Friday 2 June 2017

वेगळा

जीवनाचा नूर आहे वेगळा
ताल, लय अन सूर आहे वेगळा

वेगळी पत्रातली भाषा तुझी
अंतरी मजकूर आहे वेगळा

सागराची रोज भरती पाहिली
आसवांचा पूर आहे वेगळा

प्रेम केले, भोगली मीही सजा
कायदा मंजूर आहे वेगळा

मूक अत्याचार सारे सोसती
कोण येथे शूर आहे वेगळा

धावणाऱ्या माणसांचे शहर हे
गाव माझा दूर आहे वेगळा

- कुमार जावडेकर 

1 comment:

  1. 'सागराची रोज भरती पाहिली
    आसवांचा पूर आहे वेगळा'
    --- क्या बात है दोस्ता!!

    ReplyDelete