यमदेवः ठीक आहे. कुठे आहे तो चित्रगुप्त?
रेडकरः आत गेलेत. माणूस शोधतायत. 
यमदेवः बरं. कोणाचा नंबर लागतोय आज? (म्हणत टेबलाकडे जातात... पेपरवेटखालचा कागद उचलतात. ) माउंटबॅटन. छान. फाईल बघू. ('म' ची फाईल काढतात.)
रेडकरः आता माउंटबॅटन म्हणजे? 
यमदेवः 'माउंट' म्हणजे पर्वत आणि 'बॅटन'म्हणजे सांधा.
रेडकर:  म्हणजे गंमतीचा वांधा. माणूस चांगला निघणार... दुसरा पण अर्थ असेल की बघा एखादा.
यमदेवः तूच सांग. तू वेदशास्त्रसंपन्न आहेस.
रेडकरः (पुनः हंबरून) हम्म... तो संकृतमधला. ज्ञानेश्वर महाराजांनी (इथे डोळ्याला नमस्कार केल्यासारखे हात) इंग्रजी नाही शिकवली आपल्याला.
यमदेवः (प्रेक्षकांना -) बघा. एरवी त्याचं ज्ञान फाडत असतो. (रेडकरांना -) ठीक आहे, पुनः बघू. 'माउंट' म्हणे पर्वत. 'बॅटन' म्हणजे 'दुसऱ्यांच्या जिवावर स्वतःची प्रगती करणे'. 
रेडकरः म्हणजे, दुसऱ्यांच्या जिवावर स्वतः प्रगतीचे पर्वत चढून जाणे. ... (कळून स्वतः वर खूष होतो आणि हसतो. पुढे म्हणतो, थोडं स्वतःशी थोडं प्रेक्षकांशी) माउंटबॅटन...हे उंटावरचे शहाणे की पर्वतावरचे? 
यमदेव (दुर्लक्ष करत): अरे, पण फायलीत नाव सापडत नाहीये!
(तेवढ्यात चित्रगुप्त आणि माउंटबॅटन येतात.)
चित्रगुप्तः प्रतीक्षागृहातही सापडत नव्हते... तिथे 'म' च्या फायलीत नाही सापडणार नाव - या 'ब' मध्ये बघा. (टेबलावरच्या फाईलकडे बोट दाखवतात. ) जर्मन नावाचा बभ्रा होऊ नये म्हणून 'बॅटनबर्ग' चं 'माउंटबॅटन' केलं होतं ह्यांनी.
रेडकरः आता 'बॅटनबर्ग' म्हणजे...
यमदेव: अर्थ तोच होतो रेडकर. माणूसही तोच आहे. फक्त जर्मन शब्दांऐवजी इंग्रजी शब्द केले.
रेडकरः मग ठीक आहे.
चित्रगुप्तः ठीक काय आहे?
रेडकरः शब्दांची उलटापालट करूनही अर्थ बदलत नाही हे! नाही तर बघा ना, नुसत्या 'पर्वते'चं 'ते पर्व' केलं तरी अर्थ बदलतो की.
यमदेवः किंवा डीमेलोचं मेलोडी! 
(दोघे "पर्वते डीमेलो, ते पर्व मेलोडी" असं तीन-चार वेळा तालात म्हणतात.)
रेडकरः साखरदांडे, गायकवाड आणि इंगळहळ्ळीकर यांचं कसं होईल?
चित्रगुप्त (अडवून): थांबा, पुरे.
यमदेव: पण आडनाव बदललं कशाला?
चित्रगुप्तः अहो, मूळचे जर्मन वंशाचे हे. पण इंग्लंडच्या राज्यकर्त्यांपैकी. महायुद्ध सुरू झाल्यावर यांनी देश बदलण्याऐवजी आडनाव बदललं. 
यमदेव: असं झालं होय? आडनाव जाऊ दे. नाव काय ह्यांचं?
चित्रगुप्तः लुई फ्रान्सिस अल्बर्ट व्हिक्टर निकोलास.
रेडकर (मोजत): एक, दोन, तीन, चार, पाच... मग बाकीचे चार पांडव कुठे आहेत?
माउंटबॅटन (प्रथमच तोंड उघडतात): व्हॉट अ प्रिपॉस्टरस क्वेश्चन! ही सगळी माझीच नावं आहेत!
चित्रगुप्तः हे तर काहीच नाही. (फाईल चाळत... ) यांना मिळालेल्या उपाध्या अजून खूप आहेत. फर्स्ट अर्ल माउंटबॅटन ऑफ बर्मा, फर्स्ट सी लॉर्ड, व्हाइसरॉय ऑफ इंडिया, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ, लॉर्ड, .... 
(माउंटबॅटन प्रत्येक ठिकाणी आत्मप्रौढीनं माना डोलावतात.)
रेडकरः पण केलं काय यांनी जीवनात? 
यमदेव: त्यांनाच विचारुया की. त्याचसाठी आले आहेत ना ते इथे?
चित्रगुप्तः हो तर! विचारायचंय तर...
माउंटबॅटनः दुसऱ्या महायुद्धात मी रॉयल नेव्हीत होतो.
रेडकर: छान छान. आपल्या देशासाठी - म्हणजे इंग्लंडसाठी - युद्ध करत होतात.
माउंटबॅटनः हो. एच एम एस केली चा कमांडर होतो.
रेडकर: छान छान. 
चित्रगुप्तः पण त्या जहाजाला जर्मन टॉर्पीडोच्या तावडीत नेऊन सोडलं! 
यमराजः हो का? मग त्यानंतर?
माउंटबॅटनः केली दुरुस्तीला गेलं आणि मी एच एम एस जावलीन चा कमांडर झालो. 
चित्रगुप्तः आणि त्या जहाजालादेखील जर्मन टॉर्पीडोनी जर्जर केलं. 
रेडकर: अरे वा! कन्सिस्टंट...
चित्रगुप्तः मधल्या काळात एच एम एस केली दुरुस्त झालं होतं. त्याला त्यांनी ग्रीसला जर्मनांशी युद्ध करायला पाठवलं.
यमदेव: थांबा, आणि त्याला जर्मनांनी बुडवलं. बरोबर?
चित्रगुप्तः अगदी बरोबर!
रेडकर आणि यमदेव (हसून): अरे वा! कन्सिस्टंट... (यमदेव आणि रेडकर दोघेही चित्रगुप्तांना टाळ्या देऊ पाहतात. पण दोघे एकदम करायला गेल्यामुळे कुणाचीच टाळी वाजत नाही.) 
चित्रगुप्तः हो ना. मग त्यांना बढती मिळून ते व्हाइस ऍडमिरल झाले. 
रेडकरः चर्चिलचे चांगले मित्र होते ते. शिवाय राजघराण्यातलेही. पण या सगळ्याचा त्याच्याशी काही संबंध नसावा.
यमदेवः मध्ये मध्ये बोलू नका रेडकर!
चित्रगुप्तः या नंतर त्यांनी ऑपरेशन ज्युबिली हाती घेतलं. कॅनडाच्या सुमारे पाच हजार सैनिकांना (आणि ब्रिटनच्या एक हजार सैनिकांना) एका फ्रेंच बंदरावर सोडलं.  त्यांपैकी ६८% मारले गेले.
माउंटबॅटनः पण त्याच अनुभवातून आम्ही पुढे नॉर्मंडीची लढाई करू शकलो. 
चित्रगुप्तः असं तुम्हीच म्हणालात! 
यमदेवः पण त्या अनुभवाची गरज होती का?
चित्रगुप्तः या पुढे त्यांनी काय केलं हे आपण त्यांनाच विचारुया.
माउंटबॅटनः मग आम्ही नॉर्मंडीपर्यंत पाण्याखालून तेलाचे पाईप टाकले.
चित्रगुप्तः पण नॉर्मंडीच्या लढाईत त्या तेलाचा वापरच झाला नाही!
रेडकर: छान! म्हणजे ती पाइपलाइन इतके वर्षं नुसतीच भिजत पडली आहे...
यमदेव: भिजत नाही, कुजत... इंग्लिश खाडीत आहे ना ती! 
माउंटबॅटनः पण मग ब्रह्मदेशातली लढाई आणि मुख्य म्हणजे शेवटी महायुद्ध कोण जिंकलं?
चित्रगुप्तः ब्रह्मदेशातली लढाई तुम्ही आणि महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी.
माउंटबॅटनः म्हणजे आम्हीच की. 
चित्रगुप्तः युरोपातली तुमच्याशिवाय.
माउंटबॅटनः हे खरं नाही. तुमच्या नोंदी चुकीच्या आहेत. असंच जर चालू राहिलं तर तुम्ही मला नक्कीच नरकात पाठवाल... वास्तविक माझ्यामुळे भारताला स्वातंत्र्य...
यमदेवः या यमसदनात कोणावरच अन्याय होत नाही. ती माझी जबाबदारी आहे. चित्रगुप्ता, चल लवकर जमाखर्च सांग. रेडकर, आपण गप्प बसायचं.
चित्रगुप्त (आपल्या खुर्चीत बसतात.) 
आवक - भारताला स्वातंत्र्य दिलं. जावक - भारताची फाळणी केली.
आवक - स्वातंत्र्य वेळेआधी दिलं (जून १९४८ ची मुदत ठरली होती). जावक - स्वातंत्र्य देण्याची घाई केली (१५ ऑगस्ट १९४७ ला), नकाशेही आखण्याआधी फाळणी केली. 
आवक - काश्मिरच्या सामिलीकरणावर सही केली. जावक - काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेण्याचा सल्ला दिला.
आवक - ब्रिटिश राजघराण्याचे नातेवाईक आणि प्रेमळ सल्लागार. जावक - ब्रिटिश लोकशाही उलथून स्वतःकडे सत्ता घ्यायचा प्रयत्न.
यमदेवः काय म्हणता?
रेडकरः शेवट कसा झाला त्यांचा?
माउंटबॅटन: आठवत नाही तुम्हांला? आय. आर. ए. ने मारलं.
रेडकरः म्हणजे इंडियन रिपब्लिकन आर्मी?
यमदेवः हट. आयरिश रिपब्लिकन आर्मी.
चित्रगुप्तः आहे इथे. आवक - हुतात्मा झाले शेवटी. जावक - काही नाही.
यमदेवः म्हणजे?
चित्रगुप्तः निवडा माउंटबॅटन. कुठे जायचंय तुम्हांला? स्वर्ग की नरक?
रेडकरः थांबा. यांच्या हायलाइटस नाही बघितल्या आपण टी. व्ही. वर...
चित्रगुप्तः (रेडकरांना -) ते शक्य नाहीये. सेन्सॉर बोर्डानं सगळ्या चित्रफिती ठेवून घेतल्या आहेत. हं... माउंटबॅटन, सांगा, कुठे जाणार तुम्ही?
(माउंटबॅटन स्वर्गाचं दार उघडून पलीकडे जातात. रेडकर शांतपणे त्यांच्यामागून जातात, 'स्वर्ग' आणि 'नरक' या पाट्या आपल्या मूळ जागांवर लावून टाकतात...पडदा पडतो.)

- कुमार जावडेकर

No comments:

Post a Comment