गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

निवडक अ–पुलं: नाथा का मत!

"पण... ‘प्रेमाला उपमा नाही’ असं तर मी लहानपणापासून ऐकत आलोय." एक जण समोर ‘कैवारी’ म्हणून उभ्या ठाकलेल्या त्याच्या गुरूला हे सांगत होता. गुरूच्या चेहेऱ्यावर हा ‘कैच्या कै’ सांगतोय हा भाव होता.

"पण प्रेमात पोहे आहेत की!" दुसरा.

"पोहे लग्नात, प्रेमात कुठले? अशी घोडचूक करू नका." घोडचूक कोणती - पोहे कधी मिळतात हे माहिती नसणं ही की लग्न करणं ही - हे स्पष्ट न करता गुरू 'उसळ'ले.

"खरंच की. माझी सरमिसळ झाली," पहिल्या विद्यार्थ्यानं कबुली दिली.

"प्रेमात अशी मिसळ करू नका. प्रेम निर्भेळ असतं."

"म्हणजे मिसळ, भेळ काहीच चालत नाही?"

'प्रेम ही काही खायची गोष्ट नाही' या विषयावर नाथा कामत हे चर्चासत्र घेत होता... आणि ’प्रेमात आपली डाळ कशी शिजणार’ याची चिंता असलेले ते सगळे चेहरे नाथाकडे ‘आ’ वासून बघत होते.

"प्रेम करणं म्हणजे नुसती पोळी भाजून घेणं नसतं." नाथानं स्पष्ट केलं.

"पण मग प्रेमात पडायचं कसं?"

"अरे बाबा, प्रेमात पडू नका. प्रेमात शिरा! नुसते नजरेस पडू नका, तर डोळ्यांवाटे हृदयात शिरा!"

आपल्या आयुष्यात न घडलेल्या परिकथा, नाथा कामत या परिसंवादांच्या रूपानं, आपल्या परीनं, अशा प्रकारे सतत लोकांच्या गळी उतरवत असतो.

‘नाथा का मत' या त्याच्या युट्यूब चॅनेलचे अनेक फॉलोअर्स आहेत. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’ हे ब्रीद घेऊन त्यानं ते सुरू केलं आहे... त्याच्या पॉडकास्टवर तो पायरी–पायरीनं एकेका भागात सफल प्रेमाची बीजं पेरत असतो. आपली पायरी हापूस कधी झाली नाही हा प्रश्नही तो स्वतःला पुसत नाही. प्रेमात अनेकदा पडणं- बरं नुसतं पडणं नाही तर प्रत्येक वेळी ठेच लागून पडणं आणि मार खाणं - ही गुणवत्ता प्राप्त केलेला, मात्र तरीही त्या विषयाची शिष्यवृत्ती बाळगणारा तो एकमेव गुरू असावा.

नाथाचा आणि माझा संपर्क अनेक वर्षं तुटला होता. त्याच्या लग्नात मी त्याला भेटलो होतो. त्यानंतर चार-पाच दिवसांतच, बायकोच्या उपासाला लागणारे साबुदाणे कुठे मिळतात हे विचारायला, तो माझ्या दारात आला होता. त्याच्या संसाराची खिचडी आता शिजू लागली आहे हे त्यावरून मला कळलं होतं. (अशा एकादशी - संकष्टीच्या उपवासचक्रात इतके दिवस उगाच समकष्टी मानत असलेल्या माझ्यासारख्या मित्राचा सहवास मात्र तो विसरून गेला.) वास्तविक - वागळेंच्या मुलीशी विवाह केल्यामुळे त्याची दुनिया पूर्वीपेक्षा वेगळी झाली होती. ती आता माझ्या विश्वासारखी झाली होती. ‘बाबा रे तुझं जग निराळं आणि माझं निराळं’ हे एखादी नवी आगळीक करून आल्यावर म्हणायचं वाक्य आता त्याला उच्चारता येणार नव्हतं... निदान असा माझा समज झाला होता.

यानंतर अचानक नाथाची गाठ पडली ती खूप वर्षांनी – एका 'व्हॅलेंटाईन डे'च्या कार्यक्रमात. ज्या महाविद्यालयात मी भाषा विषयाचा प्राध्यापक आहे तिथेच नाथा ही व्यक्ती प्रेमाची परिभाषा शिकवायला उगवेल असं मला वाटलं नव्हतं. पण त्याला ओळखणं मला कठीण गेलं नाही. थोडेसे अजून मागे सरलेले आणि पांढरट झालेले केस हा बदल सोडला तर नाथा तसाच होता. टापटीप. उरलेल्या केसांचा तसाच भांग. जराही न सुरकुतलेला कडक इस्त्रीचा शर्ट, टायची गाठ, हातावर कोट, चकचकीत पॉलिश केलेले शूज - सगळं तसंच.

त्याचा घोळका आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये भरला होता. मला तिथे थबकलेला बघून त्यानं खुणावलं, "संपत आलाय आजचा सेशन. थांब. भेटूच." 

त्याचे विद्यार्थी/ विद्यार्थिनी निघून गेले आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.

नाथा आता एका १७–१८ वर्षांच्या मुलाचा बाप झाला होता. तो चिरंजीव अनाथ राहू नये म्हणून त्यानं हा उपक्रम चालू केला आहे की काय अशी शंका मला आली. पण ती त्यानंच दूर केली.

"शित्या सरमळकर आठवतो का तुला?" 

"वेलकम स्टोअर्सवाला ना?"

"तोच. शरयू प्रधानने तीन आण्यांच्या सेफ्टी पिना घेण्यासाठी दहा रुपयांची नोट दिली म्हणून तिच्यावर खेकसला होता तो खेकडा. त्याला प्रीती नावाची मुलगी आहे."

हंबरते ती हम्मा तसं खेकसतो तो खेकडा करणं मला गंमतीदार वाटलं. शित्यासमोर नाथा हे बोलेल की नांगी टाकेल हा प्रश्नही मनात येऊन गेला. नाथाच्या संभाषणाचा ’रोख’ एक मुलगी असा असला की त्यात तिच्या बापाबद्दल अनेक ’उधार’ गोष्टी येतात. त्याच्या या वृत्तीत अजूनही बदल झाला नाहीये ही गोष्ट माझ्या ध्यानात आली.

"दुकानात असते प्रीती कधी कधी. माझा मुलगा जातो तिथे रेजर ब्लेड्स वगैरे घ्यायला. शित्या असतोच लोंबकळत अवती-भवती अकॉर्डियनच्या भात्यासारखा." 

नाथा शित्यावरून भात्यावर गेला. हे बोलताना नाथाच्याच छातीचा भाता धाप लागल्यासारखा वर खाली होत होता.

"तुझा मुलगा प्रेमात पडलाय का तिच्या?" 

"छे रे... एकदा बापाची नजर चुकवून प्रीतीच म्हणाली त्याला, ‘तुमच्या वडिलांबद्दल खूप ऐकलं आहे. त्यांना एकदा कॉलेजात बोलवा ना भाषणाला.’ एकाच वर्गात आहेत दोघं, पण वेगवेगळ्या महाविद्यालयांत." 

"काय सांगतोस?" 

"तेव्हापासून हा उद्योग सुरू झाला. त्यातच व्हॉट्सॲप वरून अनेक जुन्या मैत्रिणींनी संपर्क करून आपली मुलं माझ्या मार्गदर्शनासाठी पाठवायला सुरुवात केली. शरयू प्रधान, रेखा गोडबोले, सुषमा नेने, शांता गोळे, लिली पेंडसे, सरोज केरकर... किती नावं घेऊ?"

इतक्या बायकांची नावं एकत्रितपणे तर मी 'निरमा'च्या जाहिरातीतही ऐकली नव्हती!

"बायकोला माहिती आहे तुझ्या?" मी घाबरून विचारलं. 

"तीही मला लीड्स देत असते. श्यामा चित्रे आठवतेय?"

"न आठवायला काय झालं? तुझी प्रत्येक–" 

"माझ्याशी लग्न झालं असतं तर लग्न, घटस्फोट, त्यानंतर दुसरा विवाह आणि अखेर मृत्यू –आत्महत्या वा मर्डर– ह्या सगळ्यांतून वाचली असती असं माझीच बायको ग्रुप्सवर सांगत असते."

"आणि तुझा मुलगा?" 

"प्रीती त्याच्यावर प्रेम करते असा माझा संशय आहे. मला भेटायला म्हणून येते कधी कधी, त्या – शाळेतल्या ड्रिलमध्ये वापरल्या जाणाऱ्या मळक्या ढोलाची सर नसलेल्या – तिच्या सरमळकर बापाला चुकवून. प्रत्यक्ष नजर राज कुठे आहे त्याकडे असते."

नाथा व्हिलनच्या नावाला स्वरवाद्याची तर आडनावाला तालवाद्याची विशेषणं देऊ शकतो यात मला नवीन असं काहीच नव्हतं. फक्त त्याच्या मुलांचं नाव राज आहे हे यावरून समजलं मला.

"राज? तुझ्या मुलाला शोभेल असं नाव आहे." 

नाथा माझ्या बोलण्यातला उपहास समजण्याच्या पलीकडे गेला होता, नेहमीप्रमाणे.  

"बायको एका सिनेमाला घेऊन गेली होती. त्यातला हीरो आवडला मला. त्याला अरेंज्ड मॅरेज करायचं आहे असं म्हणतो तो नेहमी."

एका दमात नाथा उत्तरला. त्यातलं पहिलं वाक्य एक घटना सांगणारं, दुसरं त्या चित्रपटातल्या 'राज' या नायकावर आधारित तर तिसरं नाथाच्या स्वत:च्या 'राज' या सुपुत्रावर म्हटलेलं होतं ही तोडफोड करायला मला जरा वेळ लागला. पण निदान नाथाचे सालस आई-वडील आणि निष्पाप भाऊ यांच्या वळणावर त्याचा मुलगा गेला हे ऐकून मला जरा हायसं वाटलं.  

"त्यात काय वाईट आहे? तू नाही का केलंस शेवटी? आणि मीही –" 

"तो जमाना गेला आता..." 

"प्रत्येक आई–बाप असंच म्हणतात आपल्या मुलांबद्दल." 

"खरं आहे."

"मग तू कशाला असे प्रेम शिकवायचे उपद्व्याप करतोस? राजसाठी मुलगी शोधायला वेळ आहे की तुला – जर प्रीतीचं नाहीच जमलं त्याच्याशी तर –"

"बाबा रे, तुझं जग निराळं आणि माझं निराळं." शेवटी नाथाला हे माझ्यावर फेकायची संधी मिळाली. तो पुढे म्हणाला,

"मला सांग. तू भाषा का शिकवतोस?"

"मला आवडतो तो विषय. मी शिकलो आहे. मुलांना व्याकरण, आशय वगैरे स्पष्ट करून सांगताना मजा येते मला."

"तू भाषा या विषयावर प्रेम करतोस. मी प्रेम या विषयावर प्रेम करतो. मी त्याचं व्याकरण, त्याचा आशय मुला–मुलींना सांगतो. मला मजा येते."

नाथा प्रेम–विद्याविभूषित आहे याबद्दल कुणाचं दुमत नसावं.

मी विचारात पडलो. नाथानं लिहिलेलं सॉनेट सदू अभ्यंकरानं शांता गोळेला स्वत:चं म्हणून दिलं किंवा नाथाबद्दल चौपाटीवरच्या वाळूत लिहिलेली अक्षरं विसरून श्यामा चित्रे मधू शेट्याच्या बॅडमिंटनवर भाळली ह्या गोष्टींमध्ये त्या मुली आधी खरंच नाथाच्या प्रेमात पडल्या होत्या का?

माझ्या लक्षात आलं. पूर्वी संशय होताच, आता खात्री पटली – 

नाथाच्या प्रेमाची ती चालती–बोलती प्रतीकं होती. त्याच्या प्रेमावरच्या प्रेमामुळे तो स्वतःला त्या कथांमध्ये गुंफत होता. त्यांचे मग त्यानं अनेक – एक हिरॉईन, एक व्हिलन आणि त्यांच्यात परिकथेतल्या शापित राजकुमाराप्रमाणे असलेला असा नाथा – असे ट्रेलर्स तयार केले. त्यांचं रूपांतर पूर्ण पटकथेत झालं नाही याचं दुःख त्यानं मला सांगितलं... पुढच्या ट्रेलरच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार करता करता...

एकदा संसार–चित्रपट सुरू झाला आणि मग त्यानं ती मुख्य भूमिकाही जबाबदारीनं निभावली / आणि अजूनही निभावतोय.

आता हाच संदेश तो इतरांना देतोय, चरित्र नायक होऊन.

नाथाचे लग्नाआधीचे लोणकढी मिसळलेले खयाली पुलाव असोत वा लग्नानंतरच्या संसाराचं सार – दोन्हींत एक समान घटक होता, तो म्हणजे त्याची प्रेमावारची अतोनात प्रीती.

'प्रीती'चा विचार करणारा नाथा हे फक्त त्याच्या 'राज'साठी करत नव्हता. हे 'राज' आता मला कळून चुकलं होतं. 

समोर बसलेला नाथा मला नेहेमीप्रमाणे दिल, गुल वगैरे शब्द असलेले शेर ऐकवण्यात मशगुल झाला होता –

"दिल से कब मैंने मचलने को कहा 
है किसी ने गुल से खिलने को कहा?

दूर से ही छू लिया मैंने तुम्हें 
जो हवा से रुख बदलने को कहा

जब सम्हलना हो गया मुश्किल मुझे
तब तुझे मैंने सम्हलने को कहा

वक्त किसके पास है ग़म के लिये 
किस्सा दिल का दिल बहलने को कहा

प्यार का मतलब समझने के लिये
लोगों से बस मिलने जुलने को कहा"

.... नाथाच्या चॅनेलचा मीही यानंतर एक सबस्क्राईबर झालो.

या घटनेलाही काही वर्षं होऊन गेली. काल परवाच पुनः नाथा दारी आला. मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन. 'राज वेड्स प्रीती' असं तिच्यावर लिहिलेलं होतं! 

© कुमार जावडेकर

+447405693330 / jawadekar123@yahoo.co.uk