Wednesday 3 June 2020

शोधू जरा

खिन्न रात्रींचे मुके आक्रंदणे शोधू जरा
चांदण्याने भिजवलेली अंगणे शोधू जरा

खिळखिळ्या खिडक्यांतुनी का रोज ही दिसती भुते?
हरवलेले आपले बुजगावणे शोधू जरा

वाट चुकलो की नवा पथ पावलांना गवसला
भेटलो इतके खरे, पण- कारणे शोधू जरा

चांदण्यांची रोजची वर्दळ नभी आहे तरी
आज चंद्राच्या मनीची धोरणे शोधू जरा

निरनिराळे अर्थ शब्दांना जरी असले तरी
फक्त त्यांचे रूप मोहक देखणे शोधू जरा

एक घडते भेट, पडते एक उत्कट ती मिठी
चल पुन: लाटेप्रमाणे विखुरणे शोधू जरा

- कुमार जावडेकर

1 comment:

  1. खूप उत्कट गझल... आणि शेवट उत्तम - नेहमीप्रमाणे

    ReplyDelete