Tuesday 28 April 2020

तरही गझल (हुंदका)

चेहरा हास्यात जे लपवून गेला
हुंदका साधा तुझा सांगून गेला

हुंदका साधा तुझा सांगून गेला
वचन मौनाचे मला मागून गेला

खूप वेळा ऐकलेली ती कहाणी
सांगताना तो पुन्हा रंगून गेला

(खूप वेळा ऐकलेली ती कहाणी
ऐकताना तो पुन्हा रंगून गेला)

मीलनाची शक्यता नव्हती तरीही
चंद्र सारी रात्र का जागून गेला?

दूरवर होते सुखाचे चांदणे, पण-
एक त्याचा कवडसा बिलगून गेला

जीवनाची शाश्वती मागू कुणाला?
मेघसुद्धा कोरडे वागून गेला

- कुमार जावडेकर

(सारंग पत्की यांनी दिलेल्या 'हुंदका साधा तुझा सांगून गेला' या मिसऱ्यावर, 'मराठी गझल' या संकेतस्थळाने आयोजित केलेल्या स्पर्धेत पारितोषिक पात्र)

No comments:

Post a Comment