अता आर्त हळवी हवा सांज असते
स्मृती पाखरांचा थवा सांज असते
जुना तोच शृंगार लेवून उसना
समारंभ फिरुनी नवा सांज असते
जरी रात्र असते तुझी दाट छाया
छटांचा तुझ्या कारवा सांज असते
दिशाहीन क्षितिजे पुनः फेर धरता
पुनः जीवनी नाखवा सांज असते
तुझा गाव गेला जरी दूर मागे
मनी सुखदसा गारवा सांज असते
न तू आज येथे न मी आज तेथे
अता रोज ही मारवा सांज असते
- कुमार जावडेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा