सोमवार, २३ जून, २०२५

रिकामा (अभंग)

रिकामेच होते
ज्ञानाचे पाकीट
फुकट तिकीट
दिले कोणी

आधीच मनी या
होता पूर्वग्रह
त्यात हा आग्रह
मैफिलीचा

आले मग येथे
बनून सर्वज्ञ
जरी पोटी यज्ञ
जाळणारा

रागाचा कळेना
जरासाही सूर
तरी मोठा नूर 
दाखवती

यापूर्वी केवळ
ऐकले भजन
नमो आवर्तन
परिचित

रेड्यासम होते
मुखोद्गत वेद
अंतरात भेद
भरलेला

जेव्हा न कळले
चांगले वाईट
झाली भाषा धीट
उगीचच

विचारले जेव्हा
ऐकले ते काय
विस्मरण हाय 
जाहले की

ठेवून बाजूला
आपले वैगुण्य
शिव्याशाप पुण्य
घेत गेले

सुमार पाखंडी
असे जन फक्त
स्वघोषित भक्त
दूर ठेवा

- सुमार (कुमार जावडेकर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा