Tuesday 29 December 2015

बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी

चाळकऱ्यांनी एकजुटीने 'बाजीराव मस्तानी' पाहायला जाण्याच्या घटनेची तुलना फक्त मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्याच्या बातमीशीच होऊ शकते. भन्साळी यांनी चित्रपट बनवायला एका तपाहून अधिक वेळ घेतला; पण तो एकत्रितपणे बघण्यासाठी चाळकऱ्यांना जी  तपश्चर्या करायला लागली तीही काही कमी नव्हती. अनेकांचा अनेक दिवस हे खरं होईल यावरच विश्वास बसत नव्हता. झालंच तरी सर्व संकटांमधून पार होऊन ती वेळ येईपर्यंत हा चित्रपट डब्यात गेला असेल आणि त्यांना भन्साळी यांनी काढलेला दुसऱ्या बाजीरावाच्या प्रेमलीलांवरचा 'सिक्वल' बघायला लागेल अशी शंका  ते व्यक्त करत होते. (अटकेपार मराठे बाजीरावानंतरच गेले होते, हा 'तप'शील त्यांना ठाऊक होता. ) या उलट काही आशावादी जण, एका बायकोशी लग्न करण्याच्या गोष्टीवर काढलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट जर जवळच्याच 'मराठा मंदिर'मध्ये वीस वर्षं चालू शकतो, तर दोन बायकांशी लग्न करणाऱ्या बाजीरावावरचा चित्रपट चाळीस वर्षं का चालू नये, असा युक्तिवाद करत होते. (आमच्या नोंदींप्रमाणे २०१५ साली झालेला बटाट्याच्या चाळीतला हा २०१५ वा सामुदायिक वाद. बाकी चाळींतल्या खोल्या-खोल्यांमधून होत असलेले कौंटुंबिक वाद, प्रतिवाद, आणि त्यांतून निर्विवादपणे उरणारे अपवादात्मक संवाद निराळे.)

बाबूकाका खरे या मोहिमेत सर्वांत आघाडीवर होते. त्यांचं इतिहासप्रेम चाळीत 'मशहूर' होतंच आणि आता हा चित्रपटाला जायचा विचारही त्यांच्यामुळेच चाळीत 'पिंगा' घालायला लागला. बाजीरावाचा इतिहास फक्त मराठी माणसांनाच माहिती असतो, तो आता जगासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणावर येतो आहे याचाच त्यांना आधी नशा चढला होता. पण येणाऱ्या प्रतिसादांवरून त्यांना ह्याचं अतीव दुःख झालं की त्यांचं ऐकणाऱ्या बहुतेक मराठी माणसांनाही तो माहिती नव्हता!

त्यांना कुशाभाऊ साथीदार म्हणून मिळाले. त्यांनी 'मस्तानीचा बाजीराव'मध्ये चिमाजीचं काम केलं होतं.स्वतःच्या संवादांबरोबरच बाजीरावाचेही संवाद म्हणून त्यांनी फक्त मस्तानीची अटकच नाही, तर बाजीरावाची बोलतीसुद्धा बंद केली होती!

द्वारकानाथ गुप्त्यांना बाजीप्रभू आणि मुरारबाजींबद्दल विशेष प्रेम ('कायस्थाचं इमान आहे'!). हा बाजी वेगळा हे कळेपर्यंत तेही होकार देऊन बसले!

मात्र खरी उत्साहाची लाट आली ती म्हाळसाकांत पोंबुर्पेकरामुळे. अजूनही अविवाहित असलेल्या पोंबुर्पेकरासाठी ही कथा प्रेरणादायी होती. 'चाळकऱ्यांनो, इतिहासापासून शिका' या अग्रलेखानं त्यानं चित्रपटाला चाळीचं वऱ्हाड न्यायची पहिली लेखी मागणी केली...जनोबा रेग्यांचे 'बाजीराव मेलो आसतलो' हे (अनुभवाचे? ) बोल डावलून! अर्थातच आचार्य बाबा बर्व्यांनी कुणीही न सांगता या चळवळीचं अध्यक्षस्थान पटकावलं.

पोंबुर्पेकराची मागणी, पुरुषांनी आवाहन आणि बायकांनी आव्हान म्हणून स्वीकारली. बायकांची चित्रपटाला जाण्यासाठी वेशभूषास्पर्धा स्पर्धा सुरू झाली. प्रत्येकीला या समारंभासाठी 'ट्रेलर'मध्ये बधितलेल्या रंगांच्या साड्या आणि दागिने आधी विकत आणायचे होते. शिवाय नटून थटून निघेपर्यंत इंटर्वल होईल की काय अशी 'रास्त भीती' (म्हणजे 'धास्ती' का रे भाऊ? ) पुरुषांना होतीच. तर काही बायकांनी इंटर्वलला साड्या आणि दागिने बदलायची तयारीही केली होती.

याच्या अगदी उलटही काही बायका होत्याच. पावशेकाकूंनी, "ती मस्तानी बाजीरावाला नॉनव्हेज खायला देत होती... हे का बघायला जायचं?" असं विचारलं. त्यावर काशिनाथ नाडकर्ण्यांनी, "छे! छे! बाजीराव असा नव्हेच. काय समजलेत? आमच्या कोकणातला होता तो, " असं उत्तर दिलं आणि त्याला कोचरेकर मास्तरांनी, "बरोबर आहे, तो फक्त कणसं खाऊन लढायचा" असा दुजोरा दिला! त्यांना 'बाजीराव तो वीरच मोठा, कणसे खाउन लढला पठ्ठा' ही शालेय कविता तेवढी पाठ होती.

कोचरेकर मास्तरांना पूर्वीचा भ्रमणमंडळाचा अनुभव होता...ते रात्री नऊच्या खेळाची तिकिटं काढून आले आणि "सहाचा आहे" असं सोकरजींनाना त्रिलोकेकरांना म्हणाले

"सहाची काय रे... आता आल्यावर माझी बायडी चिकन बिर्याणी काय रात्री दहाला करेल, यू इडियट?" नाना उखडले, "बघू ती तिकिटं?"

आपलं कधी नव्हे ते बोललेलं खोटं उघडकीला येईल असं मास्तरांना वाटलं; पण त्रिलोकेकरांनी चष्मा न लावता इंग्रजी नऊ हे उलट्या सहासारखे वाचले आणि ती थाप पचून गेली.  प्रत्यक्ष चित्रपटाला जायच्या दिवशी मात्र बाबलीबाईंच्या तयारीचा उत्साह (की उजेड? ) बघून याच सोकरजीनानांनी कोचरेकर मास्तरांच्या पाठीत थाप मारली आणि त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं.

एच. मंगेशरावांचा या चित्रपटाची जाहिरात करण्यात प्रथम क्रमांक होता. चाळीच्या प्रत्येक खोलीतून चित्रपटाची गाणी कानी पडत होतीच; पण मंगेशरावांच्या खोलीतून ती त्यांच्या हार्मोनियमवरून, वरदाबाईंच्या आवाजातून आणि त्यांच्या इतरांशी चाललेल्या संवादांतूनही ऐकू येत होती. 

"मंगेशराव, ते 'पिंगा ग' आणि 'डोला रे' गाणी किती सेम वाटतात ना?" एकानं विचारलं.

"नो!" मंगेशरावांना राग आला, "ते दोन राग वेगळे आहेत."

"आणि ते 'अलबेला सजन आयो रे' हे 'हम दिल दे चुके सनम' मधलंच गाणं पुनः घेतलं आहे!" दुसऱ्यानं टिप्पणी केली.

"नो! ते दोन्ही राग एकदम ऑप्पोझिट आहेत." मंगेशराव पुनः रागावले. अर्थात वरदाबाईंच्या गाण्यावरून मंडळींना त्या पहिल्या रागात म्हणतायत की दुसऱ्या हे कळत नव्हतं हा भाग वेगळा!

शेवटी तो रविवार उजाडला. चित्रपटगृहात येण्यासाठी मंडळींनी बी. ई. एस. टी. ची बस पकडली. बसमध्ये चाळकऱ्यांनी शिरून, धक्केबुक्के करून जागा पटकावेपर्यंत उतरायची वेळ झाली होती. पण इथेच पुढच्या नाटकाची नांदी झाली. मास्तरांनी जरी तिकिटं आणली होती, तरी कुणाला कुठली खुर्ची हे काही त्यावर लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे चित्रपटगृहात शिरताच 'मला कॉर्नर', 'मला मिडल कॉर्नर', 'मला शेवटची रांग' वगैरे मागण्या सुरू झाल्या. आचार्य बाबा बर्व्यांनी गुपचुप आपलं सर्वांत मौक्याच्या जागेवरचं - शेवटच्या रांगेतलं मधलं, जिथे समोर कुठलाही अडथळा नव्हता असं - स्थान पटकावलं. अर्थात बराच वेळ त्यांना समोर काहीच दिसत नव्हतं आणि चाळकरी उभा सत्याग्रह तर करत नाहीयेत ना असा विचार त्यांच्या मनात यायला लागला. 'चित्रपट काय आपण कुठूनही पाहू शकतो' असं ते आपलं स्थान न सोडता सांगू लागले. तेवढ्यातच सोकरजीनानांनी बाबांच्या शेजारच्या खुर्चीवर येऊन, पुढील तीन रांगांना (या तिन्ही चाळीसाठीच होत्या) ऐकू जाईल या आवाजात 'साला डिसिप्लीन नाही आपल्या लोकांत' असं म्हटलं. त्यामुळे मंडळी पुढे बघण्याऐवजी आता उभ्या उभ्याच मागे वळली. 'शब्द मागे घ्या'. 'आम्हीसुद्धा तेवढेच पैसे भरले आहेत, मग ह्यांनाच कॉर्नरची सीट का? ' वगैरे ओरडा सुरू झाला. परिस्थिती हाताबाहेर जाईल असं वाटत असताना अचानक राष्ट्रगीत सुरू झालं आणि जरा शांतता पसरली. 'जरा प्लीज बसून घ्या हं, चित्रपट सुरू होतोय' हे बाबांचं त्यानंतरचं वाक्य दिवे विझण्याच्या समेवर मंडळींच्या कानी पडलं आणि शेवटी त्यांनी बैठक मारली.

बाबांच्या शेजारी सोकरजीनाना, अण्णा पावशे, द्वारकानाथ गुप्ते, तर दुसऱ्या बाजूला कोचरेकर मास्तर, जनोबा रेगे, राघूनाना, भाईसाहेब चौबळ आणि इतर पुरुष मंडळी होती. त्यांच्या समोरच्या रांगेत मधल्या कोपऱ्यात वरदाबाई, त्यांच्या शेजारी एच. मंगेशराव, पलीकडे काशिनाथ नाडकर्ण्याचा मुलगा, मग स्वतः नाडकर्णी आणि इतर मंडळी. तर त्याच रांगेच्या दुसऱ्या बाजूला बाबलीबाई (दोन खुर्च्यांवर -मधू चौबळ आणि सरोज गुप्ते हे न आल्याचं मंडळींच्या उशिराच लक्षात आलं!), पावशेकाकू आणि इतर बायका. पुढच्या रांगेत पोंबुर्पेकर, कुशाभाऊ, बाबूकाका, इतर मुलं आणि तरुण मंडळी यांचा समावेश होता. मुलांच्या हातात पॉपकॉर्न आणि ते सांडण्याचा परवाना असं दोन्ही असल्यामुळे त्या आघाडीवर अनपेक्षित शांतता होती.

प्रत्यक्ष चित्रपट मात्र सर्वांनी अशाच शांततेत बघितला - फक्त मंगेशरावांनी गाणी चालू झाल्यावर केलेल्या हातवाऱ्यांचा आणि खुर्चीच्या हातावर धरलेल्या तालाचा आणि वरदाबाईंनी दिलेल्या कोरसचा अपवाद वगळता. मध्यंतरानंतर बायकांच्या डोळे पुसण्याचा आवाज तेवढा त्यात सामील झाला. सुरुवातीचा 'डिस्क्लेमर' वाचूनही बाबूकाकांचा मात्र चित्रपट बघताना उत्साह हळू हळू मावळत होता.वास्तविक, आधी ऐकलेल्या चित्रपटावरच्या टीकेला झुगारून त्यांनी मोठ्या अपेक्षेनं चाळीला इथपर्यंत आणलं होतं. पण आता आजारी काशीबाईला मस्तानीच्या तोडीची सुंदरा झालेलं बघून, युद्धापेक्षा प्रेमप्रसंगच लांबलेले बघून आणि इतर शाहीरांनी पोवाडा गाण्याऐवजी बाजीरावालाच 'मल्हारी'वर नाचायला लावलेलं बघून त्यांना गलबलून आलं. हे गाणं आधी कुणीच ऐकलं नव्हतं. बाबूकाका 'अहो हे खरं नाहीये हो' असं सांगण्याचा प्रयत्न करत होते; पण ते कुणी ऐकत नव्हतं. कुशाभाऊ संवादांनीच चीत झाले होते. पोंबुर्पेकराचे दोन डोळे दोन सुंदऱ्यांवर एकाच वेळी (तिरळेपणाचा फायदा घेऊन) खिळलेले होते. मुलांनाही हत्तीपेक्षा उंच उड्या मारणारा आणि एकटाच अनेकांशी लढणारा 'सुपरमॅन' बाजीराव आवडला होता. चित्रपट आवडल्याच्या आवेशात मंडळी परत आली. आता बाबूकाकाच त्या कोलाहलात एकटे पडले होते.

परत आल्यावर ते जेवलेच नाहीत. झोपेत त्यांनी स्वप्न बघितलं ते असं -

बटाट्याच्या चाळीचं सांस्कृतिक मंडळ 'बाजीराव मस्तानी' बघण्यासाठी चाळीतून निघालं; पण काळी निशाणं घेऊन त्यांना सांडग्यांच्या चाळीतल्या मंडळींनी घेराव घातला. त्यातले प्रमुख स्वतः दादासाहेब सांडगे यांनी 'तुम्हांला खरा इतिहास बघायचा असला तर आमच्या चाळीनं केलेलं संशोधन पाहा' असा आदेश चाळकऱ्यांना दिला. जुन्या शिवाजीजी आणि अफझुलखानजी यांच्या मावळी विरुद्ध यवनी पद्धतीनं करायच्या भातशेतीवरच्या मतभेदांचा अहिंसात्मक इतिहास बाबूकाकांना आठवत असल्यामुळे त्यांनी पुनः तशा प्रसंगाला जायला विरोध करत केला. पण त्यांना न जुमानता दादासाहेब त्यांना आणि इतर सांस्कृतिक मंडळाच्या सभासंदांना खेचून सांडग्यांच्या चाळीत घेऊन गेले. तिथे त्यांच्यासमोर खऱ्या बाजीराव-मस्तानीच्या इतिहासाचं वाचन करण्यात आलं ...

"बाजीराव हे आपल्या हिंदवी स्वराज्य कंपनीची आर्थिक भरभराट कशी करावी याचा सतत विचार करीत असत. त्यांनी आपला कणसांचा व्यापार दिल्लीपर्यंत नेला. तिथल्या मक्याच्या रोट्यांमध्येही महाराष्ट्रातल्याच कणसांच्या दाण्यांचं पीठ वापरलं जाऊ लागलं. ते पाहून बाजीरावांना असं वाटलं की आपण रोटीचाही व्यवहार करायला हवा.

याचवेळी बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल यांनी रोटी-बेटी व्यवहारासाठी बाजीरावांना आपल्याकडे बोलावलं. छत्रसाल राजे आणि छत्रपती शिवराय यांचा पूर्वीच आर्थिक सामंजस्याचा करार झालेला होता.  त्यालाच स्मरून त्यांनी बाजीरावांना आपली बेटी मस्तानी दिली आणि झाशी इथल्या रोटीच्या व्यापाराचे एक्स्लुजिव्ह राइटस दिले."

"पण मग बाजीराव अकाली का मरण पावले? आणि मस्तानीला अटक का करण्यात आली? "

"ते आहे ना पुढे. नादिरशहा हे इराणमधली कणसं विकण्यासाठी दिल्लीत येत असल्याची बातमी आल्यामुळे त्या आधीच आपली विक्री व्हावी म्हणून बाजीराव आपला नवीन माल घेऊन नर्मदेपर्यंत आले. दुर्दैवानं सगळा माल नर्मदेत पडला. तो वाचवण्यासाठी श्रीमंतांनी स्वतः नर्मदेत उडी घेतली. पण यामुळे झालेल्या अतिश्रमामुळे आणि ज्वरामुळे त्यांचं निधन झालं. "

"आणि मस्तानी? "

"बाजीराव आपल्या महाराष्ट्रातल्या धंद्याची पॉवर ऑफ ऍटॉर्नी मस्तानीला देतील अशी त्यांची पत्नी काशीबाई, बंधू चिमाजी आप्पा आणि पुत्र नानासाहेब यांना भीती वाटत होती. म्हणून... "

"अहो हे खरं नाहीये हो!" बाबूकाका कळवळून ओरडले.

"कोण म्हणतो? हाच खरा सहिष्णू आणि अर्थपूर्ण इतिहास आहे. आजच्या 'सबका साथ, सबका विकास' या तत्त्वाला धरून! " सांडगे गरजले, "पुराव्यानं शाबित करेन!  ही पाहा मूळ बखर..."

"ही कुठली भाषा? लिपीही देवनागरी दिसत नाहीये. "

"नाहीच आहे मुळी. ही 'मोदी' लिपी आहे; पूर्वीच्या काळी तिला 'मोडी' म्हणत असत. "

दुसऱ्या दिवशी सकाळी बाबूकाकांना अनेक चाळकऱ्यांनी झोपेतून उठवलं. त्यावेळी ते 'अहो हे खरं नाहीये हो! ' एवढंच झोपेत कळवळून ओरडत होते.

- कुमार जावडेकर

2 comments:

  1. Fantastic! I liked the article so much!! Moreover Batatyachi Chawl + Baji-Mastani i.e. 'buy one, get one free' offer!!! Simply superb, Kumar [after all a 'Jawdekar]

    ReplyDelete
  2. Thanks a lot for your comments. Really mean a lot to me!

    ReplyDelete